जी-20 शिखर परिषदेची पहिली बैठक 17 ते 19 एप्रिल या दरम्यान बांबोळी येथील ग्रँड हयातमध्ये होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या शिखर परिषदेच्या बैठकीसाठीची पूर्वतयारी युद्धपातळीवर हाती घेतली आहे. त्यात आरोग्यविषयक आणीबाणी व सुरक्षा व्यवस्था यासंबंधीच्या पूर्वतयारीचा समावेश आहे. गोवा राज्याचे शिष्टाचार सचिव व नोडल अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांनी यासंबंधी बोलताना जी-20 शिखर परिषदेच्या गोव्यात एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या पहिल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यासाठीच्या पूर्वतयारीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे स्पष्ट केले.
जी-20 बैठकीसाठी विमानतळापासून बैठकीच्या आयोजन स्थळापर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला जाणार असल्याचे रॉड्रिग्ज यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय रस्त्यांच्या दुतर्फा सौंदर्यीकरण केले जात आहे. राज्यातील प्रवासाचा अनुभव हा या पाहुण्यांसाठी आनंददायी व सुखकर ठरावा तसेच गोमंतकीय अन्नपदार्थांचा त्यांना चांगल्या प्रकारे आस्वाद घेता यावा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे त्यांचे चांगले मनोरंजन व्हावे यावर भर देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
वैद्यकीय सुविधांची सोय
या पाहुण्यांच्या वैद्यकीय सुरक्षेसाठी ठिकठिकाणी आवश्यक व तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यावर भर देण्यात येत असून सर्व बैठकांच्या स्थळी डॉक्टरांचे पथक ठेवण्याचे नियोजन आरोग्य खात्याने केले आहे. त्याशिवाय विमानतळावरही वैद्यकीय सुविधा असेल, अशी माहितीही आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुष भारत, डिजिटल इंडियाचे नोडल अधिकारी आणि जी-20 परिषदेसाठीचे विषय आरोग्य अधिकारी डॉ. केदार रायकर यांनी सांगितले. वैद्यकीय सेवेमध्ये जीवन सुरक्षा, रुग्णवाहिका सेवा तसेच इतर आवश्यक वैद्यकीय सेवा यांचा समावेश असेल. त्यासाठी गोमेकॉ, राज्य आरोग्य सेवा संचालनालय आणि ईएमआरआय 108 डॉक्टर, नर्सेस व निमवैद्यकीय कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच गोमेकॉ आणि तेथील इस्पितळाचा वापर शस्त्रक्रिया व आपत्कालीन आरोग्य सेवा तसेच रुग्णांचे निदान व उपचारासाठी केला जाईल. त्यासाठी अतिदक्षता विभाग असलेला खास कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही डॉ. रायकर यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय विमानतळ, बैठक स्थळ व इतर सार्वजनिक ठिकाणी संसर्गजन्य आजारांची समस्या हाताळण्यासाठी आरोग्य खाते सज्ज झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय आरोग्य खात्याने डिजिटल आरोग्य सेवेमध्ये काही लक्षणीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत. जी-20 परिषदेच्या एकूण आठ बैठकांचे आयोजन गोव्यात होणार आहे. जी-20 गटात भारत, चीन, जपान, अमेरिका, रशिया, अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, मेक्सिको, कोरिया प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, सौदी अरेबिया, तुर्की, ब्रिटन व युरोप महासंघ यांचा समावेश आहे.
सुरक्षा व्यवस्था कडक
सुरक्षेच्याबाबतीत पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी निमंत्रितांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना व नियमावलींची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. परिषदेसाठीचे सुरक्षाविषयक नोडल अधिकारी ओमवीर सिंह बिष्णोई यांनी सांगितले की सर्व बैठकांपूर्वी राज्यातील सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहेत.