टेन्शन टेन्शन… हायपरटेन्शन…

0
26
  • डॉ. मनाली महेश पवार

17 मे हा ‘वर्ल्ड हायपरटेन्शन डे’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश, ‘उच्च रक्तदाब’ या आजाराबाबत लोकांमध्ये जागृती करणे हा आहे. हाय ब्लडप्रेशरची ही समस्या आता जगभर पसरलेली आहे. जाणून घेऊया या व्याधीविषयी…

दरवर्षी 17 मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिवस किंवा ‘वर्ल्ड हायपरटेन्शन डे’ साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश, ‘उच्च रक्तदाब’ या आजाराबाबत लोकांमध्ये जागृती करणे हा आहे. हाय ब्लडप्रेशरची ही समस्या आता जगभर पसरलेली आहे. ही एक अशी स्थिती आहे, की ती ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखली जाते. कारण सुरुवातीला काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. अनेकांना आपल्याला हा आजार आहे हे माहीतच नसते. त्यामुळे वेळेवर उपचार होत नाहीत व हळूहळू हा आजार वाढत जातो, हृदयाच्या क्रियांमध्ये बिघाड होत जातो. मायोकार्डियल इन्फेक्शन, स्ट्रोक, हार्ट फेल्युअरसारखे विकार काहीच धोक्याची सूचना न देता येतात. या समस्यांवर वेळीच नियंत्रण ठेवले गेले नाही तर उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात किंवा हृदयाशी संबंधित दुसऱ्या कोणत्याही समस्या उद्भवू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेने ‘रक्तदाब त्वरित मोजावा, तो नियंत्रणात ठेवावा आणि दीर्घकाळ जगावे’ असा संदेश दिला आहे. प्रत्येकाचे शरीर विशिष्ट प्रकारे बनविलेले असते. शरीराच्या बनावटीनुसार प्रत्येक शरीर थोड्याफार प्रमाणात कमी-अधिक रक्तदाबावर चालू राहू शकते. निसर्गाने मनुष्याचे शरीर बनवताना ते कोणत्या रक्तदाबावर चालावे याबाबत एक विशिष्ट कल्पना ठेवलेली दिसते. तरीही रक्तदाब एका विशिष्ट संख्येतच असावा असा शंभर टक्के नियम नाही. वैद्यकशास्त्राने किती रक्तदाब असावा याची एक संख्या निश्चित केलेली आहे. त्यासाठी अनेकांचे अवलोकन करून हे ठरवलेले आहे. कुणाचा रक्तदाब मागे-पुढे असला तर रोग झाला असे म्हणता येणार नाही. तसेच रक्तदाब कमी-अधिक झाल्याची लक्षणे शरीरावर दिसत असली व त्रास होत असला; परंतु रक्तदाब मोजल्यावर ती संख्या ठीक आहे म्हणून प्रत्यक्ष होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष केले गेले तर पुढे शरीराचा घात होऊ शकतो.
रक्तदाब म्हणजे नेमके काय?
रस व रक्त हे शरीरातील द्रवधातू आहेत. हे दोन्ही धातू सर्व शरीराला व्यापून असतात. रात्रंदिवस गतिशील असतात; मात्र रक्तवाहिन्यांमध्ये बंदिस्त असतात. हात, पाय, शरीरातील यकृतादी अवयव, आतडी वगैरे सर्व अवयवांकडे रक्त पोचते खरे, पण ते रक्तवाहिन्यांमार्फतच. या रक्ताभिसरणातून ‘रक्तदाब’ तयार होतो.

शरीरातील हृदय हे भात्याप्रमाणे काम करीत असते. भाता वर उचलल्यानंतर हवा आत शिरते व भाता दाबल्यानंतर हवा बाहेर पडते. तसेच हृदयात असलेले रक्त हृदय आकुंचन पावल्यानंतर धमन्यांमार्फत सर्व शरीरभर पसरावे अशी योजना असते. हृदयाची पिशवी शिथिल झाली की आत जागा झाल्यामुळे ज्यातून प्राणवायू निघून गेलेला आहे असे अशुद्ध रक्त हृदयात येते. नंतर ते अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे पाठवले जाते. तेथे शुद्ध होऊन पुन्हा हृदयात येते. नंतर हे शुद्ध रक्त हृदयाच्या आकुंचनाबरोबर धमन्यांमार्फत सर्व शरीरभर पोचविले जाते. हृदयाच्या स्नायूत अशक्तता आल्यास, हृदयाचे आकुंचन अधिक व्हावे लागते, जेणेकरून रक्त बाहेर टाकले जाईल. तसेच रक्तात अशुद्धता वाढल्यास, रक्त जाड (घट्ट) झाल्यास रक्तावरचा दाब बदलू शकतो व तो दाब सर्व धमन्यांमध्ये जाणवतो.

