जमीन घोटाळ्याच्या तपासात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप थांबवावा : गिरीश चोडणकर

0
9

जमीन घोटाळा प्रकरणाच्या तपासात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप थांबवावा आणि सदर प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एसआयटीला पूर्ण मोकळीक द्यावी, अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल केली.

आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून होणार्‍या वाढत्या विरोधामुळे असुरक्षित वाटू लागल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपल्या राजकीय विरोधकांवर दबाव आणण्यासाठी प्रत्येक संधीचा वापर करीत आहे. त्यांनी सध्या सुरू असलेल्या जमीन घोटाळ्याच्या तपासात हस्तक्षेप करणे थांबवावे आणि विशेष तपास पथकाला तपासासाठी हात मोकळे करावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

आपण गेल्या २५ जून रोजी बेकायदेशीर जमीन घोटाळा प्रकरणात एका कॅबिनेट मंत्र्याच्या सहभागाचा विषय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. तसेच एसआयटीला मुक्त आणि निष्पक्षपणे काम करण्यासाठी त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी केली होती; परंतु मुख्यमंत्र्यांनी त्याकडे डोळेझाक केली, असे चोडणकर यांनी म्हटले आहे. राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात गुंतलेल्या मंत्र्याचे नाव जाहीर करण्याची घोषणा आपण केल्यानंतर सुध्दा मुख्यमंत्री अजूनही जागे झालेले नाहीत, असेही चोडणकर म्हणाले.

मुख्यमंत्री आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी एसआयटी तपासाचा वापर करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एसआयटीला काही प्रकरणांमध्ये संथपणे कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती प्राप्त झाली असून, आपण लवकरच कागदोपत्री पुराव्यासह मुख्यमंत्र्यांचा पर्दाफाश करणार आहे.

  • गिरीश चोडणकर, कॉंग्रेस नेते.