तलत महमूद ः गझल गायकीचा एक मुलायम स्वर

0
8
  • राजेन ग. निपाणीकर

डिचोली – गोवा

हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील संगीताविषयी बोलायचे झाले तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून बरेच गायक नावारूपाला आले. त्यांतील एक नाव आवर्जून घ्यावे लागेल, ते म्हणजे- कुंदनलाल सहगल. सहगल हे बरेच तत्कालीन गायक जसे की मुकेश, तलत, लता, किशोर यांचे प्रेरणास्थान राहिले. भारतात सुरुवातीपासून सहगल यांनी गझल गायन पेश करून आपला असा एक खास रसिकवर्ग निर्माण केला. त्यानंतर बेगम अख्तर यांनी आपल्या भरदार व गझलशी सुसंगत अशा आवाजाने अनेक ठिकाणी महफिल करून ‘मलिका-ए-गझल’ हा खिताब पटकावला.

सन 1950 ते 1955 या सहा वर्षांदरम्यान लखनौ रहिवासी ‘तलत महमूद’ यांनी हिंदी फिल्मसृष्टीमध्ये गझल-गोईवर अधिराज्य केले. कारण तलतसाहेब नेहमी अभिजात शायरांचे अशआर गायचे व त्या काळात अनेक दर्जेदार शायर- उदा. कैफ इरफानी, कमर जलालाबादी, जाँ निसार, शैलेंद्र, प्रेमधवन, अख्तर, साहिर लुधियानवी, खुमार बाराबंकवी, शकील बदायुनी, हसरत जयपुरी- असे दिग्गज व दर्जेदार शायर होऊन गेले. त्या सर्वांची काव्ये तलत यांनी आपल्या तरल व उत्कट मखमली स्वरांनी सचेत करून जनमानसात अजरामर केली. त्यावेळी ते फिल्मी तथा गैरफिल्मी गाणी गात असत. तलत यांना जर समजून घ्यायचे असेल तर प्रथमतः जो श्रोतावर्ग आहे त्याला किमान उर्दू भाषा व शायरीचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यांनी एकदा मुलाखतीत सांगितले होते की, गायनात त्यांनी कधीही छिछोऱ्या रचना (रावडी इलेमेन्ट्स) गायल्या नाहीत, किंबहुना तसा त्यांचा पिंडच नव्हता.

संगीतकार अनिल विश्वास यांच्या मार्गदर्शनातून तलत यांना पहिला ब्रेक मिळाला व नंतर त्यांनी शास्त्रीय रागांवर आधारित ‘एक मैं हूँ, एक मेरी बेकसी की शाम है’, ‘शुक्रिया शुक्रिया ए प्यार तेरा शुक्रिया’, ‘सीने में सुलगते हैं अरमाँ’, ‘मुहब्बत तर्क की मैने’ इ. सुपरहिट गाणी गायली. सदर रचना व गायकीने तत्कालीन भग्नहृदयी युवकांच्या मनांवर मखमली व आर्जवी स्वरांनी हळुवार फुंकर घातली. दरम्यान, 1950 ते 1955 या सहा वर्षांच्या काळात तलतसाहेब टॉपवर होते.

गझल हा काव्यप्रकार म्हणजे प्रेमीयुगुलांमधील हितगुज, सहज नैसर्गिक प्रेमभावना व प्रणयाराधना तसेच भग्न हृदयातील व्यथा व गीले-शिकवे यांचे मार्मिक रेखाटन व सादरीकरण. तलत यांच्या एकाच गीतावरून (‘मितवाऽऽ मितवाऽऽ लागी रे ये कैसी अनबुझ आग’- फिल्म देवदास) त्यांचा आवाज किती सहजपणे फिरायचा व जादुई रेंज (नॅचरॅलिस्टिक सिंगिंग) यांचा प्रत्यय येतो. येथे त्यांच्या गायनातून दुःख जणू मूर्त स्वरूप घेऊन पीडित/अधीर व्यक्तीस सावरत असल्याचे जाणवते. परंतु ‘तलत महमूद’ यांचा खऱ्या अर्थाने परिचय व त्यांचे कर्तृत्व त्यांच्या अनेक अनमोल गैरफिल्मी गीत व गझलांवरून दिसून येते. वस्तुतः त्यांच्या गैरफिल्मी गझलांची संख्या त्यांनी एकूण गायिलेल्या गाण्यांच्या अर्धी आहे. ‘ओ जाते है, आती है कयामत की सहर आज’, ‘होठों से गुलफिशाँ है ओ, आँखों से अश्कबार हम’, ‘कोई आरजू नहीं है, कोई मुद्दआ नहीं है’, ‘असर उसको जरा नहीं होता’, ‘कुछ और पूछिये, ये हकिकत ना पूछिये’, ‘आँख पडती हैं कहीं पाँव कहीं पडता है’, ‘दोनो जहाँ तेरी मुहब्बत में गुजार के’, ‘उसकी हसरत है जिसे दिल से’ या काही त्यांचा लोकप्रिय गझला. ज्याप्रमाणे इंग्लीश कवी पी. बी. शेली यांनी निराशावाद व त्याचे अविभाज्य अस्तित्व मान्य करून भावनिक स्तर विस्तृत केला, त्याचप्रमाणे तलत यांनी मनुष्याच्या जीवनात या नैराश्याचाही, दुःखाचाही वाटा अमीट व अटल आहे हे गायनाच्या कलेतून दाखवून दिले.