रक्तदाब कमी झाल्यास रक्त सर्व वाहिन्यांमध्ये हव्या त्या वेगाने व हव्या त्या प्रमाणात जाऊ शकत नाही. असे झाल्याने रक्त हाता-पायांच्या टोकांपर्यंत वा डोक्यापर्यंत गेले नाही तर अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे शरीराचे काम नीट चालू शकत नाही. जास्त दाब दिला तर रक्त शरीराच्या कानाकोपऱ्यात पोचू शकते, पण त्याचा ताण शेवटी हृदयावरच येतो. हृदय आकुंचन पावतेवेळी रक्तदाब साधारण 120 असतो व प्रसरण पावते त्यावेळी 80 असतो. वयोमानाप्रमाणे 140- 90 रक्तदाब असला तरी शरीराला त्रास न होता रक्ताभिसरणाची क्रिया नीट चालू राहू शकते. पण रक्तदाब यापेक्षा वर-खाली गेल्यास तो विकार आहे असे समजून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असते.
आयुर्वेदात ‘रक्तदाब’ या नावाने वेगळी अशी व्याधी सांगितलेली आढळत नाही. मात्र शरीरातील रस-रक्त धातूंच्या गतीतील विकृतीमुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य विकारांपैकी हा एक विकार होय. ही गतीविकृती रक्ताभिसरणास कारणीभूत असणाऱ्या हृदय किंवा रक्तवाहिन्यांतील बिघाडामुळे होऊ शकते, शरीरातील अतिरिक्त क्लेदांश मूत्रामार्फत वाहून नेणाऱ्या किडणीचे काम व्यवस्थित होत नसल्याने उद्भवू शकते किंवा अति मानसिक ताणामुळे, अति विचारांमुळे मेंदूच्या अति श्रमाने होऊ शकते.

  • रक्तदाबाची सामान्य कारणे
  • जीवनशैलीतील अनिर्बंधता व बेशिस्तपणा, खाण्यापिण्यातील व वागण्यातील अनियमितता.
  • व्यायामाचा अभाव.
  • पचायला जड अशा मेदस्वी पदार्थांचे अति सेवन. उदा. मांसाहार, तेल, डालडा, चीज इत्यादी.
  • फास्टफूड, जंकफूडचे अति सेवन.
  • अतिरिक्त धूम्रपान व मद्यपान.
  • रक्तदाबाचा त्रास होण्यास सध्याच्या काळातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मनावरचा अतिरिक्त ताण. सध्या या कारणामुळे रक्तदाबाचा विकार असणाऱ्या अनेक व्यक्ती आढळतात. ऐपतीपेक्षा सगळ्या बाबतीत जास्त मिळावं, तुलनात्मक जीवन, इतरांप्रमाणे आपल्यालाही सगळ्या सुखसोयी भोगण्याची आस, पैशांचा- संपत्तीचा- दागदागिन्यांचा हव्यास व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इतरांशी स्पर्धा. या सगळ्यांमुळे रक्तदाब वाढतो.
  • रक्तदाब वाढल्याची लक्षणे
  • डोकेदुखी, चक्कर येणे, डोके जड होणे.
  • अवेळी डोळ्यांवर झापड येणे, पण योग्य वेळी झोप न येणे.
  • छातीत धडधडणे.
  • चालताना दम लागणे.
  • छातीत दुखणे.
  • अकारण चिडचिड, दुसऱ्यांचे बोलणे-हसणेही सहन न होणे.
  • अशक्तपणा, गळून गेल्यासारखे वाटणे.
    सुरुवातीला ही लक्षणे सतत दिसत नाहीत. काही वेळाने आपोआप नाहीशी होतात. अशा वेळेला लक्षणे दिसत असताना आवर्जून तपासणी करून घेतली तरच उच्च रक्तदाबाचे निदान होऊ शकते. कैकवेळेला रक्तदाब वाढला तरी व्यक्तीला काहीही लक्षणे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत बहुदा त्रास होत नाही म्हणून तपासणी केली जात नाही किंवा औषधे अनियमित घेतली जातात. या दोन्ही गोष्टी आरोग्यास घातक ठरू शकतात.
    रक्तदाबाचा त्रास सुरू झाला की तो शेवटपर्यंत राहणार. आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार असे काहींना वाटते, मात्र हे प्रत्येक केसमध्ये लागू होत नाही. वेळीच निदान होणे, मूळ कारण लक्षात घेऊन ते टाळायची तयारी असणे व रस-रक्ताच्या गती-विकृतीवर योग्य उपचार सुरू करणे या गोष्टींनी रक्तदाब बराही होऊ शकतो. जितक्या लवकर नियमित व योग्य उपचार केले जातील तितक्या लवकर आराम मिळेल.
    रक्तदाबाचा विकार मुळात होऊ नये यासाठी अगोदर काळजी घ्यावी. रक्तदाब बहुतांशी अनुवांशिक असल्याने विशेष काळजी घ्यावी. खरेतर हा आजार चाळिशीनंतरचा समजला जायचा, पण आता हा आजार तरुणाईतही आढळू लागला आहे. रक्तदाब नियंत्रित ठेवण्याबरोबरच तो मुळातून बरा होण्यासाठी योग्य उपचार करावेत. यात महत्त्वाचे म्हणजे- ‘निदानपरिवर्जन’- ज्या कारणाने रक्तदाब वाढता त्या कारणाचा प्रथम नाश करावा. संतुलित आहार, आचरणातील बदलांमुळे रक्तदाब मुळापासून बरा होण्यास मदत होते.
  • रक्तदाब असणाऱ्यांनी तळलेले, तेलकट पदार्थ पूर्ण टाळावेत.
  • चीज, श्रीखंड, मांसाहार, अंडी, पावटा, चवळी, हरबरा, वाटाणा, चणे इत्यादीसारखे पचायला जड असणारे पदार्थ पूर्ण वर्ज्य करावेत.
  • कच्चे मीठ किंवा वरून मीठ घ्यायची सवय असल्यास ती सोडावी.
  • किमान वीस-तीस मिनिटे चालावे.
  • योगासने करावीत. प्राणायाम हा महत्त्वाचा योगप्रकार उच्च रक्तदाबामध्ये चांगले कार्य करतो. शवासन हे आसन खूप फायदेशीर ठरते.
  • शरीराला थकवणारे व्यायामप्रकार करू नयेत.
  • रात्री लवकर झोपावे. प्रकृतीनुरूप साधारण सहा ते सात तास शांत झोप गरजेची.
  • रसरक्त अभिसरणाला मदत होण्यासाठी, गतीचे नियमन होण्यासाठी व रक्तवाहिन्यांतील काठिण्य जाण्यासाठी सर्वांगाला रोज अभ्यंग करावे. त्याचप्रमाणे आयुर्वेदशास्त्रानुसार उत्तम वैद्यांकडून त्रिदोष संतुलनासाठी स्नेहन-स्वेदनपूर्वक विरेचन, बस्ती आदी पंचकर्म करून घ्यावेत.
  • शिरोधारा, शिरोबस्ती, कर्णपूरण, पिंडस्वेदन वगैरे उपचारपद्धती खूपच फायदेशीर ठरतात.
  • रक्तदाबाच्या विशिष्ट अशा एकाच प्रकारच्या गोळ्या नसतात. प्रकृती, वय, रक्तदाबाचा त्रास होण्यामागचे कारण इत्यादींचा विचार करून औषधे निवडावी लागतात. उदा. किडणीचे काम व्यवस्थित होत नसल्यास गोमूत्रयुक्त चंद्रप्रभावटी, पुनर्नवासव, गोक्षुरादी औषधांचा वापर करावा लागतो. हृदयामुळे, रक्तवाहिन्यांमधील काठीण्यामुळे रक्तदाबाचा त्रास होत असल्यास बृहत्‌‍वातचिंतामणि रस, सुवर्णभस्म, अभ्रकभस्म, अर्जुनारिष्ट वगैरे औषधे प्रकृतीनुसार योजावी लागतात. रक्तदाबाचे मूळ कारण मेंदूशी असल्याने जटामांसी, ब्राह्मी वगैरे औषधांचा उत्तम उपयोग होतो. औषधोपचार वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावेत.
    संतुलित आहार, निर्व्यसनी जीवनपद्धती, व्यायाम, चालणे, योग, संगीत व मानसिक स्वास्थ्य यांची जोड मिळाली तर रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते.