जगात १ लाख ९० हजार कोरोना बळी

0
122

>> अमेरिकेला सर्वात मोठा हादरा; ४९ हजार मृत्यूमुखी

जगभरात गेल्या काही काळापासून प्रचंड दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणूने काल शुक्रवारपर्यंत जगातील विविध देशांत मिळून घेतलेल्या बळींची संख्या १ लाख ९० हजारांवर गेली आहे. यापैकी तब्बल दोन तृतियांश एवढ्या संख्येने युरोपमधील लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर २६ लाख ९८ हजार ७३३ लोकांना या विषाणूने ग्रासले आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये चीन देशात उत्पत्ती झालेल्या या महामारीचा सर्वाधिक तडाखा युरोप खंडातील देशांना बसला आहे. तेथील कोरोनाबाधित मृतांची संख्या काल १ लाख १६ हजार २२१ एवढी नोंद झाली. तर तेथील कोरोनाबाधितांची संख्या १,२९६,२४८ एवढी झाली आहे.

अमेरिकेतील बळींची संख्या

अर्ध्या लाखाच्या दिशेने

या महामारीने जगातील देशांपैकी सर्वात प्रचंड हादरवले आहे ते अमेरिकेला. तेथे ४९ हजार ९६३ लोक कोरोनाचे बळी ठरले आहेत. त्या पाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर २५ हजार ५४९ बळींसह इटली व २२ हजार १५७ बळींसह स्पेन तिसर्‍या क्रमांकावर आहे. तसेच फ्रान्समध्ये २१ हजार ८५६ व ब्रिटनमधील २१ हजार लोक या महामारीमुळे मरण पावले आहेत.

भारतात ७१८ बळी

नवी दिल्ली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कालच्या माहितीनुसार भारतातील कोरोना महामारीच्या बळींची संख्या ७१८ वर गेली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या १७,६०० एवढी नोंद झाली आहे.

भारतात कोरोना महामारीने सर्वाधिक २८३ बळी एका महाराष्ट्र राज्यात घेतले आहेत. तेथील कोरोनाबाधितांची संख्याही ६४०० एवढी सर्वाधिक आहे. गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये प्रत्येकी १५०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण नोंद झाले आहेत.

गुजरातमध्ये कालपर्यंत ११२, मध्यप्रदेशात ८३ व दिल्लीत ५० कोरोना मृतांची नोंद झाली आहे.