चोर्ला घाटात बस उलटून 12 जखमी

0
18

>> 10 प्रवाशांना गोमेकॉत दाखल

>> चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात

सोलापूर महाराष्ट्र येथून गोव्याच्या दिशेने येणारी लांब पल्ल्याची एआर 01 जे 4167 ही खासगी बस चोर्ला घाट परिसरामध्ये उलटल्यामुळे बसमधील 12 प्रवासी जखमी होण्याची घटना काल रविवारी सकाळी घडली. अपघातात सापडलेल्या 12 प्रवाशांपैकी 10 जणांना पुढील उपचारासाठी बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालायत पाठविण्यात आले आहे. उर्वरीत दोन प्रवाशांना साखळी येथील सरकारी आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र बस सरळ रस्त्यावर कोसळल्यामुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोलापूर महाराष्ट्र इथून गोव्याकडे येणारी लांब पल्ल्याची एसआरएस नामक ट्रॅव्हल बस काल रविवारी सकाळी चोर्ला घाट परिसरातील गोवा हद्दीमध्ये एका वळणावर कलंडण्याचा प्रकार घडला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. या गाडीमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. त्यापैकी 12 प्रवासी जखमी होण्याची घटना घडली. अपघातातील जखणी सर्व प्रवाशांना प्रथम साखळी येथील सरकारी सामाजिक रुग्णालयात प्राथमिक उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर 10 जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळी येथे गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वांची प्रकृती सुधारत असून कोणत्याही प्रकारची गंभीर परिस्थिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

नियंत्रण सुटून अपघात

सदर प्रवासी बस सोलापूर महाराष्ट्र येथून काही प्रवाशांना घेऊन गोव्यामध्ये येत होती. कर्नाटक हद्द संपल्यानंतर घाट परिसरात प्रवेश केल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व अपघात घडला. ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी सर्व प्रवासी निद्रावस्थेत होते. अचानकपणे बसला अपघात घडल्याचे समजल्यानंतरच मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. दरम्यान काही प्रवाशांनीच बसमधून बाहेर येत इतर प्रवाशांना बसमधून सुखरूप बाहेर काढले. या संदर्भाची माहिती ताबडतोब 108 रुग्णवाहिकेला देण्यात आली. यावेळीत्वरित 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली ताबडतोब जखमी प्रवाशांना साखळी येथील सरकारी सामाजिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये दोन चालक व एक क्लिनर त्याचप्रमाणे 28 प्रवासी होते. ही बस प्रवाशांना घेऊन गोव्यात सहलीसाठी येत होती. अपघाताचे निश्चित कारण समजू शकलेले नाही मात्र चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भाची माहिती वाळपई पोलीस स्थानकाला मिळताच अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली.

बसचे नुकसान

अपघातामुळे बस सरळ रस्त्यावर कलडंल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर प्रवाशांचे सामान अस्ताव्यस्त पडले. काही प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी सामान सोडून बसमधून रस्त्यावर धाव घेतली. मागोमाग येणाऱ्या काही खासगी वाहनांतील प्रवाशांनी ताबडतोब मदत करून अनेक प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. दरम्यान या संदर्भात पंचनामा पूर्ण करण्यात आला असून त्या संदर्भाची पुढील चौकशी पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.