चेतन शर्माची दांडी

0
20

आपल्या क्रिकेट कारकिर्दीत भल्याभल्यांची दांडी उडवणाऱ्या चेतन शर्माची दांडी एका वृत्तवाहिनीने उडवली आहे. एका वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्याची वेळ त्याच्यावर नुकतीच ओढवली. उच्च पदावरील व्यक्तीने बोलताना, वागताना काही तारतम्य ठेवणे अपेक्षित असते. विशेषतः संवेदनशील विषयांवर भाष्य न करणे आणि माध्यमांसमोर तर मुळीच न करणे नेहमीच हितावह असते. परंतु क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आल्यानंतर क्रिकेट समालोचक राहिलेल्या चेतन शर्माला हे भान राहिले नाही आणि माध्यमांच्या प्रतिनिधीपुढे तो नको नको त्या गोष्टी बोलून गेला. तो बेसावध असताना त्याच्याकडून सर्व गोष्टी वदवून घेतल्या गेल्या. पण बोलणे आणि बरळणे यातला विधिनिषेधही त्यात उरला नाही. निवड समितीच्या प्रमुख पदावरील व्यक्तीकडून भारतीय क्रिकेट संघातील ज्येष्ठ खेळाडूंवर केली गेलेली बेछूट शेरेबाजी क्रिकेटच्या चाहत्यांना पसंत पडणे शक्यच नव्हते. संघातील खेळाडूंवर तर त्याचा फारच विपरीत परिणाम झाला होता. शर्माशी गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये कोणी संघ साथी बोलतही नव्हते असेही आता उघड झाले आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा त्या पदावरून पायउतार होण्याखेरीज त्याच्यापुढे पर्याय उरला नव्हता. गेल्या वेळी टी20 विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर त्याचे पद काढून घेण्यात आले होते, परंतु पक्षकृपेने त्याची पुन्हा त्या पदावर वर्णी लागली होती. परंतु ‘दैव देते नि कर्म नेते’ म्हणतात त्याप्रमाणे त्याला ते सांभाळता आले नाही असे दिसते.
मुळात चेतन शर्माने वृत्तवाहिनीच्या पत्रकारापुढेे केलेली विधाने अतिशय गंभीर होती यात काही वादच नाही. विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील मतभेदांपासून भारतीय संघातील ज्येष्ठ खेळाडू फिटनेस नसताना इंजेक्शने घेतात असा दावा करण्यापर्यंत त्याची मजल गेलेली होती. वेगवेगळ्या विषयांवरची त्याची बेछूट विधाने पाहिल्यास अशी व्यक्ती संघाची निवड निष्पक्षपणे करू शकेल का याविषयीच जनसामान्यांमध्ये शंका निर्माण झाली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे पाच सदस्य असतात. सध्या त्यात एस. शरथ, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि शिवसुंदर दास हे चार अन्य सदस्य आहेत. चेतन शर्माकडे या समितीचे प्रमुख पद देण्यात आले होते. चेतन शर्माची भाजपाशी असलेली जवळीक हे त्यामागील खरे कारण होते.
खरे तर चेतन शर्मा हा राजकारणात उतरला तो बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून. 2009 ची लोकसभेची निवडणूक त्याने फरिदाबाद मतदारसंघातून लढवली होती व अठरा टक्के मते मिळवून तो तिसऱ्या स्थानी आला होता. भारतीय जनता पक्षाची घोडदौड पाहून त्याने अलगद भाजपात प्रवेश मिळवला आणि पक्षाच्या कृपेने त्याची क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदावर वर्णी लागली होती. मात्र, गेल्या वेळी त्याला टी 20 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाच्या पराभवानंतर जबाबदारी स्वीकारून पद सोडावे लागले होते. मात्र, त्याची लवकरच परत वर्णी लागली होती. यावेळी मात्र स्वतःच्या बेजबाबदार वर्तनामुळेच त्याच्यावर ते पद सोडण्याची पाळी ओढवली आहे. पक्षाच्या क्रीडा विभागाचा निमंत्रक असला तरी त्याचा त्याला फायदा होऊ शकला नाही, एवढी बेजबाबदार विधाने त्याने आपल्या त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये केलेली दिसतात. कोणत्याही खेळामध्ये संघभावनेला महत्त्व असते. क्रिकेटसारख्या चुरशीच्या सांघिक खेळामध्ये तर सांघिक प्रयत्नांविना सामना जिंकणे निव्वळ अशक्य असते. अशावेळी संघसदस्यांमध्ये ती भावना वाढीस लावण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी स्वतःचे पूर्वग्रह आणि मतेमतांतरे कुरवाळत बसलेले हे महाशय जी निष्पक्षता अशा पदावरील व्यक्तीकडे अपेक्षित असते तीच घालवून बसलेले होते. त्यामुळे त्यांची गच्छंती अटळ होती.
वृत्तवाहिन्यांच्या स्टिंग ऑपरेशनांनी एकेकाळी देशात खळबळ माजवलेली होती. अलीकडे मोदी सरकारच्या कारकिर्दीत मात्र या मंडळींची स्टिंग ऑपरेशन्स पूर्ण थंडावलेली आहेत. मात्र, चेतन शर्मा या जाळ्यात अडकला. एखादी व्यक्ती जेव्हा विश्वासाने एखाद्या पत्रकाराला काही ‘ऑफ द रेकॉर्ड’ गोष्टी सांगते, तेव्हा ती जगजाहीर करणे पत्रकारितेच्या कुठल्या तत्त्वात बसते हा प्रश्नही विचार करण्याजोगा आहे. वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने चेतन शर्माचा सरळसरळ विश्वासघात केला हे तर दिसतेच आहे. परंतु मुळात आपण ज्या पदावर आहोत ते लक्षात घेता, अशा गोष्टी त्याने न बोलणेच अधिक योग्य ठरले असते. पण बेसावधपणे त्याने सगळी गरळ ओकली आणि वादळ उठले. त्याची परिणती आता अपरिहार्यपणे या गच्छंतीत झाली आहे.