चित्रे ः नारद व वाल्मीकी, बुद्ध व अंगुलीमलदया-क्षमा-शांती

0
20

योगसाधना- 605, अंतरंगयोग- 190

 • डॉ. सीताकांत घाणेकर

स्वतःला क्षमा करण्याचा संस्कार परत परत विचारात आला तर तो मग आपल्या जीवनात उतरतो. पुन्हा पुन्हा अभ्यास केला, अनुभव घेतला की ते अधिक सोपे होते. आपण स्वतःला सहज क्षमा करायला शिकतो. तद्नंतर दुसऱ्याच्या बाबतीत ते सोपे होते, कारण तसा संस्कार होतो.

बालपणी फोंडा तालुक्यातील नागेशी- बांदोडा येथील श्रीमहालक्ष्मी मंदिरात माझ्या आजोबांबरोबर सुट्टीच्या दिवसांत रोज संध्याकाळी मी जात असे. शेजारीच असलेल्या श्रीनागेश देवस्थानातदेखील जात असे. श्रीमहालक्ष्मीच्या मंदिराच्या प्राकारात एक फलक होता- ‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती।’ मी रोज ते वाक्य वाचायचो. पण त्यावेळी एवढेच कळायचे की, जर देवाची वसती हवी असेल तर मुख्य म्हणजे इतरांवर दया करायला हवी, तद्नंतर क्षमा करणे आवश्यक आहे, त्यानंतर मग शांती. शांती- स्वतःअंतर्गत, कुटुंबात, समाजात, विश्वात आपोआप येणार हे अपेक्षित आहे.

जसजसे वय वाढत गेले, असल्या विषयांवर अभ्यास केला तेव्हा थोडा-थोडा उलगडा व्हायला लागला. पण अनेकवेळा विचार यायचा की, समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या विविध तऱ्हेचे लहानमोठे गुन्हे करतात. त्यांच्यावर दया करून त्यांना क्षमा करायची? मग त्यांचे गुन्हे तर वाढतच राहतील!
थोड्या आणखी अभ्यासानंतर उमगले की गुन्हेगार तो गुन्हा का करतो हे समजायला हवे. केव्हा केव्हा गरिबीमुळे किंवा असाह्यतेमुळे गुन्हा केला जातो. अशा व्यक्तींची चौकशी अवश्य करावी. केव्हा केव्हा दयादेखील दाखवावी लागेल. थोडी शिक्षासुद्धा करावी लागेल. पण त्याचबरोबर मानवतेच्या दृष्टीने शिक्षेचे स्वरूप अपराधावर अवलंबून असते. त्या गुन्हेगाराला समुपदेशन करावे लागते. अनेकवेळा त्या व्यक्तीना आपल्या चुकीची जाणीव होते. ते क्षमा मागतात. बहुतेकजण सुधारतातदेखील. सर्व विश्वात अनेक सामाजिक व आध्यात्मिक संस्था जेलमध्ये जाऊन असले कार्य नियमित करतात. हे खरोखरच मानवतेच्या दृष्टीने भूषणावह आहे.

आध्यात्मिक क्षेत्राचा अभ्यास केल्यानंतर एक वेगळाच मुद्दा माझ्या लक्षात आला. अध्यात्मशास्त्राप्रमाणे या जन्मातील व्यक्तीचे वागणे मागच्या अनेक जन्मांच्या संस्कारांवर निर्धारित आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला तसे सूक्ष्म विचार द्यावे लागतात, अनेक जन्मांचा हिशेब चुकता करायला सांगतात. त्याप्रमाणे ज्ञान देऊन समजावतात म्हणजे त्याचे पुढील जन्मदेखील सुखा-समाधानात जातील. नाहीतर त्यांचे राग-द्वेष चालूच राहतात, जन्मोजन्मी संबंध बिघडतच राहतात.

अशी सुधारणा एका बैठकीत होत नाही तर अनेकवेळा मार्गदर्शन करावे लागते. आध्यात्मिक ज्ञान योग्य तऱ्हेने शास्त्रशुद्ध द्यावे लागते. यासाठी जी व्यक्ती ज्ञान देते तिला संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. तशीच त्या व्यक्तीची साधना व आध्यात्मिक पातळी उच्चकोटीची असायला हवी. हल्ली अनेक व्यक्ती, अनेक महापुरुष समाजात आढळतात, जे असे मानवतेचे कार्य नियमित करतात. इतिहासाकडेदेखील नजर फिरवली तर अशी अनेक उदाहरणे आहेत. उदा. 1) नारद व वाल्या कोळी (जो महर्षी वाल्मीकी झाला), 2) भगवान बुद्ध व अंगुलीमल.
आपणदेखील शास्त्रशुद्ध योगसाधना केली तर आपल्या आभामंडलातील सकारात्मक शक्तीमुळे अन्य व्यक्तींवर शुभ परिणाम दिसेल. त्यामुळेच महापुरुषांच्या सान्निध्यात थोडावेळ जरी राहिलो तरी मनशांती लाभते. मंदिरातदेखील तसाच अनुभव येतो. म्हणून तर तिथेदेखील लिहितात- ‘मंदिराची शांतता व पावित्र्य राखावे!’ दुर्भाग्याने बहुतेकांना हे ज्ञान नसते. त्यामुळे तिथेदेखील त्या व्यक्ती नकारात्मक गोष्टी करतात. कुणाचे परचिंतन, टीका वगैरे… त्यामुळे पवित्र स्थानाचे वायुमंडलदेखील बिघडू शकते.

हे सर्व ज्ञान भारतातील विविध ग्रंथांत आहे. पण बहुतेकजण अभ्यास करीत नाहीत. तसेच सांगितले तरी विश्वास ठेवीत नाहीत. या विषयावर काही ठिकाणी अशा सकारात्मक कंपनांवर शास्त्रशुद्ध संशोधन चालू आहे. वैज्ञानिक यंत्राच्या सहाय्याने असे वायुमंडल दाखवतात- फोटोच्या रूपाने…
‘क्षमा’ या विषयावर अभ्यास करताना नवीनच माहिती समोर आली. एक तत्त्ववेत्ता सांगायचे-

 • तुम्ही इतरांना क्षमा करता, पण त्याआधी स्वतःला क्षमा करायला शिका.
 • काही चूक काढली अथवा केली तर त्याबद्दल अंतर्मनात परत परत आणू नका. स्वतःच्या मनाला असे ‘ओलीस’ धरू नका.
 • आपण काय करायला पाहिजे होते, करू शकलो असतो असा विचार अंतर्मनात परत परत आणून तो अनुभव पुन्हा पुन्हा जगू नका. अशा नकारात्मक विचारांना सोडून द्या. त्यापासून मुक्ती मिळवा.
 • जीवनाची वाटचाल करा- माफ करा व घटना विसरा.
  खरेच, ही थोडी वाक्ये वाचली की लक्षात येते की, यातील प्रत्येक वाक्यात जीवनाबद्दल मार्गदर्शन आहे. काही शब्द तर अगदी योग्यच आहेत. मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान येथे संपूर्णतः आहे.
  अनेकवेळा आपण म्हणतो- ‘चला, मी तुला माफ करतो.’ पण मनात विचार ठेवतो- ‘मी विसरणार नाही!’ अध्यात्मशास्त्राप्रमाणे अशी नकारात्मक गाठ अंतर्मनात ठेवल्यामुळे स्वतःचेच नुकसान होते- वर्तमान जन्मात व पुढील अनेक जन्मांत. शास्त्राचा अभ्यास केला तर हे तत्त्वज्ञान संपूर्ण समजेल.
  ख्रिस्ती धर्मामधील प्रार्थनेत यासंदर्भात एक ओळ आहे-
  ‘हे देवा, मला माझ्या अपराधांसाठी क्षमा कर, जशी मी दुसऱ्याला क्षमा करतो, जे माझ्याविरुद्ध अपराध करतात.’

याचा अर्थ-भावार्थ, गर्भितार्थ, आध्यात्मिक अर्थ समजला तर आपला दृष्टिकोन स्पष्ट होतो. पण दुर्भाग्याने आपण प्रार्थना कर्मकांडात्मक करतो, शब्दार्थदेखील लक्षात घेत नाही. मग इतर पुढील अर्थ काय समजणार?
इतरांना आपण क्षमा करत नाही, कारण क्षमा करण्याचा संस्कार मूळतः आपल्यातच नाही. म्हणून स्वतःला क्षमा करण्याचा संस्कार परत परत विचारात आला तर तो मग आपल्या जीवनात उतरतो. सुरुवातीला कठीण वाटते. पुन्हा पुन्हा अभ्यास केला, अनुभव घेतला तर ते सोपे होते. आपण स्वतःला सहज क्षमा करायला शिकतो. तद्नंतर दुसऱ्याच्या बाबतीत ते सोपे होते, कारण तसा संस्कार होतो.
बहुतेकवेळा आपला समज, आपली शिकवण असते की स्वतःच्या चुकीबद्दल परत परत विचार केला तर आपण ती चूक परत करणार नाही. हा विचार काही अंशी बरोबर असला तरी त्यामुळे आत्मशक्ती कमी होते. त्यामुळे अनेक चुका होण्याची शक्यता वाढते.
स्वतःला क्षमा जरी केली तरी पुढच्या वेळी दक्षता घेणे आवश्यक आहे.
संत कबीर म्हणूनच म्हणतात-
गलती करो, गलतीयाँ करो,
लेकिन एक बार की हुई गलती
दो बार मत करो।
जी व्यक्ती काम करते तिच्याकडून चुका होण्याची शक्यता असतेच, कारण या विश्वात कुणीही ‘पूर्णपुरुषोत्तम’ नाही. उलट चित्तएकाग्रता नसेल तर चूक होण्याची शक्यता वाढते. कारण मनःशांती बिघडते. यासंदर्भात एक मजेशीर गोष्ट आठवते-

एक मुलगा म्हणायचा की मी केव्हाही परीक्षेत नापास झालो नाही. चौकशीअंती कळून आले की तो कुठल्याही परीक्षेला केव्हाही बसला नव्हता. यातला विनोद विसरूया- संदर्भ मुख्य.
मानवी जीवन अत्यंत गुंतागुंतीचे आहे- अनेक व्यक्ती- विविध नाती- वेगवेगळे संस्कार… पूर्व व वर्तमान जन्माचे. केव्हा केव्हा अनेक घटना का घडतात त्याची पार्श्वभूमी सामान्यांना माहीत नसते. त्यामुळे गोंधळ वाढतो, चिंता वाढतात. म्हणून अध्यात्मशास्त्राचा थोडा थोडा अभ्यास प्रत्येकाला आवश्यक आहे. प्रामाणिक प्रयत्न केला तर महान सिद्धांत लगेच समजतात. आपल्या वर्तवणुकीत आणण्यास सोपेही असतात. मुख्य म्हणजे मूळ ईश्वरी ज्ञान व त्याला संपूर्ण समर्पण. नियमित ध्यानसाधणेत हे सहज शक्य होते- सर्वांना- बुद्धिमान व सामान्यांना. प्रामाणिक इच्छा हवी, तसे प्रयत्नही हवेत.