>> गोव्यातील आतापर्यंतची सर्वांत मोठी अमलीपदार्थविरोधी कारवाई; गुन्हा अन्वेषण विभागाकडून तिघा संशयितांना अटक
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने 43.2 कोटी रुपये किमतीचा अमलीपदार्थाचा साठा काल जप्त केला. गोव्यातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. चिकोळणा-मुरगाव येथे सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. जप्त केलेला कोकेन हा अमलीपदार्थ चॉकलेट, कॉफी आणि वेफर्सच्या पॅकेटमध्ये लपवला होता, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पणजीतील पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.
गुन्हा अन्वेषण विभागाने सोमवारी रात्री चिकोळणा बसथांबा परिसरात छापा घालून अंदाजे 4.32 किलो वजनाचे आणि 43.20 कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले. या प्रकरणी निबू व्हिन्सेंट ऊर्फ विल्सन (45, सध्या रा. बायणा वास्को, मूळ कोलकता), मंगेश वाडेकर आणि रेश्मा वाडेकर (रा. सडा वास्को) या दाम्पत्याला अटक केली आहे. संशयित रेश्मा हिला हे अमलीपदार्थ कुणीतरी पाठविले होते. सदर अमलीपदार्थ ती गोव्यात विकण्याचा प्रयत्न करत होती, असे आत्तापर्यंतच्या तपासात आढळून आले आहे. अमलीपदार्थ चॉकलेट, वेफर्स आणि कॉफीच्या पॅकेटमध्ये लपवून ठेवलेले आढळले असून, ते बाहेरून आणले असल्याचा संशय आहे, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.
गुन्हा अन्वेषण विभागाला मुरगाव येथील चिकोळणा बसथांब्याजवळ काही व्यक्ती अमलीपदार्थ विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रशल देसाई, पोलीस कर्मचारी सैमुल्ला मकानदार, नवीन पालयेकर, सुजय नाईक, राहुल नाईक, रोशनी शिरोडकर, निगम खोत यांनी सोमवारी रात्री चिकोळणा बसथांबा परिसरात छापा टाकून निबू व्हिसेंट याला अमलीपदार्थांसह रंगेहाथ ताब्यात घेतले. संशयिताच्या बॅगेत चॉकलेट आणि कॉफीच्या पाकिटात लपवलेला कोकेनसदृश अमलीपदार्थ सापडला. सापडलेल्या अमलीपदार्थाची चाचणी केल्यानंतर तो कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. व्हिसेंट याने पोलीस चौकशीत सडा-वास्को येथील मंगेश वाडेकर आणि रेश्मा वाडेकर हे दांपत्य आपले साथीदार असल्याची माहिती उघड केली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक सर्वेक्षण करून या दांपत्याला मंगळवारी दुपारी 1.30 वाजता अटक केली. या दोघांवरही अन्य गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान, व्हिन्सेंट हा काही दिवसांपूर्वी थायलंड येथे जाऊन आला होता. कोकेन कुठून आले आणि ते कुणाला देण्यात येणार होते, याविषयी तपास सुरू आहे.
दरम्यान, गुन्हा अन्वेषण विभागाने अमलीपदार्थ प्रकरणामध्ये यंदा आत्तापर्यंत 8 गुन्हे दाखल केले असून 11 संशयित आरोपींना अटक केली आहे. गुन्हा विभागाने 19.2368 किलो अमलीपदार्थ जप्त केला असून, बाजारपेठेत या अमलीपदार्थाची एकूण किंमत सुमारे 55 कोटी 27 लाख 60 हजार रुपये एवढी होत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
सर्वांत मोठी कारवाई
गोवा पोलिसांची अमलीपदार्थाच्या विरोधातील आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. गत मार्च महिन्यात गिरी-म्हापसा येथे सुमारे 11 कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते, असे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून कारवाईबद्दल अभिनंदन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अमलीपदार्थ प्रकरणात गोवा पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईबाबत अभिनंदन केले आहे. ही कारवाई अमलीपदार्थांच्या विरुद्ध सुरू असलेल्या लढाईतील सरकारची वचनबद्धता, दक्षता दर्शवते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.