जीवन त्यांना कळले हो…!

0
19
  • रमेश सावईकर

माणसाने सरळ मार्गाने पुढे जाण्याचे सोडून दिले म्हणून स्थितीची ‘परिस्थिती’ झाली. त्याला कारण माणूसच आहे. त्या परिस्थितीमुळे आज माणसांपुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. माणसाला सरळ मार्गाने साधे-सोपे-सुलभ जीवन जगणे कठीण झाले आहे. ‘येन केन प्रकारेण’ आपला स्वार्थ साधणे कसे शक्य होईल, यासाठीच माणसाची धडपड चालू असते. यातून उद्याचा सुसंस्कृत समाज कसा निर्माण होईल?

परमेश्वराने माणसाला स्थिती दिली. त्या अनुकूल स्थितीच्या साहाय्याने माणसाने जीवन जगावे, असा त्यामागचा शुद्ध हेतू असावा. परंतु माणसाने सरळ मार्गाने पुढे जाण्याचे सोडून दिले म्हणून स्थितीची ‘परिस्थिती’ झाली. त्याला कारण माणूसच आहे. त्या परिस्थितीमुळे आज माणसांपुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे माणसाला सरळ मार्गाने साधे-सोपे-सुलभ जीवन जगणे कठीण झाले आहे. कारण माणसाला ‘सरळ मार्गा’ने पुढे जाणे पसंत नाही; सन्मार्ग राहिला बाजूलाच. ‘येन केन प्रकारेण’ आपला स्वार्थ साधणे कसे शक्य होईल, यासाठीच माणसाची धडपड चालू असते.
आज माणसाची स्वप्नेच आगळी-वेगळी आहेत. आधुनिक जीवनपद्धतीत प्रलोभनांना तो बळी पडला आहे. जीवनात झटपट श्रीमंत कसे होता येईल याच विचारचक्रात तो अडकला आहे. ज्या पद्धतीनं जीवन जगणं सहजशक्य आहे, त्यात तो समाधानी नाही. जीवन कशासाठी जगायचं? स्वतःला समाधान, शांती व सुख मिळावं म्हणून माणसानं प्राप्त परिस्थितीत परिश्रम, कष्ट करून जगावं. परंतु त्यात आपलं भलं आहे, खरं हित आहे अशी मानसिकता आज माणसाची राहिलेली नाही.

स्पर्धात्मक जगात स्पर्धा करीत राहायचं. स्वार्थी बनून माया जमवायची. श्रीमंती थाटाची जीवनशैली अनुसरून समाजात ‘मी’पणा मिरविण्यात माणूस स्वतःला धन्य समजतो. ‘मी’पणा किंवा अहंकार हा स्वभावाचा एक भाग बनला आहे. त्यामुळे खरोखरच आपण समाजात स्थान निर्माण करतो की समाजात आपलं असलेलं स्थान मलिन करतो याचं त्याला भान नाही. त्याची त्याला पर्वाही नाही.

या जीवनपद्धतीला केवळ आजची युवापिढीच बळी पडली आहे असं नाही, तर ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत ही व्याधी जडली आहे. स्वतःचा ‘मी’पणा मिरविताना कोणी अडथळा आणला तर आजचा युवक त्याची पर्वा करत नाही. मनमानेल पद्धतीनं स्वैर जीवन जगणं ही पिढी पसंत करते. कौटुंबिक नातेसंबंध, आपलेपणा, माया आदी गोष्टींना फारसं महत्त्व दिलं जात नाही. वेळप्रसंगी कौटुंबिक नात्याचे पाश तोडून स्वैरपणा जपण्याला, आपलं स्वतःचं असं स्वाभिमानयुक्त जीवन जगण्याला युवापिढी तत्पर असते. समाजात घडून आलेला हा बदल कशामुळे, याचा कोणी गंभीरपणे विचार करतो का? ‘काय करणार? परिस्थितीच तशी आहे!’ असं म्हणून दोषाचं खापर परिस्थितीवर फोडून माणूस मोकळा होतो. त्यातून एकप्रकारे आपली जबाबदारीच माणूस झटकून टाकतो असं म्हणावं लागेल.
आजच्या युवापिढीसमोर ‘आदर्श’ असं काय आहे ज्याचं अनुकरण करावं? घरातील मोठी माणसं युवक-युवतींना (आपल्या मुलांना) दोषी ठरवतात. परंतु ते दोषी आहेत असं म्हणण्याचा नैतिक अधिकार मोठ्या माणसांनी राखून ठेवला आहे का, असा प्रश्न पडतो.
गेल्या शंभर वर्षांपासूनची परिस्थिती फार वेगळी होती. घरोघरी लहान मुलांवर संस्कार होत असत. घरात वडीलधारी माणसं असायची. आजी-आजोबा, वडील-आई यांच्या मायेची ऊब मुलांना मिळायची. घराला ‘घरपण’ होतं. मातीच्या भिंतींनाही मायेची ऊब असायची. दिवस अस्त झाला की घरातील सगळी लहानथोर माणसं एकत्र यायची. आजी-आजोबांना आपली पाखरं घरट्यात परतल्याचा आनंद नि समाधान लाभायचं. ‘माझं घरटं, माझी पिल्लं’ या शुद्ध भावनेनं आजी-आजोबांचं जीवन व्यतित व्हायचं.

तिन्हीसांजेला घरातील वडीलधारी महिला- आजी, आई, बहीण अंगणातील तुळशीला दिवा लावायची. देवघरात ‘शुभं करोति कल्याणम्‌‍’ स्तोत्राचे स्वर निनादत. लहान-थोर सगळी माणसं न चुकता देवाची प्रार्थना करायची. अशा सकारात्मक नि ऊर्जात्मक वातावरणामुळे लहान मुलांच्या कोवळ्या मनावर आपसूक संस्कार व्हायचे. आज असं चित्र एखाद्या घरात तरी पाहायला मिळतं का? तिन्हीसांजेला नोकरी करणारी किंवा शिक्षण घेणारी मुलं नि आई-वडील घरी येतात. तहान लागली असेल तर पाणी पितात नि नंतर प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त! एकमेकांत ना संवाद, ना संभाषण! प्रत्येकाच्या हातात मोबाईल. हाताची बोटं मोबाईलच्या बटणांवर! घरातील हॉलमध्ये टीव्हीवर चित्रं सरकत असतात. अधूनमधून त्यावरती कटाक्ष टाकीत वडीलधाऱ्यांची मोबाईलवर संभाषणं चालूच! आई स्वयंपाकघरात. डायनिंग टेबलवर मोबाईल नि दुसऱ्या बाजूनं स्वयंपाक बनवणं! जेवणाची वेळ झाली की जो-तो आपल्या सवडीनुसार स्वयंपाकघरात येतो. आपणाला हवा असलेला पदार्थ खातो. जेवण्याच्या वेळी घरातील सर्व माणसं एकत्र बसून जेवणं दुर्लभच! त्यामुळे मायेपोटी आग्रहाने दोन घास अधिक वाढण्याला आईला संधीच नाही.

माणूस या नवजीवनशैलीच्या पूर्णपणे अधीन झाला आहे. त्याला अपवाद असा राहिलेलाच नाही. म्हणून एकमेकांना दोषी ठरविण्यात काय अर्थ आहे? मुलांना तरी कोण समजून घेतं? आपणाला समजून घेणारं घरात कोणीच नाही अशी त्यांची भावना होते, त्यावेळी मुलं बाहेरच्या आकर्षणांना, प्रलोभनांना बळी पडतात. ती स्वैर जीवन जगू पाहतात. घरातील वडीलधारी माणसांच्या लक्षात ही गोष्ट फार उशिरा येते. परंतु आता त्यांच्या स्वैराचाराला लगाम घालण्याचा प्रयत्न केला तर त्याचे विपरीत परिणाम होतात. मुलं पालकांपासून कायमची दुरावतात.

‘आज समाजात मुलांवरती चांगले संस्कार व्हायला हवेत, युवा पिढी सुसंस्कृत बनायला हवी’ अशी भाषणबाजी राजकीय नेते, समाजसेवक (स्वयंघोषित) करताना आढळतात. पण ते सुसंस्कृतपणे, नीतिमत्ता ठेवून कितीसे वागतात? की स्वार्थ साधण्यासाठीच ते धडपडत असतात? जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवून माया जमविण्याशिवाय जनतेचं आणखी काय म्हणून भलं-कल्याण करतात?
घरी संस्कार करण्यासाठी पालकांकडे वेळ नाही. शाळेत शिक्षकांना क्रमिक अभ्यासक्रम पुरा करण्याचा तगादा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी टाळण्यास त्यांना एक निमित्तच मिळते. दुसरा मुद्दा असा की, मुलेही आज शिक्षकाच्या सांगण्याला जुमानत नाहीत, अशी सगळी विचित्र अवस्था आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी-जीवनाबद्दल तर न बोललेलंच बरं. स्वैर, स्वच्छंदी फुलपाखरासारखं जीवन जगणं हेच ध्येय मानून विद्यार्थी मौजमजा करीत असतात. त्यांना कोणीही थोपवू शकत नाही.

एकूण परिस्थिती पाहता शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यामध्ये स्वतः आपण चांगलं माणूस व्हावं, तशी आपली जडण-घडण व्हावी अशी भावना निर्माण व्हायला हवी. युवापिढीतील सर्व युवक-युवतींना दोष देता येणार नाही. संकटग्रस्त परिस्थितीवर मात करून, अथक परिश्रम नि कष्ट घेऊन आपलं ध्येय गाठणारी आणि समाजात गौरवास्पद स्थान निर्माण करणारी अनेक मुलं आहेत. परंतु त्यांना जे यश लाभलं त्यामागे त्याची स्वतःबद्दलची भावना वेगळी होती. त्यात कोणताही स्वार्थ नाही, ‘मी’पणा नाही की गर्व नाही. एवढंच नव्हे तर जे यश मिळविलेलं आहे त्याचाही त्यांना ताठा नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन युवापिढी सन्मार्गाने पुढे गेली तरच अपेक्षित सुसंस्कारित समाज घडेल. त्याकरिता माणसामधील ‘मी’पणा गळून पडायला हवा, तरच त्यांना जीवनाचा खरा अर्थ कळेल. प्रसिद्ध गोमंतकीय कवी बा. भ. बोरकर म्हणतात-
मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो!