चार प्रवेशांचे तीन अंकी नाटक

0
3
  • ज. अ. रेडकर

लहान-थोर माणसे आपले मुख्य काम विसरून मोबाईलच्या मायाजालात अडकून पडतात. आभासमय जीवनाला खरे मानतात. विज्ञान योग्य रीतीने वापरले तर ते वरदान ठरते आणि त्याचा गैरवापर केला तर त्याच्यासारखा शाप नसतो.

अलीकडे सोशल मीडिया नामक एक भयानक प्रकार बोकाळला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर इत्यादी प्रकार शिगेला पोहोचले आहेत. ज्या वयात मुलांना अक्षरओळख नाही त्या वयातील मुलेदेखील या माध्यमाच्या आहारी गेलेली दिसतात. याचे कारण, त्यांच्या पालकांनी त्यांच्या हातात दिलेला मोबाईल हे होय! बरे, हे मोबाईल साधेसुधे नसतात तर अतिशय आधुनिक तंत्रज्ञानयुक्त! सुरुवातीला बाजारात आलेले मोबाईल फोन हे फक्त परस्परांशी संवाद साधण्यापुरतेच मर्यादित होते. आता तंत्रज्ञानात इतकी प्रगती झाली आहे की, मोबाईलमध्ये अनेक सुविधा मिळू लागल्यात. मुलांसाठी विविध प्रकारचे गेम्स, थोरांसाठी व्हिडिओज, कोणत्याही व्यक्तीशी ती कितीही दूर असली तरी समोरासमोर पाहून बोलण्याची सुविधा, व्हाईस रेकॉर्डिंग, फोटो शुटिंग, रिल्स शुटिंग, कॅल्क्युलेटर अशा एक नाही दोन, अनेक सुविधा या मोबाईलमध्ये आज उपलब्ध आहेत.

मोबाईल हा खिशात सहज मावणारा चालता-बोलता संगणक झाला आहे. आजच्या बायका आपल्या लहान मुलांचे रडणे थांबवण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल देतात आणि गंमत म्हणजे काहीही न समजणारी ती बालके मोबाईलमध्ये दिसणाऱ्या चलत्‌‍चित्रात गुंग होतात आणि रडायचे विसरतात. मोबाईल म्हणजे त्यांच्यासाठी एक खेळणे झाले आहे. अर्थात याचे दुष्परिणाम असतात पण त्याची तमा कुणाला! सतत मोबाईल वापरल्याने डोळ्यातील रेटीनावर परिणाम होतो आणि पुढे पुढे दृष्टी अधू होते हे अनेकांना माहीत असूनही याकडे डोळेझाक केली जाते.
कोणे एकेकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना मोबाईल वापरायला बंदी होती. कारण मुले मोबाईलमध्ये गुंतून पडली तर त्यांचे अभ्यासावरून लक्ष उडते. पण काळ किती क्रूर शिक्षा देतो पहा, त्याने कोरोना पाठवला, शाळा बंद पडल्या, शिक्षणाचा खोळंबा व्हायला लागला म्हणून ऑनलाईन शिकणे आणि शिकवणे हा प्रकार सुरू झाला. त्यासाठी मोबाईल हे अत्यावश्यक साधन बनले आणि शाळेत मोबाईलबंदीचा हुकुम कचरापेटीत बंद झाला.

एक काळ असा होता की मोबाईल ही फक्त श्रीमंत लोकांची मक्तेदारी होती. आज सफाई करणारा कामगारदेखील मोबाईलयुक्त झाला आहे. एकवेळ जेवण नसले तरी चालेल पण मोबाईल हवा. या मोबाईलक्रांतीने जसे फायदे आहेत तसे नुकसानदेखील आहे. आपली अनेक कामे मोबाईलवरून होतात आणि तीही झटपट. महत्त्वाचे म्हणजे वेळ, पैसा आणि दगदग वाचते. नुकसान इतकेच की लहान-थोर माणसे आपले मुख्य काम विसरून मोबाईलच्या मायाजालात अडकून पडतात. आभासमय जीवनाला खरे मानतात. विज्ञान योग्य रीतीने वापरले तर ते वरदान ठरते आणि त्याचा गैरवापर केला तर त्याच्यासारखा शाप नसतो.

मला मात्र या गोष्टीचा आनंद आहे की या मोबाईल क्रांतीमुळे मला अनेक मित्र भेटले. त्यांनी पाठविलेले सुंदर विचार वाचायला मिळाले. नवीन अनुभव मिळाला. विरंगुळा शोधण्याचे नवे साधन हाती आले. यातून मिळालेले काही संदेश अत्यंत मजेशीर तर काही ज्ञानवर्धक असलेले दिसले. काही जीवनाचे सार सांगणारे संदेश मिळाले. काही दुःखावर फुंकर घालणारे संदेश मिळाले. त्यातील काही संदेश असे आहेत :
1) मोठेपणा हा वयावर अवलंबून नसतो तर तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो. कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्त्वाचा भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया आहे. जो आपल्या आयुष्यात माणुसकी जपतो तो नकीच विचारांनी सगळ्यापेक्षा मोठा ठरतो!
2) जिंदगी एक रंगमंच है साहब, किरदार ऐसा निभावो की पर्दा गिराने के बाद भी तालीया बजती रहनी चाहिय।
3) आपल्या आयुष्यात चार दालने येतात. पहिल्या दालनात आपला प्रवेश आपल्या नकळत होतो. जसा या दालनात प्रवेश होतो, मागचं दार बंद होतं. पहिल्या दालनात खेळणी असतात, फुलपाखरं असतात, परी असते, उंदीरमामा असतो, मनीमाऊ, चंदामामा, खारूताई वगैरे बरेच काही असते तसेच स्वप्नील डोळ्यांचे सवंगडी असतात. या दालनात खेळता खेळता कधी तारुण्याच्या उंबरठ्यावर आलो हे कळतच नाही आणि अलगद दुसऱ्या दालनाचे दार उघडते. या दालनात प्रवेश केला की मागचं दार बंद होतं. या दालनात खेळांचे, स्वप्नांचे संदर्भ बदलतात. आपण उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघायला लागतो. आता खेळापेक्षा स्वतःवर जास्त लक्ष केंद्रित होतं. ‘स्व’ची जाणीव होते. मनात इर्षा, जिद्द, महत्त्वाकांक्षा निर्माण होते, विकार जागे होतात, विचार प्रगल्भ होतात. इथेही सवंगडी भेटतात. त्यातल्याच एखाद्याशी आपले विचार आणि मन जुळतं, मग दोघे मिळून स्वप्नपूर्तीच्या मागे लागतात. दालनाच्या मध्यावर येईपर्यंत या दोघांनी एका नवीन जीवाला पहिल्या दालनाचे प्रवेशद्वार उघडून दिलेले असते. स्वप्नामागे धावताना, ती सत्यात आणताना, तिसऱ्या दालनाच प्रवेशद्वार कधी आलं कळतच नाही. तिसऱ्या दालनात प्रवेश होताच मागच दार बंद होतं. तिसऱ्या दालनात पोहचता पोहचता बरीच स्वप्ने पूर्ण झालेली असतात, काही गोष्टी मनासारख्या घडलेल्या असतात, तर काही हातातून निसटून गेलेल्या असतात, बरे-वाईट, सुख-दुःख असे अनेक प्रसंग पचवलेले असतात. शरीर कुरकुरायला लागतं, कोणत्याच गोष्टी तीव्रतेने कराव्याशा वाटत नाहीत. याला अपवाद असतात. पण बहुतेकांच्या आयुष्यात थोडा निवांतपणा येतो. समारंभ संपल्यावर मागची आवराअवर करताना जी धावपळ होते, तशीच आणि तेवढीच धावपळ या दालनात असते. कृतकृत्यता, सार्थकता यांसारखे शब्द या दालनासाठी असतात. आणि चौथ्या दालनात प्रवेश होतो. मागचं दार बंद होतं. हे शेवटचं दालन, तेव्हा पुढे आता काय?? हा विचार मनात नसतो. पुढे दालनच नसल्यामुळे समोरची नजर अंधुक होते आणि पाठीला डोळे फुटतात…

आता मन माघारी फिरतं, बंद दरवाजे उघडणार नाहीत हे माहीत असूनही आत डोकावण्याची धडपड सुरू होते… लहानपण आठवतं, खेळ आठवतात, बालपणातले सवंगडी आठवतात… अगदी ठळक. त्यांचे चेहरेसुद्धा मनाच्या पटलावर उमटायला लागतात, आई-वडील आठवतात. इतर सगळे नातेवाईक गर्दी करतात. तारुण्यातील धावपळ, स्वप्न, सुख-दुःखाचे लपंडाव सगळं आठवतं, मन व्याकूळ होतं. त्याला वाटतं प्रत्येक दालनात डोकावून बघावं, कदाचित अजून तिथे सगळं तसंच असेल… पुन्हा त्यात मिसळावं, चुकांचं परिमार्जन करावं, आनंदाचे क्षण उपभोगावेत, दुःखाचे पुसून टाकावेत, जे आपल्यात नाहीत त्यांना हाकारावं, बोलवावं. त्यांचे हात हातात घ्यावेत, फेर धरावेत.
दालनाची दारं उघडणं तर शक्य नसतं, मग मन किलकिल्या डोळ्यांनी आत डोकावतं, उत्सुकतेने, अधिरतेने… प्रत्येक दालन मोकळं असतं, एखादी पुसटशी खूणसुद्धा तिथे शिल्लक नसते, सगळीच स्वप्नं भासमय… आणि त्याचवेळी शेवटचा दरवाजा उघडतो, दिव्य प्रकाश आणि त्या दिव्य प्रकाशाच्या वाटेवरून आपण अनंताच्या प्रवासाला निघून जातो.
मित्रानो, असं असतं चार प्रवेशाचं तीन अंकी नाटक!