टाच दुखते… नेहमीचेच दुखणे!

0
39
 • डॉ. मनाली महेश पवार

दुखणे म्हटले की प्रथमदर्शनी सर्वजण जरा दुर्लक्षच करतात. मनुष्य म्हटला की दुखणे-खुपणे आलेच असा सगळ्यांचा समज असतो. पण हे दुखणे जेव्हा नेहमीच्या शारीरिक क्रियांना बाधा निर्माण करते तेव्हा मात्र चिंता उत्पन्न होते. म्हणून दुखणे कोणतेही असू द्या- अगदी टाचदुखी का असेना- त्यावर सुरुवातीपासूनच योग्य औषधोपचार व काळजी घ्यायला हवी.

दुखणे म्हटले की प्रथमदर्शनी सर्वजण जरा दुर्लक्षच करतात. मनुष्य म्हटला की दुखणे-खुपणे आलेच असा सगळ्यांचा समज असतो. पण हे दुखणे जेव्हा नेहमीच्या शारीरिक क्रियांना बाधा निर्माण करते तेव्हा मात्र चिंता उत्पन्न होते. म्हणून दुखणे कोणतेही असू द्या- अगदी टाचदुखी का असेना- त्यावर सुरुवातीपासूनच योग्य औषधोपचार व काळजी घ्यायला हवी. ‘टाचदुखी’ हे एक असे दुखणे आहे ज्याकडे सर्वप्रथम सगळेच दुर्लक्ष करतात. पण नंतर हीच टाचदुखी डोकेदुखी होऊन बसते. टाचदुखीचा त्रास होण्यामागची कारणे समजण्यासाठी आपल्या तळव्याची माहिती करून घेऊया.

पायाच्या तळव्याचे टाच, चवडा, बोटे आणि टाचेला चवड्याशी जोडणारी कमान असे चार मुख्य भाग असतात. तळव्याची ही कमान ‘प्लांटर फेशिया’ नावाच्या अस्थिबंधनापासून बनलेली असते. चालण्याच्या क्रियेमध्ये आपल्या वजनाच्या पंचवीस पट वजन टाचेवर पडत असते. या भाराची विभागणी करून, त्याला पेलण्याचे काम ‘प्लांटर फेशिया’ हे अस्थिबंधन वर्षानुवर्षे बेमालूमपणे करीत असते. त्यामध्ये तळव्याची चरबीची गादी आणि स्नायू यांची मदत साहजिकच होत असते. कालांतराने पावलाच्या गादीची थोडीफार झीज होते. याशिवाय काही कारणांनी पावलाचा भार पेलण्याच्या अवस्थेवर अतिरिक्त ताण पडतो, त्यामुळे अस्थिबंधन दुखावले जाते आणि तळवे, विशेषतः टाचदुखीला सुरुवात होते.

साधारणपणे चाळिशीच्या पुढच्या वयात हे दुखणे जास्तकरून जाणवते. हा त्रास पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त प्रमाणात होतो. ज्यांचे वजन खूप जास्त असते अशा स्थूल व्यक्तींना हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. तळपाय एकदम सपाट असतील किंवा पायातील हाडांच्या कमानी खूप उंच असतील तरीही टाचा दुखण्याचा त्रास होण्याची शक्यता बळावते.
चुकीच्या पद्धतीने चालणाऱ्यांना, पाय आपटत नृत्य करणाऱ्यांना, लांब पल्ल्याचे अंतर धावणाऱ्या धावपटूंना हे त्रास काही काळानंतर जाणवू लागतात. कारखान्यात साताठ तास उभे राहून काम करणारे कामगार, शिक्षक, पोलीस, बसकंडक्टर, हॉटेलमधील स्वयंपाकी, हातगाडीवाले अशा व्यवसायांत हे त्रास होणाऱ्या व्यक्ती जास्त प्रमाणात आढळतात.
टाचदुखीचे प्रकार

 1. प्लान्टर फेसायटिस ः पायाच्या तळव्यांमध्ये टाचेपासून पायाच्या बोटांच्या हाडांना जोडणारा एक घट्ट व जाड असा मांसल पट्टा असतो त्याला ‘प्लान्टर फेशिया’ म्हणतात. खूप कडक पादत्राणे, सपाट चपला, स्लीपर्स वापरणाऱ्यांना हा त्रास हमखास होतो. यामध्ये तळव्यांना आणि टाचांना काहीतरी तीक्ष्ण वस्तू टोचत राहिल्याप्रमाणे वेदना होत राहतात.
 2. बर्सायटिस ः कोणत्याही सांध्यापाशी हाडे, स्नायू आणि स्नायूबंध यांमध्ये एक छोट्या पिशवीसारखा भाग असतो. त्यात घट्ट द्रव असतो. याला ‘बर्सा’ म्हणतात. टाचेजवळच्या बर्साला जर सूज आली तर त्यामुळे टाचा कमालीच्या वेदनादायी बनतात.
 3. हील स्पर ः यामध्ये टाचेच्या हाडांच्या तळाशी कॅल्शियम जमा होऊन एक टोकदार टोक निर्माण होते. उभे राहिल्यावर, चालताना टाचेच्या तळाशी असलेल्या जाड मांसात भागात हे टोक रुतल्यामुळे खूप वेदना होतात आणि चालता येणे वेदनामय होते.
 4. अकिलिस टेन्डिनायटिस ः टाच आणि पोटरी यांना जोडणारा जो स्नायूबंध असतो, त्याला अकिलिस टेन्डन म्हणतात. या स्नायुबंधाला पाय मुरगळल्याने सूज येते. त्यामुळे टाच दुखू लागते. लांब अंतराच्या शर्यती पळणाऱ्या, टेनिस, बॅडमिंटन खेळ खेळणाऱ्या लोकांत हे झालेले दिसून येते.
 5. टार्सल टनेल सिंड्रोम ः ज्यामध्ये पायाचे मज्जातंतू दाबले जातात. हाडांचा जंतुसंसर्ग, संधिवात, काही ट्युमर्स, हाडांमध्ये निर्माण होणाऱ्या गाठी, पाठीच्या कण्याचे काही आजार वगैरेंमुळे टाच वेदनाग्रस्त होऊ शकते.
  टाचदुखीचे निदान करण्यासाठी रुग्णाच्या वेदनांचे वर्णन कोणत्या प्रकारात मोडते ते पाहावे. त्याचप्रमाणे हाताने तपासणी करून निदान करावे. यानंतर पायाचा एक्स-रे, एमआरआय, गरज पडल्यास काही रक्ततपासण्यांची मदत घ्यावी.

