डॉ. बाबासाहेबांचा परिसस्पर्श…

0
8
  • शंभू भाऊ बांदेकर

आपण आपल्या बंधू-भगिनींना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा व त्यासाठी शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे पटवून देण्याचा आणि केवळ पटवून देण्याचाच नव्हे तर त्यासाठी आपणाला जे करणे शक्य आहे, ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचा मुहूर्त साधून 14 एप्रिलला श्री. गुरुदास शिवराम रेडकर यांच्या ‘क्रांतिसूर्य’ पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे निश्चित झाले. श्री. रेडकर यांचे ‘क्रांतिसूर्य’ हे पुस्तक म्हणजे, त्यांना विद्यार्थिदशेपासून सरकारी नोकरी लागून निवृत्त होईपर्यंत ते ‘दलित’ आहेत म्हणून त्यांना ज्या हाल-अपेष्टांना व छळणुकीला तोंड द्यावे लागले, विषमता-असमानता यांचा सामना करावा लागला, त्याचे वर्णन या पुस्तकात आहे. एकूण 23 लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले असून यातील जवळजवळ सर्व लेखांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या मागोवा घेण्यात आला आहे.
श्री. रेडकर यांनी आपल्या ‘मनोगता’मधून आपल्याला मिळालेली असमानतेची व विषमतेची वागणूक याबद्दल लिहिले आहे व पुस्तक प्रकाशनाच्या वेळच्या आपल्या प्रस्ताविकात ही खंत मांडली आहे.

माझा या पुस्तकाशी दोन प्रकारे संबंध आला. एक म्हणजे या पुस्तकाला प्रस्तावना मी लिहिली आहे व पुणे येथील लोकसंस्कृती प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तकाचे विमोचनही माझ्याच हस्ते पणजीत करण्यात आले होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा परिस्पर्श होतो तेव्हा’ या शीर्षकाखाली मी प्रस्तावना लिहिली आहे. त्यावर आणखी वेगळे भाष्य न करता पुस्तक प्रकाशनाच्या वेळी गोव्यातील एकूण दलित चळवळीसंबंधी लेखक, इतर वक्ते व माझ्याकडून ज्या भावना व्यक्त झाल्या, त्याबद्दल थोडक्यात भाष्य करून येथील सामाजिक चळवळीवर प्रकाश टाकावा, हा यामागील उद्देश आहे.

श्री. रेडकर यांनी आपल्या भाषणात आपण ‘सरकारी कर्मचारी संघटना’ बांधण्यासाठी केलेला प्रयत्न व सरकारी कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे त्या संघटनेला आलेले अपयश व सरकारी कर्मचाऱ्यांची गाडी अजूनही रुळावर येत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. इतर वक्त्यांनीही याबाबत मतप्रदर्शन करताना एकीचे महत्त्व विशद केले व कुठल्याही समाजातील एकीमुळे सरकारचे कसे फावते यावर विचार मांडले. मी अध्यक्षस्थानावरून बोलताना सरकारी नोकरीत असताना कै. दामोदर शंखे, कै. गजानन केनवडेकर व माहिती व प्रसिद्धी खात्यातील श्री. सोमा मोपकर आणि श्री. काशिनाथ सातार्डेकर आदींनी सामाजिक बांधीलकी मानून केलेले निवृत्तीपर्यंतचे कार्य अधोरेखित करीत म्हटले, ‘आज दलित समाजातील सरकारी अधिकाऱ्यांनी आयएएस पदवीपर्यंत झेप घेतली आहे, ही फार आनंदाची गोष्ट असली तरी अशा उच्चशिक्षित व वरच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी अंतर्मुख होऊन आपण समाजासाठी खरोखरच काही करतो आहोत का असा प्रश्न स्वतःला विचारून पाहावा,’ असे सांगून ‘आपण शिक्षणाचा फायदा घेऊन पुढे जात आहोत, पण आपला समाज मागे राहता कामा नये, याचे भानही असणे आवश्यक असल्याचे सांगून त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

कार्यक्रम चांगल्याप्रकारे पार पडला व चहापानाच्या निमित्ताने काही ज्ञातीबांधवानी सामाजिक चळवळीचा प्रश्न उकरून काढला, तेव्हा मी म्हणालो, ‘आपण नुकताच ‘क्रांतिसूर्य’ पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दलितोद्धाराच्या चौफेर कार्याचा आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा जगण्याचा मूलमंत्र देऊन थांबले नाहीत तर आपल्या उभ्या आयुष्यात हा मंत्र दीन-दलित, शोषित-पीडित अशा वंचित समाजाने प्रत्यक्षात आणावा म्हणून ते तन-मन-धनाने कार्यरत राहिले. यासाठी विद्यापीठापर्यंत शिक्षणाची सोय करून शिक्षणाची कवाडे खुली केली. जिथे कुठे खरोखरच संघर्षाची गरज आहे, तेथे संघटितपणे लढा देण्यासाठी ते सर्वशक्तीनिशी उभे राहिले. म्हणून आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या चरित्र्याचा व चारित्र्याचा अभ्यास केला पाहिजे. स्वतः उच्चविद्याविभूषित होऊन देशातील अडाणी, अज्ञानी, अशिक्षितांनासुद्धा शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन ‘विद्येनेच मनुष्या, श्रेष्ठत्व आले या समाजामाजि। न दिसे एकही वस्तू। विद्येनेही असाध्य आहे जी।’ याचे मर्म समजावून सांगितले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे याबाबतीतले कार्यसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. स्वतः हालअपेष्टा सोसून, दगडधोंडे खाऊन त्या वीरपत्नीने आणि महात्म्याने जे अतुलनीय कार्य केले, त्याला इतिहासात तोड नाही. अशिक्षितपणाचे चटके पुरुषांना आणि स्त्रियांनाही बसू नयेत म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे, गो. ग. आगरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव शिंदे आदी नररत्नांनी जे प्रयत्न केले व यासाठी इतरांचे शिव्याशाप खाऊन जे कार्य सातत्याने केले, त्याचा आपल्याला विसर पडता कामा नये. या साऱ्यांच्या कार्याचे महत्त्व आपण तर जाणून घेतले पाहिजेच, पण इतरांनाही त्याबाबत अवगत केले पाहिजे व हे आपले ‘कर्तव्य’ आहे असे मानून पुढे नेले पाहिजे.

मग आणखीही काही प्रश्नोत्तरे झाली. त्यानंतर समारोपाकडे येत मी म्हणालो, ‘बंधुनो, तुम्ही सगळे शिकले-सवरलेले आहात. बरे काय, वाईट काय अन्‌‍ खरे काय, खोटे काय याचा विचार करण्याची कुवत आपणामध्ये आहे. त्यामुळे सारासार विचार करून आपण आपल्या बंधू-भगिनींना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा व त्यासाठी शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे पटवून देण्याचा आणि केवळ पटवून देण्याचाच नव्हे तर त्यासाठी आपणाला जे करणे शक्य आहे, ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या तळमळीने, कळकळीने वा जिद्दीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले दांपत्याने कार्य केले त्यांच्या विचारांचा परिसस्पर्श आपल्यालाही झाला आहे, हे दाखविण्याची तुम्हालाही ही एक प्रकारची संधी आहे, त्या संधीचे आपण सोने करूया, हीच नम्र विनंती.’