तंबाखू सेवन ः मृत्यूला आमंत्रण

0
13
 • डॉ. मनाली महेश पवार

31 मे रोजी ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश, लोकांना तंबाखूच्या सेवनामुळे होणारे नुकसान सांगणे हा आहे. दरवर्षी लाखो लोकांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू होतो. जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखूचे दुष्परिणाम-

तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यूच्या वाढत्या आकडेवारीमुळे जागतिक आरोग्य संघटनेने 1987 मध्ये ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ सुरू केला. हा दिवस 7 एप्रिल 1988 रोजी पहिल्यांदा साजरा करण्यात आला. यानंतर दरवर्षी 31 मे रोजी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश, लोकांना तंबाखूच्या सेवनामुळे होणारे नुकसान सांगणे हा आहे. दरवर्षी लाखो लोकांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू होतो. जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखूचे दुष्परिणाम सांगून लोकांना तंबाखू सोडण्यास प्रवृत्त केले जाते.
तंबाखू म्हटल्यावर डोळ्यांसमोर उभे राहतात तोंडाचा, घशाचा किंवा फुफ्फुसाचा कर्करोग झालेले रुग्ण! तंबाखू सेवनाने फक्त कर्करोगच होतो असे नव्हे तर हृदयालाही त्रास होतो. याने पक्षाघात होऊ शकतो किंवा मधुमेहसारखा आजारही बळावू शकतो. म्हणूनच ‘धूम्रपान आरोग्यासाठी धोकादायक आहे’ हा फक्त विचार राहता कामा नये तर जनजागृतीही होणेही महत्त्वाचे आहे.

एका शोधपत्रात असा दावा करण्यात आला आहे की, 50 सिगरेट फुंकल्यानंतर फुफ्फुसातील प्रत्येक पेशीत सरासरी एक उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन होते. ‘उत्परिवर्तन’ याचा अर्थ जर एखादी व्यक्ती वर्षभर रोज 10 सिगरेट्‌‍स ओढत असेल तर त्याच्या फुफ्फुसातील प्रत्येक पेशीत 75 उत्परिवर्तन, श्वासनलिकेत 50, स्वरयंत्रात 20, मूत्राशयात 30 आणि यकृताच्या प्रत्येक पेशीत उत्पपरिवर्तन होतात.
धूम्रपानाचा संबंध कमीत कमी 17 प्रकारच्या कॅन्सरशी आहे. वास्तविक पेशीमधील प्रत्येक उत्परिवर्तन कॅन्सरचे कारण बनू शकते. अद्याप हे स्पष्ट झाले नाही की, कोणते विशिष्ट उत्परिवर्तन कॅन्सर पेशीमध्ये बदलण्यास जबाबदार असतात. उदा. एवढ्या उत्परिवर्तन संग्रहित झाल्यावरसुद्धा अनेक धूम्रपान करणाऱ्यांना कॅन्सर होत नाही. उत्परिवर्तन उपयुक्त ठिकाणी झाले तर कॅन्सर विकसित होऊ शकतो.
वरील उत्परिवर्तन कायमस्वरूपी असते आणि धूम्रपान सोडल्यावर ते पुन्हा ठीक होत नाही. परंतु धूम्रपान सोडल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम होतो. धूम्रपानामुळे व्यक्तीचे आयुष्य सरासरी 10 वर्षांनी कमी होते. एखादी व्यक्ती 30 वर्षे वयात धूम्रपान सोडत असेल तर त्याची अवेळी मृत्यूची शंका जवळजवळ संपुष्टात येते आणि जी व्यक्ती 50 वर्षे वयात धूम्रपान करणे बंद करते, त्याच्या बाबतीत अशी मृत्यूची शंका निम्मी होते.

