28 C
Panjim
Tuesday, September 22, 2020

जागर देवीचा

– सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकर

आपल्या संस्कृतीतही ‘जिथे नारीची पूजा होते, तिथे प्रत्यक्ष भगवंतांचा वास असतो’ असे म्हटले आहे. या उक्तीप्रमाणे तिची पूजा केली की आपोआपच सर्व देवतांचं सान्निध्यही प्राप्त होतं. या स्त्रीशक्तीचा सत्कार, आदर म्हणजे नवरात्र.

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते|
आपल्या हिंदू धर्मात आध्यात्मिक जीवनशैलीला महत्त्वाचं स्थान आहे व त्यासंदर्भात देवादिकांचे सणवार-उत्सव यांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. सण, उत्सव हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. संस्कृती व संस्कार दोन्हीही त्याद्वारे जोपासले जातात. आपल्या संस्कृतीत तर या सणवारांना खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये देवी उपासना प्रचलित आहे. त्यामध्ये आपापल्या कुलदेवतेच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणपतीनंतर येणारा नवरात्रीचा सण हा देवीचा उत्सव.
देवी म्हणजे साक्षात स्त्रीशक्ती. एका दृष्टीने ही स्त्रीचीच पूजाअर्चा! कारण देवी ही जशी एक स्त्री आहे तशी ती माता, भगिनी, कन्या, पत्नी, सखी, सहचरी ही सारी नाती निभावून नेणारी- सर्वांग सुंदर असे सृष्टीचे प्रतीक आहे. तिचं पूजन व्हायलाच पाहिजे. आपल्या संस्कृतीतही ‘जिथे नारीची पूजा होते, तिथे प्रत्यक्ष भगवंतांचा वास असतो’ असे म्हटले आहे. या उक्तीप्रमाणे तिची पूजा केली की आपोआपच सर्व देवतांचं सान्निध्यही प्राप्त होतं. या स्त्रीशक्तीचा सत्कार, आदर म्हणजे नवरात्र. देवी जी आदिमाया, आदिशक्ती तिची नऊ दिवसांतली नऊ वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात.
आपल्या धर्मात शक्तीउपासना प्राचीनकाळापासून केली जाते. देवी हे तर ‘शक्ती’चे रूप आहे. या देवीची आपल्या देशात आसेतु हिमाचल अनेक रूपांत पूजा केली जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतच्या नऊ दिवसांस ‘नवरात्र’ म्हणतात. प्रतिपदेस घटस्थापना करतात. नवमीपर्यंत सप्तशतीच्या पाठाचे पारायण करतात. अहोरात्र नऊ दिवस देवाजवळ नंदादीप पेटता ठेवतात. फुलांच्या माळा रोज एक याप्रमाणे किंवा काही ठिकाणी एकेक वाढवीत जाऊन शेवटच्या दिवशी नऊ माळा घालतात. ब्राह्मण, सवाष्णीला जेवायला बोलावतात. तिची ओटी भरून तिला देवीचा मान देतात.
स्त्री म्हणजे माता जननी. नवउगमाचं स्थान. ही भूमीसुद्धा एक माता, जी आपलं भरण-पोषण करते, अन्नधान्य देऊन उदरभरण करते. तिचीसुद्धा पूजा व्हायला हवी. ती या नऊ दिवसांत घटस्थापना करून केली जाते. माती म्हणजे भूमाता, ज्यामध्ये नऊ धान्ये पेरली जातात. त्यांची घट मांडून पूजा केली जाते. निसर्गाने आपल्याला जे दिले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक योग्य अवसर. यावेळी बळीराजाही सुगीचे दिवस सुरू झाल्याने निवांत, प्रसन्न असतो. सणवार-उत्सव साजरे करायच्या मन:स्थितीत असतो. सगळीकडे हिरवा निसर्ग बहरलेला असल्याने मनही ताजेतवाने होऊन जाते.
स्त्रीला देवीचा दर्जा मिळाला तो तिच्या अंगच्या मन:शक्ती, निर्धार इत्यादी गुणांमुळे. दैत्यांचे निर्दालण करणारी, अनाथांची वाली, करुणेची देवता, सर्व संकटांचे निराकरण करणारी, सर्व मंगल घडवणारी, भक्तांच्या हाकेला ओ देऊन मदतीला धावून जाणारी अशी सामर्थ्यशाली स्त्रीशक्ती म्हणजे देवी. जिची रूपं अनेक, नावे अनेक. कुठे ती तुळजाभवानी, कुठे महालक्ष्मी, शारदा, कालिमाता, शांतादुर्गा, नवदुर्गा, सातेरी, कामाक्षी, सरस्वती अशा अनेक नावांनी ती ओळखली जाते. नवरात्र म्हणजे देवीच्या नवरसप्रधान नवरूपांचे दर्शन.
मंदिरात, मखरात सजलेल्या देवीची अशी अनेकविध रूपं डोळ्यांचे पारणे फेडणारी असतात. दागदागिन्यांनी मढलेली, उंची वस्त्रप्रावरणे ल्यालेली, नटलेली, सजलेली मूर्ती जणू प्रत्येकाला प्रसन्नतेने वरदान देणारीच भासते. कधी मोरावर बसलेली शारदा, कधी सिंहावर आरुढ झालेली दुर्गा, त्रिशूलधारिणी भवानी, चामुंडा ही सारी तिचीच रूपं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत पुजली जातात. बंगाली लोक ‘दुर्गा’, ‘कालिमाते’ची पूजा करतात. गुजरातेत ‘अंबा’, उत्तर प्रदेशात ‘देवीमॉं’, महाराष्ट्रात ‘भवानी’, ‘महालक्ष्मी.’ गोवा सर्वार्थाने देवभूमी असल्याने इथे तर देवीची अनेक रूपं पुजली जातात. जशी गणपतीची अष्टविनायक, शंकराची बारा जोतिर्लींगे तशी देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. पहिले तुळजाभवानी, जी तुळजापूर येथे आहे. दुसरे महालक्ष्मी अंबाबाई, ती कोल्हापूरला आहे. तिसरे माहुर येथे असलेली महामाया रेणुका माता आणि ‘सप्तशृंगी’ हे अर्धेपीठ नाशिकजवळ आहे.
देवीने महापराक्रम गाजवून महिषासुर, धूम्रलोचन, चंडमुंड, रक्तबीज, शुंभ निशुंभ या बलाढ्य राक्षसांचा वध केला. तेव्हा सगळीकडे आनंदीआनंद झाला. देवीवर देवादिकांनी पुष्पवृष्टी केली. जे देवादिकांनाही साध्य होत नव्हते ते या स्त्रीरूपी आदिशक्तीने करून दाखवले. या तिच्या पराक्रमाचे नवरात्रीत पूजन केले जाते. सप्तशतीचा पाठ दररोज वाचला जातो, होमहवन केले जाते. या सप्तशतीमध्ये सातशे मंत्र आहेत. यात देवीची स्तुती व तिने दैत्यांना कसे मारले याचे वर्णन आहे. पहिल्या भागात पाशवी शक्तीवर बुद्धिशक्ती मात करू शकते हे सांगितलेय, तर दुसर्‍या भागात संघशक्तीचे महत्त्व वर्णिले आहे.
आपल्यातील सुप्तशक्ती जागृत केल्याशिवाय कोणतेही कार्य होत नाही हे पटवून दिले आहे. यात देवीने ‘पुढे भविष्यात ज्या-ज्या वेळी राक्षस निर्माण होतील तेव्हा मी वेगवेगळ्या नावांनी अवतार घेऊन त्यांचा नाश करेन’ असे म्हटले आहे. व हे तत्त्व प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आपल्यातली सुप्तशक्ती ओळखता आली पाहिजे. स्त्री ही अबला नसून सबला आहे हे दाखवून दिले पाहिजे. आजकालच्या स्त्रीने देवीची ही रूपं नुसती मनात साठवून न ठेवता अन्याय, अत्याचार अशा गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी लढलं पाहिजे. आत्मरक्षणासाठी, आपल्या पावित्र्यासाठी, समाजातल्या दैत्यांचा नायनाट करण्यासाठी शक्तीचं वरदान मागितलं पाहिजे. झाशीची राणी, इंदिरा गांधी, कल्पना चावला, पी.टी. उषा ही सगळी अलीकडल्या काळातील स्त्रीशक्तीचीच रूपं आहेत.
मनोनिग्रह, निर्धार अशा अंगभूत शक्तीच्या बळावर संकटांशी सामना करणार्‍या, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून उत्कर्ष साधणार्‍या कितीतरी स्त्रिया आपण समाजात पाहत असतो. या स्त्रीशक्तीची जाणीव ठेवून नवरात्रीचा उत्सव साजरा करूया.
हे असे उत्सव म्हणजे जीवनातले सुख-दु:खाचे प्रसंग विसरून, येणार्‍या वर्तमानाकडे आशेने पाहण्याचे, विश्वास देणारे असतात. एकत्र आलेल्या जनसमूहाचे मनोरंजनही यातून होते. रास, गरबा, दांडिया किंवा घरोघरी म्हटली जाणारी भोंडल्याची गाणीही त्याचाच भाग. काही ठिकाणी शंख फुंकून देवीचा जागर केला जातो, काही ठिकाणी नऊ दिवस उपवास करून उपासना केली जाते, तर काही ठिकाणी नटूनथटून देवळात जाऊन देवीची ओटी भरली जाते. दसर्‍यापर्यंत चालणार्‍या या उत्सवात लहान-थोर सर्वांना उत्साहाने भाग घेता येतो. एकत्र येऊन सण साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून परदेशातही या सणाची धूम पाहायला मिळू लागलीय. आनंदाची निर्मिती व परमेश्वराची आराधना- दोन्हीही यातून साध्य होते.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी….

डॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...

कोरोना विरोधात रसायन द्रव्ये

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...

भाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...

गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३

वैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

ALSO IN THIS SECTION

युद्धसज्जता आणि मुत्सद्दीपणा

प्रा. अशोक ढगे युद्धासाठी लष्कर सातत्यानं सज्ज ठेवावं लागतं. गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण बनले...

गद्य-पद्य वेचे आणि मुलांची जडणघडण

(पुन्हा एकदा…) डॉ. सोमनाथ कोमरपंत कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्षात राहते. ती मंत्रमुग्ध आहे;...

दिवाळी अर्थव्यवस्थेला उजाळा देईल?

शशांक मो. गुळगुळे दिवाळी या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी साजरी करू, पण जीवच गेला तर काय करणार?...

अनलॉक

पौर्णिमा केरकर ‘मी’चा सुजाण प्रगल्भ विचारच ‘कोरोना’ला हरवू शकतो! ‘कोरोना’सोबत जगण्याची सवय तर आता करावीच लागेल. हा नवा...

कावा

दत्ताराम प्रभू-साळगावकर अशा लोकांचं वागणं प्रामाणिकपणाचं म्हणजे जणू ‘साधू’सारखं वाटतं. पण ते असतात पक्के संधी‘साधू’! आपण महत्त्वाचे निर्णय...