जुलैमध्ये ३३९२ कोरोनाबाधितांची नोंद

0
10

>> जून महिन्यापेक्षा रुग्णसंख्या अधिक

राज्यात जुलै महिन्यात जून महिन्यापेक्षा जास्त कोरोना बाधित आढळून आले आहे. जुलै महिन्यात नवीन ३३९२ कोरोना बाधित आढळून आले असून आणखीन १४ कोरोना बळींची नोंद झाली आहे. तसेच, जुलै महिन्यात मागील काळातील आणखी १०० कोरोना बळींची नोंद करण्यात आल्याने राज्यातील एकूण बळींची संख्या ३९५२ एवढी झाली आहे.

राज्यात जून महिन्यात नवीन २९१७ कोरोना बाधित आढळून आले असून आणखी ६ कोरोना बळींची नोंद झाली होती. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात जास्त कोरोना बाधितांना इस्पितळात दाखल करावे लागले आहे. जुलै महिन्यात ६१ बाधितांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यात जुलै महिन्यात कोरोना बाधित आढळून येण्याची सरासरी टक्केवारी ९.०९ टक्के एवढी आहे. या जुलै महिन्यात ३७ हजार ३०३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे. महिनाभरात ३५६९ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

चोवीस तासांत नवे ७६ रुग्ण

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ७६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या ७२६ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३९५२ एवढी आहे. कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ७.१९ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन १०५७ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. चोवीस तासांत एकाही बाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आलेला नाही.

आणखी ६६ जण कोरोनामुक्त
चोवीस तासांत आणखी ६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के एवढे आहे.