जन्माचं सार्थक

0
9
  • डॉ. रामनाथ पंढरी गावडे

गोपाळ येताच पारूच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तिच्या चेहऱ्यावरचा असीम आनंद पाहून गोपाळही सुखावला. ती दोघं आनंदाच्या तुडुंब डोहात मनसोक्त नहाली… गोष्ट तशी अगदी छोटीशीच होती पण ती इतरांसाठी; त्यांच्यासाठी मात्र ती वस्तू म्हणजे कुबेराचा खजिनाच होता!

प्रत्येक गावात लक्ष्मीपूजनानंतर येणारा ‘पाडवा’ हा सण विविध प्रकारे उत्साहाने साजरा केला जातो. तसं पाहिलं तर गावात जी मजा पाडव्याच्या दिवशी येते, ती शहरात पाहायला मिळत नाही.
गोपाळ आणि त्याची बायको पारू खूप वर्षांपासून एका छोट्याशा गावात असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी झोपडीत राहत होती. झोपडीच्या जवळपास त्यांनी गुरांसाठी छोटासा गोटा बांधला होता. सहा गुरं त्यांच्यापाशी होती. पूर्वी दोनच होती. त्यांचे दूध विकून ती दोघं आपला उदरनिर्वाह चालवत असत. लग्न झाल्यानंतर खूप वर्षांनी पारूनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. मूल झाल्यानंतर बँकेचं कर्ज घेऊन त्यांनी आणखी गुरं घेतली व आपला दुधाचा व्यवसाय त्यांनी वाढविला. बँकेचे हप्ते वेळोवेळी भरल्यानंतर घर सांभाळून थोडेसे पैसे शिल्लक राहत असत. ती दोघं खूप मेहनती होती. छोट्या झोपडीत त्या दोघांनी आपला सुखाचा संसार थाटला होता.

पाडव्याच्या दिवशी ती दोघं सकाळी लवकर उठून आपल्या गुरांची पोळे गळ्यात बांधून प्रत्येक वर्षी पूजा करायची. आज पारूनं पाडव्याच्या एक दिवस अगोदरच गुरांच्या गोठ्यात साफसफाई केली होती आणि गुरांना बऱ्यापैकी आंघोळ घालून स्वच्छ केलं होतं. आज पारू खूप खुशीत होती. कारण गोपाळनं तिला ‘उद्याच्या पाडव्याच्या दिवशी कानातील सोन्याच्या कुड्या भेट देईन’ म्हणून सांगितलं होतं. दुधाचा व्यवसाय तसा जेमतेमच चालला होता. परंतु पहिल्यांदाच तिला तिच्या लग्नानंतर खूप काबाडकष्ट करून मिळवलेलं सोनं मिळणार होतं. त्या रात्री ती झोपली नाही. सगळं कामं आवरता आवरता मध्यरात्र झाली. आता तिनं बाहेर सुकवून ठेवलेली लाकडं आत आणली आणि चूल पेटवली. चुलीवर तवा ठेवून तिनं उद्या पाडव्याच्या सणासाठी पोळे भाजायला सुरुवात केली. पोळे भाजताना चिमण्या बाहेर चिवचिवाट करत होत्या…
मुलाला कुशीत घेऊन झोपलेल्या गोपाळला पण जाग आली आणि तो लगेच उठला. त्याने आपली आंघोळ उरकली. इतक्यात पारूचे पोळे भाजण्याचं काम संपले. तिनेही आंघोळ केली आणि दोघांनी मिळून गुरांची पूजा करून त्यांचं दूध काढलं. त्यानंतर त्यांनी गुरांना चरण्यासाठी गोठ्याच्या बाहेर रानात सोडून दिलं. संध्याकाळ होताच ती गुरं आपोआप आपल्या गोठ्यात येत असत. चुकून कधी राहिली तर गोपाळ त्यांना आणायला जायचा.

गोपाळ दिवस उजाडल्यावर दूध घेऊन शहरात असलेल्या दुधाच्या सोसायटीत गेला. मग सोनाराचे दुकान उघडे होईपर्यंत त्या दुकानाच्या दरवाज्यापाशी बसून राहिला. आज सकाळी घराकडून येत असताना घरी जमवून ठेवलेल्या पैशांचे गाठोडे घेऊन तो शहरात आला होता आणि दोन दिवसांपूर्वी त्यांनं आपल्या बायकोसाठी सोन्याच्या कुड्या पाहून त्यांची किंमतसुद्धा विचारली होती. दुकान उघडल्यानंतर लगेच त्याला पैसे देऊन त्यानं त्या कुड्या विकत घेतल्या आणि आपल्या घराची वाट तो चालू लागला.

पारू झोपडीच्या दारात आतुरतेनं त्याचीच वाट पाहत होती. इतक्यात गोपाळ आला आणि तो येताच पारूच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तिच्या चेहऱ्यावरचा असीम आनंद पाहून गोपाळही सुखावला. ती दोघं आनंदाच्या तुडुंब डोहात मनसोक्त नहाली… गोष्ट तशी अगदी छोटीशीच होती पण ती इतरांसाठी; त्यांच्यासाठी मात्र ती वस्तू म्हणजे कुबेराचा खजिनाच होता! गरिबीचे असेच असते. छोट्याशा गोष्टीतसुद्धा खूप आनंद भरलेला असतो… काही का असेना, जन्माचं सार्थक झालं असंच पारूला यावेळी वाटलं.