… तर भाजपचा पराभव करणे शक्य

0
4

>> राहुल गांधी; अमेरिकेतील भाषणात मोदींनाही टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी हे मंगळवारी अमेरिकेत दाखल झाले असून, ते सहा दिवस अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. मंगळवारी राहुल गांधींनी सॅन फ्रान्सिस्को येथे कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील सिलिकॉन कॅम्पसमध्ये अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला. विरोधी पक्ष एकत्रित झाला, तर केंद्रातील भाजप सरकारचा पराभव करणे शक्य आहे. विरोधकांच्या एकजुटीसाठी आम्ही काम करत आहोत. विरोधकांच्या एकजुटीबरोबरच पर्यायी दृष्टिकोनाची गरज आहे, असे राहुल गांधींनी सांगितले.

आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जोरदार टोला लगावला.
भारतात काही लोक आहेत ज्यांना वाटते की आपण सर्वज्ञानी आहोत. नरेंद्र मोदी त्यापैकीच एक आहेत. त्यांना वाटते की आपल्याला सगळे माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवालाही सांगू शकतात की ब्रह्मांडात काय चालले आहे? ते वैज्ञानिकांना विज्ञानाविषयी आणि इतिहासकारांना इतिहासाविषयी समजवू शकतात. युद्ध कसे करायचे ते लष्कराला शिकवू शकतात. आकाशात विमानांनी भरारी कशी घ्यायची ते वायुदलाला समजावू शकतात. अगदी काहीही कुणालाही समजावू शकतात; पण प्रत्यक्षात त्यांना काहीही माहीत नाही. कारण आयुष्यात तुम्हाला कशाची माहिती हवी असेल, तर तुम्हाला आधी ऐकून घ्यावे लागते. मी भारत जोडो यात्रेत हेच शिकलो आहे की प्रत्येकाकडून काहीतरी शिकले पाहिजे, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला.

भारत जोडो यात्रेचा अनुभवही राहुल गांधींनी अमेरिकेत बोलताना सांगितला. भारत जोडो यात्रेच्या प्रवासात केवळ काँग्रेसच नाही, तर संपूर्ण भारत पावला पावलाने पुढे जात होता, असे राहुल गांधी म्हणाले.