त्यांच्या जन्मशताब्दी दरम्यान विशेषतः दोन पुस्तके प्रकाशित झाली- 1. ‘तलत महमूद ः दी व्हेल्वेट व्हाईस’ (लेखक- मनेक प्रेमचंद) व 2. ‘तलत महमूद दी डेफिनिटिव्ह बायोग्राफी.’ हे पुस्तक त्यांची भाची सहर जमान यांनी याच महिन्यात प्रकाशित केले आहे. त्यात त्यांनी तलत यांच्या एकंदरीत जीवनप्रवासाबाबत संपूर्णतः विश्लेषण केले आहे. त्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासीया यांनी आपले बासरीवादन प्रथमच त्यांच्या ‘फिर वो ही शाम वही गम’ या गझलेसाठी केले होते. त्यात तलत यांनी हृदयविदारक बासरीला किती प्रेमपूर्वक स्वरस्पर्श केला होता हे नमूद केले आहे. तलत यांच्या स्वभावाविषयी बोलताना ते फार विनम्र तसेच उमद्या व्यक्तिमत्त्वाचे होते, शालीन होते याचाही उल्लेख आला आहे. तसेच ते काहीसे आत्मकेंद्री व अबोल स्वभावाचे होते, तसेच जेव्हा त्यांच्याशी वार्तालाप केला जाई तेव्हा ते फक्त ‘संगीत’ या विषयावरच जास्त बोलायचे.
सोनू निगम त्यांच्याविषयी बोलताना म्हणतात की, ‘नवोदित गायक/विद्यार्थ्यांनी तलत यांच्या खास गायनशैलीचा अभ्यास करायला हवा. त्यांच्या आवाजाचा पोत, अचूक शब्दोच्चारण व शायरीशी एकरूप होऊन त्यातील गर्भीत आशयानुरूप कसे गायन करावे हे सर्व शिकण्यासारखे आहे.’

आज तलत महमूद जन्मशताब्दीच्या पावन समयी मनोमन अशी कामना करतो की, भले तेव्हाचे सुवर्णयुग पुन्हा प्रगट होणे शक्य नाही, कारण संगीतक्षेत्रातील अभिरूची कालानुरूप बदलत आहे. वेगवेगळे प्रयोग/बदल होत आहेत व एकंदरीत सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये हे आगंतुक नावीन्य आपसूकच येत आहे. तरीही सद्यपिढीतील तरुणवर्ग जेव्हा जेव्हा जीवनात वैफल्यग्रस्त होईल तेव्हा कुणीतरी ‘तलतप्रेमी’ हळुवारपणे- ‘मेरी जिंदगी है जालीम तेरे गम से आशकारा’ किंवा ‘शाम-ए-गम की कसम आज गमगी है हम’ या नॉस्टॅल्‌‍जिक गझला गुणगुणत त्या पीडित व्यक्तीच्या दुःखावर, वैफल्यावर सुखद फुंकर घालील यात शंका नाही.
आजच्या तरुण पिढीला तलत महमूद हे नाव गझलशी कसे तादात्म्य (एकरूप) पावलेले आहे याचे सविस्तर विवेचन व अनेक अविस्मरणीय प्रसंग ‘तलत मेहमूद ः दी डेफिनिटिव्ह बायोग्राफी’ या पुस्तकातून मिळतील. त्यासाठी हे पुस्तक तलतप्रेमींनी संग्रही ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून काहीसा आत्मकेंद्री तलत वाचकांच्या मनात सतत गुंजारव करीत राहील यात शंका नाही!