>> रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निर्णय
गवंडाळी-जुने गोवे येथील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी जुने गोवे-गवंडाळी रस्ता एक वर्षासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
गोवा पायाभूत साधन सुविधा महामंडळातर्फे गवंडाळी येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. येत्या 25 फेब्रुवारी 2025 ते 19 जानेवारी 2026 ह्या एका वर्षाच्या कालावधीसाठी मत्स्योद्योग प्रशिक्षण केंद्र एला जुने गोवा ते धेंपो फुटबॉल मैदान गवंडाळी दरम्यानचा रस्ता बंद ठेवला जाणार आहे, अशी सूचना जीएसआयडीसीने जारी केली आहे.
जुने गोवे-गवंडाळी या रस्त्याचा वापर माशेल, साखळी, डिचोली, वाळपई भागांत जाण्यासाठी वाहनचालकांकडून वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. रस्ता बंदच्या काळात वाहनांची वाहतूक बाणस्तारीमार्गे किंवा खोर्ली आयडीसी क्षेत्रातून वळवली जाईल, असे जीएसआयडीसीने जारी केलेल्या नोटिशीमध्ये नमूद केले आहे.
जुने गोवे-गवंडाळी येथे रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीच्या वेळी फाटक बंद ठेवले जात असल्याने वाहनचालकांना वाहने उभी करून ठेवावी लागत होती. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याची मागणी केली जात होती.
कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाच्या मुद्द्याचा सरकारी पातळीवर पाठपुरावा करून जीएसआयडीसीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यास मान्यता मिळवली. जीएसआयडीसीने उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण ठेकेदाराला कामाचा आदेश जारी केला आहे. ठेकेदाराला एक वर्षाच्या कालावधीत उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे.

