चेंगराचेंगरीला सर्वच यंत्रणा जबाबदार

0
6

>> देवस्थान समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस, ग्रामपंचायत आणि काही धोंड दुर्घटनेला जबाबदार; मुख्यमंत्र्यांची माहिती

शिरगाव येथील श्री देवी लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीला देवस्थान समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस, ग्रामपंचायत आणि काही धोंडांचे बेशिस्त वर्तन जबाबदार असल्याचा ठपका सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने आपल्या अहवालात ठेवला आहे. राज्यातील एखाद्या जत्रोत्सवात अशी चेंगराचेंगरीची घटना प्रथमच घडली असून, यापुढे अशा घटना घडू नये म्हणून आवश्यक सुरक्षा उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिली.

शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रोत्सवात 3 एप्रिल रोजी पहाटेच्या वेळी चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेच्या चौकशीसाठी सरकारने महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली एक चार सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती केली होती. या चौकशी समितीने आपला अहवाल दोन दिवसांपूर्वी सरकारला सादर केला होता. सदर अहवालावर मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेत भाष्य केले.

चौकशी समितीच्या अहवालाचा मुख्य सचिवांच्या सोबत आढावा घेण्यात आला आहे. ही चेंगराचेंगरीची घटना योग्य नियोजनाच्या अभावामुळे घडलेली आहे. या चेंगराचेंगरीला संबंधित सर्व जणांना जबाबदार धरण्यात आले आहे. राज्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून चौकशी समितीने काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे. या घटनेला जबाबदार सरकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून आवश्यक कारवाई केली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या चेंगराचेंगरीमध्ये 6 भाविकांचा बळी गेला आहे. त्यातील पाच जणांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे आपण सांत्वन केले. एकाच्या घरी जाऊ शकलो नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

पुढील वर्षी योग्य खबरदारी
शिरगाव येथील पुढील वर्षीच्या लईराईच्या जत्रोत्सवापूर्वी आवश्यक सुरक्षा उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणच्या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. तसेच, धोंडासाठी खास मार्ग ठेवण्यात येणार आहे. मंदिराचे धार्मिक पावित्र्य राखून राज्य सरकारकडून आवश्यक सुरक्षा उपाययोजना हाती घेतल्या जातील. देवस्थानच्या धार्मिक विधींमध्ये कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मार्गदर्शक सूचना जारी करणार
राज्य सरकारकडून जत्रोत्सवाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार असून, नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री काय म्हणाले?
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) 21 जणांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यातील 18 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे, तर तिघांवर अजून वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. एकाला न्यूमोनिया झाला असून, त्याच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.
या चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू पावलेल्या भाविकांच्या कुटुंबाला प्रत्येकी 10 लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य लवकरच केले जाणार असून, इस्पितळाकडून माहिती घेऊन गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे साहाय्य केले जाणार आहे.

चेंगराचेंगरीमागे कारणे काय?
श्री देवी लईराई जत्रोत्सवात देवाची तळी ते होमखंड या मार्गावर नियोजनाच्या अभावी ही दुर्दैवी घटना घडली.
सदर ठिकाणी रस्त्याच्या बाजूला दुकाने थाटण्यात आल्याने रस्ता अरुंद बनला होता.
जिल्हा प्रशासनाने सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात देवस्थान समितीने सहकार्य केले नाही.
बॅरिकेट्स घालण्यासाठी देवस्थान समितीने सहकार्य केले नाही. त्यामुळे जत्रोत्सवातील गर्दी हाताळण्यासाठी अपयश आले.
गतवषीच्या तुलनेत यावर्षी जास्त पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, योग्य नियोजन नसल्याचे सदर दुर्घटना घडल्याचे चौकशीत आढळून आले आहे.
पंचायत मंडळाकडून वीज जोडणीसाठी ना हरकत दाखला देताना सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले. तसेच, काही धोंडगणांचे वर्तन योग्य नव्हते.

आठ तत्कालीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
राज्य सरकारने शिरगाव येथील जत्रोत्सवातील चेंगराचेंगरी प्रकरणात उत्तर जिल्हा प्रशासनातील आठ तत्कालीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काल जारी केली. त्यात तत्कालीन उत्तर गोवा जिल्हाधिकारी, तत्कालीन उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, तत्कालीन डिचोली उपजिल्हाधिकारी, तत्कालीन डिचोली पोलीस उपअधीक्षक, तत्कालीन डिचोली मामलेदार, तत्कालीन डिचोली पोलीस निरीक्षक, तत्कालीन मोपा पोलीस निरीक्षक आणि शिरगाव पंचायत सचिव यांचा समावेश आहे. दरम्यान, चेंगराचेंगरीचा ठपका ठेवलेल्या सर्वांना कारणे दाखला नोटीस बजावण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.