जुने गोवेत प्लेगची साथ आली अन्‌‍ पणजी बनली ‘राजधानी’

0
8

>> पोर्तुगीज राजवटीत 17 व्या शतकात प्लेगसह मलेरिया व कॉलराचाही जुने गोवेत झाला होता उद्रेक

गोव्याची राजधानी पणजीला 180 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने कालच्या वृत्तात पणजीला राजधानीचा दर्जा कसा आणि कधी प्राप्त झाला यावर प्रकाशझोत टाकल्यानंतर राजधानीचे पणजीत स्थलांतर का करण्यात आले आणि पणजी शहर पोर्तुगीजांनी कसे वसवले, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. पोर्तुगीज राजवटीत गोव्याची राजधानी असलेल्या जुने गोवे येथे 17व्या शतकात प्लेग या साथीच्या रोगाबरोबरच मलेरिया व कॉलरा या रोगांचा उद्रेक झाल्याने नाईलाजाने पोर्तुगीज प्रशासनाला आपली राजधानी पणजी येथे हलवावी लागली.

17व्या शतकात या तिन्ही रोगांनी जुने गोवे येथे अक्षरश: थैमान घातले होते. प्लेगमुळे चोडण बेटावर एक हजार नागरिकांचा मृत्यू होण्याची घटना घडल्याने घबराट पसरली होती. त्यातच चोडण तसेच जुने गोवे येथील अन्य परिसरात पाण्याची डबकी तयार झाल्याने मलेरियाने थैमान घातले होते, तर अशुध्द पाणी पुरवठ्यामुळे कॉलराचाही उद्रेक झाला होता.

या पार्श्वभूमीवर घाबरून तेथील रहिवाशांनी अन्यत्र स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. परिणामी 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत जुने गोवे येथील लोकवस्ती 2 लाखांवरून 20 हजारांवर आली होती. परिणामी प्रशासनाचा आर्थिक डोलाराही कोसळू लागला होता. या पार्श्वभूमीवर पोर्तुगीज प्रशासनाने आपली राजधानी मुरगाव येथे हलवण्याचा निर्णय घेऊन तेथे आवश्यक ते बांधकामही सुरू केले; मात्र नंतर राजधानी मुरगावला हलवण्याचा निर्णय स्थगित ठेवून ती पणजीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
17व्या शतकाच्या मध्यापर्यंत जुने गोवे येथे प्लेग, मलेरिया व कॉलेराच्या उद्रेक अधूनमधून होतच होता. शेवटी पोर्तुगालची राणी मारिया (दुसरी) यांनी 1826 साली पोर्तुगालची राणी बनल्यानंतर 22 मार्च 1843 रोजी पणजीला गोव्याची राजधानी बनवण्याचा आदेश काढला. राणीच्या हुकूमानुसार तत्कालीन गव्हर्नर जनरल फ्रान्सिस्को झेवियर द सिल्वा यानी पणजी शहराला राजधानीचा दर्जा दिला.

‘ग्रीड प्लॅन’ पध्दतीने उभारणी
पोर्तुगीज सरकारने मुळातच निसर्गसौंदर्याने भरलेल्या मात्र, पाणथळ असल्याने बांधकामे करण्यासाठी आव्हानात्मक असलेल्या पणजी शहराची अत्यंत नियोजनबध्दरित्या उभारणी केली. त्यासाठी जुन्या काळी ज्या ‘ग्रीड प्लॅन’ पध्दतीचा अवलंब करण्यात येत असे, त्या पध्दतीचा अवलंब केला. अत्यंत जुनी संस्कृती असलेल्या ‘मोहंजोदडो’ आणि ‘हडप्पा’ या शहरांचीही अशाच ‘ग्रीड प्लॅन’ पध्दतीने उभारणी करण्यात आलेली होती. सुनियोजित गल्ल्या व एकूणच सुबक व आकर्षक अशी शहराची रचना ही ‘ग्रीड प्लॅन’ पध्दतीची वैशिष्ट्ये होय.
‘ग्रीड प्लॅन’ पध्दतीने पणजी शहराची उभारणी केल्याने पोर्तुगीज राजवटीत पणजी शहराने कात टाकली होती आणि एका परिने त्यावेळी ती त्या काळातील ‘स्मार्ट सिटी’च बनली होती; मात्र कालांतराने अति व अतिनियोजित विकासामुळे पणजी शहराला लाभलेली ही ‘ग्रीड प्लॅन’ पद्धत धोक्यात आली; मात्र अजूनही काही भागांत सुनियोजित गल्ल्यांच्या रुपात या ‘ग्रिड प्लॅन’ पध्दतीचे दर्शन घडते, असे बांधकाम व नियोजन क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

‘ग्रीड प्लॅन’ पद्धतीने शहराची उभारणी
पोर्तुगीज सरकारने मुळातच निसर्गसौंदर्याने भरलेल्या मात्र, पाणथळ असल्याने बांधकामे करण्यासाठी आव्हानात्मक असलेल्या पणजी शहराची अत्यंत नियोजनबध्दरित्या उभारणी केली. त्यासाठी जुन्या काळी ज्या ‘ग्रीड प्लॅन’ पध्दतीचा अवलंब करण्यात येत असे, त्या पध्दतीचा अवलंब केला. अत्यंत जुनी संस्कृती असलेल्या ‘मोहंजोदडो’ आणि ‘हडप्पा’ या शहरांचीही अशाच ‘ग्रीड प्लॅन’ पद्धतीने उभारणी करण्यात आलेली होती. सुनियोजित गल्ल्या व एकूणच सुबक व आकर्षक अशी शहराची रचना ही ‘ग्रीड प्लॅन’ पद्धतीची वैशिष्ट्ये होय.