जेटी अपघातात जखमी पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

0
6

>> चुकीच्या दिशेने आलेले वाहन ठरले कारणीभूत

मुरगाव जेटी येथे रविवारी रात्री दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात जखमी झालेले पोलीस कर्मचारी नीतेश तुकाराम कळंगुटकर (45, रा. सडा) यांचे इस्पितळात उपचारादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास निधन झाले. अपघातात जखमी झालेला दुसरा दुचाकी चालक रोहित कुमार बिंद याच्यावर इस्पितळात उपचार करून त्याला घरी पाठविण्यात आले. नीतेश कळंगुटकर हे पणजी पोलीस मुख्यालयात सुरक्षा विभागात कार्यरत होते.

मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास सडा येथून रोहित कुमार बिंद हा आपली दुचाकीने (क्र. जीए-06-बी-6147) वास्कोच्या दिशेने जात होता, तर वास्कोहून नीतेश कळंगुटकर हे आपल्या दुचाकीने (क्र. जीए-06-एसी-1151) सडा येथे आपल्या निवासस्थानी येत होते. याचवेळी जेटी येथे वास्कोहून चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनापासून अपघात टाळण्यासाठी रोहित कुमार हा बाहेर गेला असता त्याच्या दुचाकीची धडक नीतेश कळंगुटकर यांच्या दुचाकीला समोरासमोर बसली. या अपघातात दोघेही जखमी झाल्याने त्यांना त्वरित 108 रुग्णवाहिकेतून चिखली येथे उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मध्यरात्री 12.30 च्या सुमारास कळंगुटकर यांचे निधन झाले, तर रोहित कुमार याला अपघातानंतर घरी पाठवण्यात आले. पोलीस वास्कोहून चुकीच्या दिशेने येऊन अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेत आहेत.

उत्तरीय तपासणीनंतर कळंगुटकर यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी मुरगाव बोगदा येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व मुलगी, भाऊ, बहीण, पुतणे असा मोठा
परिवार आहे.