चारपैकी तीन राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत

0
14

पाचपैकी चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल काल रविवारी जाहीर झाला असून त्यातील तीन राज्यांत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता मिळवली आहे. तेलंगणमध्ये काँग्रेस सत्तेवर आली असून मिझोराम राज्याचा निकाल आज सोमवारी जाहीर होणार आहे. राजस्थानमध्ये 115, मध्य प्रदेशमध्ये 163 तर छत्तीसगडमध्ये 54 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तेलंगणामध्ये केसीआर यांच्या बीआरएसला धूळ चारून 64 जागा जिंकत काँग्रेसने दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता हस्तगत केली आहे.
मिनी लोकसभा असे समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने बाजी मारत तीन राज्यांत सत्ता संपादन केली आहे. विशेष म्हणजे 2018च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा या तीनही राज्यात पराभव झाला होता. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मदतीने भाजपने सत्ता मिळवली होती. यावेळी या तिन्ही राज्यांत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच जवळपास लढत झाली. अनेक एक्झिट पोलनी काँग्रेस तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवेल अशी शक्यता वर्तवली होती, मात्र ती खोटी ठरवत भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विजय प्राप्त केला. तर तेलंगणमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्येभाजप तर तेलंगणात काँग्रेसची सत्ता

राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव
गेल्या पाच वर्षापासून सत्तेत असलेल्या गेहलोत सरकारचा पराभव करून भाजपने राजस्थानात विजय संपादन केला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील गटबाजी व भ्रष्टाचार आणि भाजपचा हिंदुत्वाचा नारा यामुळे भाजपला राजस्थानात 115 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. राजस्थानातील एकूण 199 जागांपैकी काँग्रेसला 70 तर इतरांना 14 जागा मिळाल्या आहेत.

मध्य प्रदेशमध्ये पाचव्यांदा भाजप
गेल्या 20 वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता असून यावेळी पुन्हा सत्ता हस्तगत करत पाचव्यांदा विजय मिळवला आहे. यावेळी भाजपने आपल्या काही केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली. तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांचीही ताकद भाजपला मिळाली. त्यामुळे भाजपने या राज्यात पाचव्यांदा सत्ता मिळवताना 230 पैकी 165 जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. राज्यात काँग्रेसला 64 जागा मिळाल्या.

छत्तीसगडमध्ये भाजप विजयी
छत्तीसगडमध्ये भाजपने विजयी कामगिरी करताना काँग्रेसला सत्तेतून पायउतार केले. या राज्यातही स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने 56 जागा जिंकल्या आहेत. तर एकूण 90 जागांपैकी काँग्रेसला 34 जागी विजय मिळवता आला आहे.

तेलंगणमध्ये काँग्रेस
तेलंगण राज्यात गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या बीआरएसचा पराभव करत काँग्रेसने पुन्हा एकदा सत्ता प्राप्त केली आहे. 119 जागा असलेल्या या राज्यात केसीआर यांच्या पक्षाला 39 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने या ठिकाणी 64 जागा पटकावल्या तर भाजपला व एमआयएमला प्रत्येकी 8 जागा मिळाल्या आहेत.

वकासाच्या विचारांचा विजय ः मोदी
आज भारताच्या विकासासाठी राज्यांचा विकास झाला पाहिजे या विचारांचा विजय झाला असून हा ऐतिहासिक विजय आहे. सबका साथ सबका विकास या भावनेचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भाजप मुख्यालयातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जरी भाजपाचा विजय झाला असला तरीही तेलंगणामध्ये भाजपाची पिछेहाट झाली असून तुमच्या या घोषणा तेलंगणापर्यंत पोहचल्या पाहिजेत, असे आवाहन केले. यावेळी मोदींनी तेलंगणामधील भाजप कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानले.

मध्य प्रदेशमध्ये
7 मंत्री पराभूत

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमधील 33 मंत्र्यांपैकी 7 मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या सर्वातील खळबळजनक बाब म्हणजे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचा पराभव झाला आहे. मिश्रा यांचा काँग्रेस उमेदवार राजेंद्र भारती यांनी 8800 हून अधिक मतांनी पराभव केला आहे.

खासदार बनले आमदार
भाजपने या निवडणुकीत चारही राज्यात एक नवा प्रयोग करताना लोकसभेतील खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिली होती. भाजपने एकूण 21 खासदारांना रिंगणात उतरवले होते. त्यापैकी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 7, छत्तीगसगडमध्ये 4 आणि तेलंगणमध्ये 3 खासदार रिंगणात होते. आता विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी खासदारांना 14 दिवसांत कोणती तरी एक जागा सोडावी लागणार आहे.

जनादेश स्वीकारतो ः राहुल
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील जनादेश आम्ही विनम्रतापूर्वक स्वीकारत आहे. मात्र विचारधारेची लढाई आम्ही सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी यावेळी तेलंगाणमधील लोकांना धन्यवाद देताना प्रजालू तेलंगाणा बनवण्यासाठी आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू असे सांगितले. तेलंगणच्या जनतेने इतिहास रचत काँग्रेस पक्षाच्या बाजूने जनादेश दिला आहे. हा प्रजाला तेलंगाणाच्या जनतेचा विजय असल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले.

गेहलोत यांचा राजीनामा
जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसचा पराभव मान्य करत आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. राजस्थानमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे राजीनामा सोपवला.

मुख्यमंत्री बघेल यांचा राजीनामा
छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल रात्री उशिरा राजभवनात पोहोचले आणि त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. पराभवाचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.