तंबाखूमुळे व धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, हे आता सर्वांना माहीत झाले आहे. तंबाखूच्या सेवनाने तोंडात आणि धूम्रपानामुळे श्वासनलिका, फुफ्फुस यांचा कर्करोग होण्याचा मोठा धोका असतो. मात्र तंबाखूच्या सेवनामुळे व धूम्रपानामुळे हृदयाचे कार्य बंद पडण्याचा धोकाही बळावू शकतो. हृदयाचे कार्य बंद पडून दगावणाऱ्या रुग्णांपैकी अठरा टक्के रुग्ण हे तंबाखूचे सेवन करणारे असतात. हृदयविकाराचे प्रमाण वाढविण्यास प्रामुख्याने तंबाखू सेवन, अहितकर आहार-विहार व ताण-तणाव अशी जीवनशैली कारणीभूत आहे.
दिवसाला फक्त एक सिगरेट ओढणे हेसुद्धा हृदयविकाराचा धोका आपल्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात वाढवू शकते. धूम्रपान करणाऱ्यांसाठी केवळ कर्करोगच नव्हे तर कार्डिओव्हॅस्क्युलर विकारही होऊ शकतो जो तेवढाच प्राणघातक आहे. धूम्रपानामुळे ओढवणाऱ्या अकाली मृत्यूपैकी चाळीस टक्के मृत्यूंसाठी हृदयविकारच कारणीभूत ठरत असल्याचे आढळून आले आहे.

हृदयाचे कार्य मंदावत जाणे हा हळूहळू गंभीर स्वरूप धारण करणारा आजार आहे. यात हृदयाचे स्नायू कमकुवत होत जातात व कालांतराने कडक बनतात. असे झाल्याने त्यांची रक्ताभिसरण करण्याची क्षमता कमी होत जाते. यामुळे शरीराला महत्त्वाचा असा ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात पोचू शकत नाहीत. धूम्रपानामुळे धमन्यांच्या अस्तराला इजा पोचते व मेदाचा थर जमा होऊन धमन्या अरुंद होतात. यामुळे त्यांच्यामधून वाहणाऱ्या रक्तावरील दाब वाढतो. इतकेच नव्हे तर धुरामध्ये असलेल्या कार्बन मोनोक्साइडमुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. स्वाभाविकच रक्तातील ऑक्सिजनची पातळी राखण्यासाठी हृदयाला आपली पंपिंगची क्रिया करण्यासाठी अधिक जोर लावावा लागतो. सिगारेटच्या धुराबरोबर शरीरात ओढल्या जाणाऱ्या निकोटीनमुळे ॲड्रेनाइन अधिक प्रमाणात तयार होते व त्यामुळेही हृदय अधिक वेगाने आणि जोरजोरात धडधडू लागते. या सगळ्या कारणांंमुळे हार्ट फेलियरचा धोका अधिकच वाढतो.

धूम्रपानाविषयी लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. धूम्रपान करणाऱ्यांना कर्करोगाचा धोका तेवढाच माहीत असतो. त्यांच्या मते दिवसाला एक-दोन सिगारेट्‌‍सचे सेवन केल्यास काहीच होणार नाही. कर्करोगाच्या भीतीने सिगारेट्‌‍स ओढणारे, तंबाखू सेवन करणारे पूर्वी 20-25 जास्त सिगारेट्स ओढायचे. आता कमी प्रमाणात ओढतात. पूर्णतः तंबाखू सेवनाचा निषेध झालेला नाही. प्रमाण कमी केल्याने कर्करोगाचा धोका टळला असा त्यांचा गैरसमज आहे. मात्र अगदी थोडेदेखील धूम्रपान हृदयाला घातक ठरू शकते. हे काही केल्या कोणाच्या लक्षातच येत नाही. म्हणजे धूम्रपान पूर्णतः सोडणे हाच त्याच्यासाठी आरोग्यमंत्र आहे.