टाचदुखीवर उपचार
टाचदुखीवर उपचारांपेक्षा काळजी घेणे जास्त गरजेचे असते.

 • शक्य तेवढी विश्रांती.
 • ज्या गोष्टीमुळे त्रास होतो त्या टाळाव्यात. म्हणजे खूप वेळ उभे राहणे, पळणे, उड्या मारणे, नृत्य इत्यादी गोष्टींपासून काहीकाळ विश्रांती घ्यावी.
 • झोपताना पाय सरळ व थोड्या उंचावर करून ठेवावा.
 • बर्फाचा शेक घ्यावा.
 • स्पंजाची गादी असलेली पादत्राणे वापरावीत.
 • घरात मऊ टाच असलेल्या चपला वापराव्यात.
 • हीलस्परमध्ये, बुटांमध्ये सिलिकॉनचे मऊ इनसोल्स वापरल्यास दुखणे थांबते.
 • पायाला नियमितपणे हलका मसाज करावा, तळपायाला- घोट्याला व्यायाम द्यावा, पाय लांब पसरून तळपाय ताणून पुढे-मागे करावा. डाव्या-उजव्या बाजूस फिरवावा आणि मग गोल गोल फिरवावा.
 • जमिनीवर एखादी बाटली किंवा गोल डबा ठेवून त्यावर पाय ठेवून तो रोल करत राहिल्यासदेखील या दुखण्यामध्ये आराम मिळतो.
 • बादली किंवा टबमध्ये कोमट पाणी घ्यावे, त्यामध्ये खडे मीठ टाकावे आणि पंधरा ते वीस मिनिटे या पाण्यात पाय टाकून बसावे. पायांना शेक मिळतो व आराम मिळतो.
 • साधारण एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद घालून दहा मिनिटे मंद आचेवर गरम करून घ्यावे. नंतर या दुधात मध घालून प्यावे. यानेही टाचदुखीपासून आराम मिळतो.
 • बॉलचा व्यायाम करावा. बॉल टाचांच्या मदतीनेच मागे-पुढे करावे. असा व्यायाम रोज सकाळ-संध्याकाळ किमान पाच मिनिटे तरी करावा.
 • निरगुंडीची पाने पाण्यात टाकून पाणी चांगले उकळून घ्यावे व त्या पाण्याने शेक घ्यावा.
 • भिंतीला हात टेकवून पायांच्या बोटांवर उभे राहावे आणि पायांच्या टाचा वर उचलाव्यात, आणि अशा स्थितीत मग जागच्या जागी पायांच्या नुसत्या बोटांवरच चालावे. याने टाचांना आराम मिळतो.
  आयुर्वेदशास्त्राप्रमाणे या व्याधीस ‘वातकंटक’ असे म्हणता येईल. उंच-सखल जागी अचानक चुकीचे पाऊल पडल्याने किंवा अतिप्रमाणात पायी प्रवास करण्याने, अतिश्रम करण्याने वात प्रकुपित होऊन- गुल्फसंधीच्या ठिकाणी आश्रित होऊन- सूज व वेदना उत्पन्न करतो. अशा व्याधीस वातकंटक म्हणतात. म्हणजेच पाय मुरगळणे, टाच दुखणे म्हणू शकतो.
  टाचदुखीची चिकित्सा सांगताना वाताची चिकित्सा सांगितली आहे.
 • यामध्ये लेपगोळीचा उष्ण लेप करावा.
 • वारूहळद, रक्तचंदन, तुरटी, आंबेहळद यांचाही लेप लाभदायी ठरतो.
 • यामध्ये तापस्वेद, अश्मस्वेद, अवगाह स्वेद सांगितला आहे. तसेच शलकिने दहनकर्म करावे. ही चिकित्सा वैद्याच्या सल्ल्यानेच करावी.
 • मातीची वीट लोखंडी कढईत गरम करून त्या गरम विटेवर टाच पकडून वरून दशमूल काढा ओतावा. याने टाचदुखी थांबते. ही चिकित्सा साधारण एक आठवडा करावी.
 • वीट गरम करून त्यावर रुईचे पान बांधून सोसेल एवढा टाच ठेवून स्वेद घ्यावा.
 • एखादा चपटा दगड गरम करून, खाली फरशीवर ठेवून, त्या दगडावर टाच गोलाकार फिरवावी.