झांट्ये कंपनीची चित्रपटगृहे पुन्हा सुरू करणार

0
30

>> प्रवीण झांट्ये यांची माहिती

>> पणजीतील सम्राट, अशोक, मडगावातील विशांतचा समावेश

एकेकाळी चित्रपट रसिकांची आवडती चित्रपटगृहे असलेली राजधानी पणजी शहरातील सम्राट, व अशोक व मडगाव शहरातील सिने विशांतफ ही सध्या बंद पडलेली झांट्ये कंपनीची सिंगल स्क्रिन चित्रपटगृहे पुन्हा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती काल प्रवीण झांट्ये यांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली.

वरील तिन्ही चित्रपटगृहांचे नुतनीकरण करण्याचे काम झांट्ये कंपनीने हाती घेतले आहे. ते आता लवकरच पूर्ण होणार असून त्यानंतर ही तिन्ही चित्रपटगृहे शहरातील सिनेरसिकांचे मनोरंजन करण्यासाठी नव्याने सज्ज होणार आहेत. अशी माहिती काल श्री. झांट्ये यांनी दिली. गोव्यात मल्टीप्लेक्स थिएटर्सचे आगमन होण्यापूर्वी पणजी शहरात सम्राट व अशोक ही एकाच इमारतीत असलेली सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे अत्यंत लोकप्रिय होती व तेथे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या खेळांना चित्रपट रसिक गर्दी करत असत. मडगाव येथे त्या काळी सिने मेट्रोपॉल व सिने विशांत ही चित्रपटगृहे लोकप्रिय होती. मात्र काळाच्या ओघात मेट्रोपॉल थिएटर बंद पडले. मात्र, सिने विशांत अजूनही स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे.

नंतर 2000 सालानंतर गोवा हे इफ्फीसाठीचे कायम केंद्र बनले आणि पणजी शहरात मल्टिप्लेक्स उभे राहिले. कालांतराने आयनॉक्स कंपनीने पणजीप्रमाणेच मडगाव येथेही दोन स्क्रिन असलेले मल्टिप्लेक्स सुरू केले व सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांकडे सिनेरसिकांनी पाठ फिरवण्यास सुरूवात केली. मात्र, अजून झांट्ये कंपनीची सम्राट, अशोक, सिने विशांत आदी सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे मल्टिप्लेक्स थिएटरर्सशी स्पर्धा करीत टिकून आहेत. झांट्ये कंपनीने ही सिंगल स्क्रीन थिएटर्स चालू ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ही थिएटर्स अजूनही दिमाखाने उभी आहेत. तिकिटांचे माफक दर हे या सिंगल स्क्रीन थिएटर्सचे वैशिष्ट्य असून गरिबांची थिएटर्स अशी ह्या चित्रपटगृहांची ओळख आहे. देशातील मेट्रो व अन्य छोट्या शहरातील सिंगल स्क्रीन थिएटर्स एकामागोमाग एक बंद पडत असताना गोव्यातील ही सिंगल स्क्रीन थिएटर्स अजून स्वतःचे अस्तित्त्व टिकवून आहेत हे वैशिष्ट्यपूर्ण होय.