जीवन सुंदर आहे!

0
5674

– संगीता गावडे

जीवन सुंदर आहे. अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन घडीचा डाव आहे. जीवन हा एक संघर्ष आहे. जीवनाच्या अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केल्या आहेत. आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्‍या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात चढउतार हे हटकून असतातच. जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते. जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे व प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे खरे सार्थक आहे.खरे म्हणजे जगण्याइतके आनंददायक असे जीवनात काहीच असू शकत नाही. सर्व कला, क्रीडा, साहित्य, संगीत, संशोधन हे जीवनाचे विलास आविष्कार आहेत. त्यात जे रस घेतील त्यांना सविकल्प समाधीचे सुख लाभेल. हे सहज सौख्य माणसे विसरतात. खेळीमेळीच्या वातावरणात, विचारांच्या आकाशात आपापल्या मतांचे पतंग सोडावेत आणि प्रसंगी काटावेत, पण हा ऐश्‍वर्यछंद रंगपंचमीप्रमाणे सुखद सोहळाच ठरावा.
माणसाच्या जीवनप्रवासातील प्रेम या शब्दाला खूप महत्त्व आहे. प्रेम आणि जीवन यांचे अतुट असे नाते आहे. वर्तमानपत्र उघडले की, एक तरी चांगली, वाईट बातमी प्रेमातून घडलेल्या प्रसंगातून वाचावयास मिळते. एकतर्फी प्रेम ते मुलाकडून असो की मुलीकडून असो, यातून नेहमीच वाईट प्रसंगाला सामोरे जाण्यचा प्रसंग नेहमीच प्रेम करणार्‍या मंडळींना येत असतो. संगीत, अनुजा, सुजाता, सरिता असो की शुभ्रा, शिल्पा, जान्हवी असो या सारख्या अनेक मुलींकडून प्रेमात धोका झालेला असतो. यामध्ये अनेक तरुणांनी रागाच्या भरात स्वत:चे तरी जीवन संपविलेले असते किंवा तिचे तरी!
प्रेम हे कॉलेजमध्ये उदयास येते, तेथेच ते ङ्गुलते. कॉलेज संपेपर्यंत जवळ जवळ बसणारे हे प्रेमवीर पुन्हा घरचे कारण सांगून प्रेमभंग करतात आणि दोन-पाच वर्षे राहिलेले प्रेम अचानक तुटते तेव्हा दोघांनाही आभाळ कोसळल्याचा भास होतो. प्रेम करणार्‍यांना प्रेम करू दिले पाहिजे; पण प्रेमवीराने त्याचा अतिरेकही करू नये. प्रेमाला काळिमा लागणार नाही याची दक्षता घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
जीवन ही मानवाला लाभलेली अमोल देणगी आहे. तिचा चांगला उपयोग करणे महत्त्वाचे आहे. माणसाने केवळ क्षुल्लक दु:खाने व्यथित होऊन त्याचा शोक करत बसू नये. त्याने एखाद्या आंधळ्याचा डोळा व्हावे, लंगड्याचा पाय व्हावे, अनाथाला पालकसुद्धा व्हावे, दुसर्‍याला आनंद द्यावा. दुसर्‍यासाठी जगावे, इतरांना जगू द्यावे. जगता-जगता जीवनाकडे पाहावे, जमेल तेवढे जाणावे या जाणिवेचे गाणे गुणगुणत पुढे जात राहावे. स्वत:ला विसरून अवैयक्तिक पातळीवरून जीवन वैभवाचा स्पर्श अनुभवावा.
माणसाने जगण्याचा प्रयत्न करावा आणि प्रयत्नपूर्वक जगावे. हे जग सुंदर व्हावे, यासाठी या जगात जाणीवपूर्वक व जाणतेपणाने रमावे. अशा जगण्यात जिवाचा गौरव आहे. माणसांजवळ विचारशक्ती आहे. आचारशक्ती आहे, सद्बुद्धी आहे. एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणारा खोटेपणा निपटून काढला व साधे, सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम असे जीवनब्रह्मचे रूप आपण सतत अनुभवत राहू. निरभ्र आणि अथांग आकाश, सूर्य, चंद्र यांचे उदास्त, सतत खळखळणारे लहानांचे हसणे, पायाशी घोटाळणार्‍या कुत्र्याचे इमान, थोडे प्रेमाचे बोलणे केले की वृध्दांच्या नेत्रात तरळणारे अश्रू, एखादा रूपया हातावर ठेवला तर चार पिढ्यांना आशीर्वाद देणारा देवाच्या दारातील विकलांग भिक्षू, पहाटेच्या प्रहरी मंदिरातून येणारा घंटानाद, आभाळातून झेपावत जाणारे पाखरांचे थवे, शाळेच्या प्रांगणात बाळगोपाळांच्या कंठातून बाहेर पडणारे प्रार्थनागीत.. अशा अनेक अंगांनी नटलेले, सजलेले हे जीवन किती सुंदर आहे, नाही?