धूम्रपान करणाऱ्यांनी म्हणजेच तंबाखू सेवन करणाऱ्यांनी पुढील प्रकारची कोणतीही लक्षणे दिसल्यास सावध व्हावे. ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात-

 • श्वास घेण्यास त्रास होणे.
 • बोटे, पाय आणि पोटावर सूज असणे.
 • अचानक वजन वाढणे.
 • झोपताना श्वास घेण्यासाठी उशीची गरज वाटणे.
 • सततचा थकवा, चिडचिड, उदासीनता वाढणे.
  अशावेळी हृदयविकारतज्ज्ञांची भेट घ्यावी. हृदयाच्या तपासण्या कराव्यात. हृदयविकार किंवा अन्य विकारांपासून मुक्ती मिळण्यासाठी धूम्रपानाची सवय पूर्णपणे सोडावी लागेल. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या. हळूहळू अशा प्रकारची व्यसने सोडता येतात. तलब लागल्यावर विशिष्ट प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. तज्ज्ञाच्या मदतीने धूम्रपान, तंबाखू सेवनापासून मुक्त होण्याचा स्वतःहून प्रयत्न करा.
 • नियमित व्यायाम करा.
 • प्राणायाम, ध्यान आदी योगांचे आचरण करा.
 • शरीर निरोगी राहील, वजन वाढणार नाही याकडे पूर्ण लक्ष द्या.
  धूम्रपानामुळे युवापिढी व्यसनाधीन होताना दिसत आहे. जगात दर सहा सेकंदात एका व्यक्तीचा मृत्यू धूम्रपान केल्यामुळे होत आहे. सिगारेट ओढणे हे आता पुरुषांपुरतीच मर्यादित राहिलेले नाही. यांमध्ये स्त्रियाही मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. वाढत चाललेल्या अपेक्षा, कार्पोरेट सॅक्शनमध्ये काम करणाऱ्या मुली-महिला ताणतणाव घालवण्यासाठी, विसरण्यासाठी म्हणा पुरुषांप्रमाणेच सिगारेट ओढायला लागल्या आहेत तेव्हा वेळीच सावध व्हा.
 • तंबाखू सेवनाचे परिणाम लगेच समजत नाहीत तर त्याचे दूरगामी परिणाम आहेत.
 • भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
 • 90 टक्के फुफ्फुसाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर होण्याचे कारण धूम्रपान आहे.
 • तंबाखूमुळे छातीत दुखते, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, रक्तवाहिन्यांचा विकार जडतो.
 • धूम्रपानामुळे टीबीची शक्यता वाढते.
 • शारीरिक ताकद कमी होते व मानसिक सहनशीलता कमी होते.
 • गरोदर स्त्री धूम्रपान करत असेल तर त्यांच्यात गर्भपाताच्या समस्या निर्माण होतात. बाळ कमी वजनाचे जन्माला येते किंवा बाळाचा अचानक मृत्यू होतो.
 • तंबाखूच्या सेवनाने पुरुषांमध्ये नपुंसकत्व निर्माण होते.
  आज तुम्ही तंबाखू सेवन वा धूम्रपान सोडल्यास तुमच्या आरोग्यावर हितकर असा परिणाम दिसेल. तुमची आत्मशक्ती, आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमच्या मुलासाठी निरोगी आदर्श पालक बनाल. आजची युवापिढी जी व्यसनाधीन बनत आहे ते पालकांचे अनुकरण करूनच. म्हणूनच शालेय स्तरावरूनच तंबाखूविरोधी जनजागृती करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी प्रबोधन होण्यासाठी व्याख्याने आयोजित करावी, रॅली काढाव्यात, नाटके सादर करून जनजागृती करावी. त्यांच्या स्टेशनवरही तंबाखू विरोधात घोषवाक्ये लिहिता येतात.
  विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, पोस्टरसारख्या विविध स्पर्धा तंबाखूविरोधी थीम देऊन घडवून आणाव्यात. अशाप्रकारे अगदी शालेय जीवनापासूनच संस्कार लावू व आपली भावी पिढी निरोगी, व्यसनमुक्त होण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करू.