तडजोड

0
314
  • पौर्णिमा केरकर

आतडे पिळवटून टाकणारा तिचा आक्रोश माझ्याच्यानं ऐकवत नाही. मलाही समजत नाही की मी तिच्यासाठी काय करू? तिच्या मनाचा चाललेला गोंधळ कळतो मलाही, पण तिला त्यातून कोणता मार्ग सांगायचा हीच मोठी मनाची गोची झालीय!

 

‘मी आता सगळं संपवून टाकणार… किती आणि कसं म्हणून सारं सहन करायचं, सहनशीलतेचा अंत झालाय आता माझ्या! एकटीच असते तर कदाचित तोंड घेऊन वाटा फुटतील त्या वाटेने गेलेही असते; पण कोवळ्या, निरागस चेहर्‍याकडं पाहिलं की काळीज तीळ तीळ तुटतं… मी काय करू आता तुम्हीच सांगा… तुम्हीच सांगा…’ आतडे पिळवटून टाकणारा तिचा आक्रोश माझ्याच्यानं ऐकवत नाही. मलाही समजत नाही की मी तिच्यासाठी काय करू? तिच्या मनाचा चाललेला गोंधळ कळतो मलाही, पण तिला त्यातून कोणता मार्ग सांगायचा हीच मोठी मनाची गोची झालीय.

लग्न हे एक स्वप्न असतं. त्यातल्या त्यात मनासारखा जोडीदार मिळाला तर बर्‍याच गोष्टी सुकर होतात. असे असले तरी ‘तडजोड’ या शब्दाला आयुष्यभर कुरवाळीत जीवनाचा प्रवास करावाच लागतो. ज्यांना या प्रवासात दमायला होते त्यांचे तर आयुष्य किचकट बनतेच; शिवाय सभोवतालही या गुंतावळ्यात अडकतो. मनात राहून राहून विचार येतो, आयुष्याला समजून-उमजून न घेताच आपण जगत असतो. जीवनाचा वेगच एवढा
असतो की काय बरे, काय वाईट हेही निवांतपणे जाणून घ्यायला वेळ नाही. तिने एवढा आकांत मांडण्यामागचे कारण काय? हे तर कोणी समजून घेतच नाही. लग्न करायचे ते एकमेकांच्या भावना, संवेदनांना जपत, प्रसंगी एकमेकांचा आधार बनत वाढण्यासाठी. पण अलीकडे कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त होताहेत. बर्‍याच वेळा त्यांची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला तर ती क्षुल्लक असतात. नाती जी जन्मोजन्मीची असतात. हजारो-लाखो रुपये खर्चून शेकडो लोकांच्या साक्षीने मान्य केलेली… ती एवढ्या सहजासहजी तुटून पडावीत? शेवटी आपले मनच असते ना ते की जे अनुबंध निर्माण करते आपल्या माणसांशी. घर-संसाराला, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एकत्रित बांधून ठेवण्याची किमया ते नाही करू शकणार का? गोतावळा खूप जमतो लग्नासाठी… पण नाते जेव्हा अगदीच नाजूक होत ताणले जाते तेव्हा मात्र सावरणारे हात अपवादानेच आढळतात. तिचा आकांत हा संसार तोडण्यासाठीचा नव्हता. तिला त्याचे लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचे होते ज्याच्याशी तिचं- तिच्या मुलाचं आयुष्य बांधलेले होतं.

त्याने पुरेसा वेळ आपल्याला द्यावा, जोडीने एखादा सिनेमा बघावा, मित्रमंडळीच्या लग्नात सहभागी व्हावे, त्याने तिच्या माहेरी एखाद दुसरी रात्र राहावे. तिच्या आईला जावई हा मुलासारखाच वाटावा असे त्याचे वागणे तिला अभिप्रेत होते. जमलंच तर एक छोटुकलं घर बांधावं, ही आणि अशीच तिची स्वप्नं. सर्वसामान्य जीवन जगणार्‍या व्यक्तिमनांचीच ही स्वप्नं होती. त्यामुळे तिच्या मागण्या काही जगावेगळ्या नव्हत्या. आता आता कोठेतरी ती त्या माणसांत समरस होत होती. तशी ती मुळापासून बालिश वृत्तीची. नाकावर राग असला तरी मनाने पारदर्शक. वेगळं काहीतरी करून स्वतःचं व्यक्तिमत्त्व विकसित करण्याचं सामर्थ्य आणि कौशल्य तिच्याकडं होतं. तिला समजून घेत तिच्या गुणदोषांसकट तिला स्वीकारणारी व्यक्ती भेटली असती तर ती निश्चित काहीतरी करू शकली असती. इतर गृहिणींना संसारात वावरताना जे भान कधीच येत नसते ते म्हणजे आपल्या चौकटीबाहेरही एक जग आहे. त्या जगाला समाज असे म्हटले जाते. आणि आपण त्या समाजाचे घटक आहोत. मग दैनंदिन जीवनातील थोडा वेळ समाजासाठी द्यावा असे कोणाला वाटत नाही. नवरा, बायको माझी मुलं हा एवढाच चौकोन. झिजायचे, करायचे ते फक्त त्यांच्यासाठीच! पण तिच्याकडे ही वेगळी दृष्टी होती. कणव होती. तिच्या डोळ्यांत अन् हृदयात माया, मनगटात धमक तर आहेच. कोणी सोबतीने नाही चालले तरी हरकत नाही… माझ्या पावलांना सवय आहेच नवनवीन वाटा शोधण्याची, असा स्वाभिमान तिच्याकडे उपजत असल्यानेच सूक्ष्म अहंकाराची छटा तिच्या स्वभावाला स्पर्शून जाते. त्यामुळे सभोवताली वावरणार्‍या ‘तिच्या’ माणसांना ‘तिला’ समजून घेता आले नाही. नात्यातील गुंतवळ इथूनच तर वाढत गेली… घुसमट… चिडचिड… आरडाओरडा… प्रचंड अस्वस्थता… तगमग. अगतिकता, असहायता… नुसतीच तळमळ… भकासपणा… रितेपण…

नवी नवरी असताना सासरी सासुरवाशिणीचे नवर्‍याशिवाय असते तरी कोण? बाकीच्या नात्यांना जपावं, वाढवावं लागतं. दुखणी-खुपणी काढावी लागतात. मर्जी सांभाळताना कोणाचे मन तर दुखावणार नाही ना याची चाहूल सतत घ्यावी लागते. वयाची वीस- पंचवीस वर्षे ज्या माणसात काढलेली असतात त्या नात्याला मागे टाकून सर्वस्व सासरी घालवायचे. सासरी मात्र तिच्या गळ्यात मंगळसूत्र पडल्या पडल्या सर्वच रितीरिवाज यायला हवेत असेच वाटते. नव्या जागेत माणसांना जुळवून घ्यायला वेळ लागतो. थोडी पटकन जुळवून घेतात; काहीना तर आयुष्यभर समरस होता येत नाही. सर्वच जाग्यांवर सासरचीच चुकतात असे मुळीच नाही. मानवी स्वभाव, वागणूक हे घटक एखाद्या व्यक्तिमनात संयत-संयमी असले की खूप गोष्टी सुकर होतात. ज्यांना कितीही समजावून सांगितले तरी जी बदलत नाहीत… हेकेखोरपणा, स्वार्थी वृत्ती चालूच ठेवतात, त्यांना जरा बाजूला करूया. पण ज्यांना सांगितले, थोडेसे समजावले तर जी समजून घेऊ शकतात त्यांना तर सांगून पाहायलाच हवे. त्यांची सकारात्मक ऊर्जा अशी वाया जाऊ देता कामा नये. ‘इगो’च सांभाळीत आयुष्य घालविले तर जगणं निसटूनच जाईल हातातून. तिच्या बाबतीत मी हेच अनुभवले आहे. हुशार, कृतिशील, समाजाविषयी आस्था असलेली. उच्च विद्याविभूषित, हजरजबाबी, समयसूचकता हे सर्वच गुण तिच्याकडे आहेत. असे असतानाही तिला येणारा राग अनावर आहे. त्या रागावर जर त्याने ती माझीच तर आहे, तिला घेऊया समजून, बघूया तिच्या कलाने वागून. नातं भरभक्कम करण्यासाठी एकमेकांत विश्वास तर निर्माण व्हायला हवा. माझ्यासाठी नाही, तर तिला बरं वाटावं म्हणून तिच्यासाठी. फक्त दोघंच एखाद्या दिवशी फिरायला जाणे. एकांतात गप्पा. आवडी-निवडी. घरात कोणाचे काही खटकत असेल तर तू नको मनावर घेऊस, मी आहे ना तुझ्याबरोबर असा विश्वास तिला दिला तर कोठे कोणता कमीपणा येईल? माणूस माझंच तर आहे… त्याच्यासाठी समंजस असलेल्या एकट्याने जरा नमते घेतले तर मोठेसे काय बिघडणार?
मी नाही घाबरत त्याच्याशिवाय एकटीचे जीवन जगायला, असेच ती म्हणते. हे वरवरचे असते. आतून ती हललेली आहे. ती दाखवत नाही तिचं कोसळून पडणं. तिला मनापासून तो हवा आहे. तिच्यापासून त्याचं दुरावत जाणं तिला सहन होत नाही. मनातून जरा बाजूला गेलेली नाती परत सांधाता येत नसावीत का? ती नव्याने जुळावीत यासाठी प्रयत्न तरी नको का करायला? कधीतरी दुरावा संपणार ही तिची आशा. त्यासाठी ती तडजोड करते. ती तशी तडजोड तिलाच करावी लागणार… तिची चूक असली-नसली तरीही! त्याच्यासाठी सगळेच गुन्हे माफ. तो कधीही, कोठेही, कोणालाच न सांगतासवरता गेला तरीही चालेल. तिलाही सांगायलाच हवे असे नाही. पण ती मात्र असे वागू शकत नाही. वागलीच तर त्याच्यासकट सगळे घरच तिच्या विरोधात उभे राहील. तिच्याही बाबतीत असेच घडले. ताणले गेले आहे नातेपरंपरेचे सुरक्षाकवच! ते ओलांडून पुढे पाऊल टाकणे तिला तसे कठीण नाही. मनात निर्धार असला तरी पावले घुटमळतात उंबरठ्याआत… ’तडजोड’ तिचा पाठलाग करीत राहते.
तिची ती तडफड, तो आकांत मला आतून पुरता ढवळून काढतो तेव्हा मीही तिच्या उद्ध्वस्त स्वप्नांचा विचार करीत, परिस्थितीशी तडजोड करीत माझी मलाच दोषी ठरवते…