>> आतापर्यंत एकूण ७९ इंच पावसाची नोंद
राज्यात जुलै महिन्यातील सुरुवातीचे सतरा दिवस जोरदार पाऊस पडल्यानंतर गेले १४ दिवस पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. जुलै महिन्यात साधारण ४७ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ७९.३८ इंच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, येत्या ४ ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात पावसाने दडी मारल्याने नागरिकांना उष्णतेला तोंड द्यावे लागत आहे. राज्यात जून महिन्यात साधारण ३२.६८ इंच पावसाची नोंद झाली होती. राज्यात जून महिन्यात पावसाची तूट निर्माण झाली होती. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे तूट भरून आली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांत दोन वेळा राज्यभरात पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या ७-८ जुलैला राज्यातील एक दिवसाच्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक ६.६८ इंच पावसाची नोंद झाली आहे. तथापि, १७ जुलैनंतर पावसाचे प्रमाण कमी होण्यास प्रारंभ झाला. राज्यात जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा २.८ टक्के जास्त आहे.
केप्यात सर्वाधिक पाऊस
राज्यात आत्तापर्यंत केपे येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. केपे येथे आत्तापर्यंत ९५,३८ इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यातील इतर भागातील पावसाचे प्रमाण चांगले आहे. पेडणे येथे ९१.१२ इंच आणि सांगे येथे ८७.७० इंच पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा येथे ७२.४४ इंच, फोंडा येथे ७८.०३ इंच, पणजी येथे ७०.१२ इंच, ओल्ड गोवा येथे ७२.६१ इंच, साखळी येथे ७१.०७ इंच, वाळपई येथे ८१.२३ इंच, काणकोण येथे ८५.८८ इंच, दाबोळी येथे ६६.७९ इंच, मडगाव येथे ६९.६२ इंच, मुरगाव येथे ६९.८० इंच पावसाची नोंद झाली.