जमीन घोटाळ्यात राजकीय नेत्यांचाही हात

0
17

>> पोलीस महानिरीक्षकांची माहिती; सबळ पुराव्यांसह अटकेनंतरच नावे उघड करणार; आणखी तीन संशयितांना अटक

राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात अटक केलेल्या संशयितांनी काही राजकीय नेत्यांची नावे उघड केली आहेत. या प्रकरणी कसून तपास केला जात असून, सबळ पुरावे हाती आल्यानंतरच सदर राजकीय नेत्यांना अटक करून त्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्‍नोई यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. तसेच एसआयटीने राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात तीन प्रमुख संशयितांना अटक केली आहे. त्यात रॉयसन रॉड्रिग्स, राजकुमार मैथी आणि सेंड्रिक फर्नांडिस यांचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील जमीन हडपल्या प्रकरणी आत्तापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागांतून जमीन घोटाळ्याची नवनवी प्रकरणे समोर येत असून, त्यात अनेक जण गुंतल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यात आता राजकीय नेत्यांचाही सहभाग असल्याचे अटकेतील संशयितांच्या चौकशीतून समोर आल्याने राज्यात खळबळ माजली आहे.

या प्रकरणातील एक मुख्य संशयित रॉयसन रॉड्रिग्स हा अटक चुकविण्यासाठी विदेशात लपून बसला होता. रॉयसन याला १८ ऑगस्ट रोजी मुंबई विमानतळावरून बाहेर येताना एसआयटीच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात यश प्राप्त केले. म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने रॉयसनला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी राजकुमार मैथी आणि सेंड्रिक फर्नांडिस यांना अटक करण्यात आली आहे, असेही बिश्‍नोई यांनी सांगितले.
राजू मैथी आणि सुहैल शफी हे दोघेही पूर्वी एकत्र काम करीत होते. त्यांच्यात वाद निर्माण झाल्याने राजू याने रॉयसन याला साहाय्य करण्यास सुरुवात केली. संशयितांची अनेक बँकांमध्ये खाती असून, त्यांनी अनेकांना फसविले आहे, असे बिश्‍नोई यांनी सांगितले.
जमीन घोटाळा प्रकरणी संशयितांनी महसूल खात्यातील काही जणांची नावे उघड केली आहेत. त्याबाबत तपास केला जात आहे. या प्रकरणात गुंतलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही. जमीन घोटाळा प्रकरणातील ज्या संशयितांची जामिनावर सुटका झालेली आहे, त्यांना दुसर्‍या जमीन प्रकरणात अटक केली जाणार आहे, असेही बिश्‍नोई यांनी सांगितले.

उत्तर गोव्यातील किनारी भागातील जमिनी मोठ्या प्रमाणात बळकावण्यात आलेल्या आहेत. दक्षिण गोव्यात बळकावण्यात आलेल्या जमिनींची संख्या कमी आहे. उत्तर गोव्यातील आसगाव, हणजूण, नेरूल, पर्रा व इतर भागात जमिनी बळकावण्यात आलेल्या आहेत. जमिनीच्या मूळ दस्तऐवजात बेकायदा दुरुस्ती करून त्या कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावण्यात आलेल्या आहेत. बळकावण्यात आलेल्या जमिनी म्युटेशनच्या माध्यमातून संशयित आपल्या किंवा निकटवर्तीयांच्या नावावर करून घेतल्या आहेत, असेही बिश्‍नोई यांनी सांगितले.

दरम्यान, बार्देश तालुक्यासह अन्य काही तालुक्यांत कोट्यवधी रुपयांच्या जमिनींची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी विकल्याचे दिसून आल्यानंतर सरकारने या जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. या पथकाच्या तपासात अनेक प्रकरणे समोर आली असून, काहींना अटक देखील झाली आहे.

पोलीस महानिरीक्षकांचे जमीनमालकांना आवाहन

जमीन हडपल्या प्रकरणी सर्वे क्रमांक जाहीर करण्यात आलेले आहेत. तथापि, मूळ जमीनमालक या प्रकरणात जमिनीवर दावा करण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येत नाहीत. जमीनमालकांनी आपल्या जमिनीवर दावा करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्‍नोई यांनी केले आहे.

रॉयसनने ६०, तर सेंड्रिकने बळाकवल्या २६ मालमत्ता

येथील ९, बादे-आसगाव येथील ४४ आणि पर्रा येथील ७ मालमत्ता हडप केल्या आहेत. सेंड्रिक फर्नांडिस याने ६४ हजार चौरस मीटरच्या २६ मालमत्ता बळकावल्याचे आढळून आले आहे. त्यात कळंगुट, हणजूण, पर्रा, नेरूल येथील मालमत्तांचा समावेश आहे. एसआयटीला कळंगुट आणि नेरूल येथील ८ मालमत्ता हडप प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तिघांच्या अटकेमुळे एकूण ९५ मालमत्तांची सविस्तर माहिती प्राप्त झाली आहे.