जो बायडन यांच्या भारत दौऱ्याबाबत अनिश्चितता

0
6

भारतात होत असलेल्या जी-20 परिषदेच्या निमित्ताने विविध देशांचे प्रमुख भारतात येणे अपेक्षित आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारत दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भारत दौऱ्याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. जो बायडन यांच्या पत्नी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या आहेत. त्यामुळे बायडन यांच्या भारत दौऱ्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल्ल बायडन यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली; मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याकडून नियमितपणे चाचणी करण्यात येणार असून, आजाराशी संबंधित लक्षणांवर देखरेख केली जात असल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले आहे.

जी-20 परिषदेसाठी काही दिवस राहिले असताना बायडन यांच्या बाबत समोर आलेल्या या वृत्तानंतर त्यांच्या भारत दौऱ्याबाबत व्हाईट हाऊसने कोणतीही टिप्पणी केलेली नाही. नियोजित कार्यक्रमानुसार राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे 7 सप्टेंबर रोजी भारतात दाखल होणार आहेत आणि 10 सप्टेंबर रोजी पुन्हा अमेरिकेसाठी परतणार आहेत.

जो बायडन यांनी जी-20 परिषदेतून माघार घेतल्यास तो मोठा धक्का असेल. याआधी रशियाचे राष्ट्रपती पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी जी-20 मधून माघार घेतली आहे.

कोणत्या देशांचे प्रमुख हजर राहणार?
जी-20 परिषदेसाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे नवी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत.