चष्मा

0
34
  • (क्षणचित्रं… कणचित्रं…)
  • प्रा. रमेश सप्रे

भव्य शहरं, इमारती उभारण्यासाठी, स्वप्नं पाहण्यासाठी केवळ डोळ्यांचा चष्मा पुरत नाही तर ‘डोक्याचा (बुद्धीचा) चष्मा’ही बदलावा लागतो. स्वप्नं डोळ्यांनी पाहिली जातात, पण ती सत्यात उतरवण्यासाठी दृष्टी हवी असते.

एका मोठ्या शहरातील पुतळासंकुल. म. गांधी, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींचे भव्य पुतळे. त्यांना हार घालण्यासाठी केलेली फिरत्या शिडीची व्यवस्था. बाजूला असलेल्या जागेत नीटनेटके उद्यान. मुलांसाठी क्रीडा-अवकाश (प्ले-स्पेस), एक देखणा फिरण्याचा मार्ग (जॉगिंग ट्रॅक). एकूण, सर्वांच्या दृष्टीनं एक सौंदर्यस्थळ. उद्घाटनानंतर काही महिने सारं काही व्यवस्थित, जिथल्या तिथं होतं. नंतर मात्र दृष्ट लागली. काही समाजकंटकांनी किंवा उन्मत्त युवकांनी या तिन्ही पुतळ्यांचे चष्मे पळवले. ते पुन्हा घातले गेले. पुनः पुन्हा पळवले गेले. सिमेंटनं घट्ट बसवलेले चष्मेही तोडून नेले गेले. यावर उपाय काय? एकाला एक युक्ती सुचली. तिथं एक फलक लावला. त्यावर लिहिलं होतं- ‘आजूबाजूला घडणारा भ्रष्टाचार, प्रदूषण, हिंसा हे पाहणं या महान व्यक्तींना सहन करावं लागू नये म्हणून त्यांचे चष्मे पळवणार्‍या त्यांच्या भक्तांना धन्यवाद!’
…आणि काय आश्‍चर्य! त्यानंतर चष्मे पळवले गेले नाहीत. कदाचित आपल्याला त्यांचे भक्त म्हटले याची लाज त्या गंमतखोरांना वाटली असेल. असो.

आरशाचा उल्लेख श्रीरामाच्या बालपणीच्या चंद्र हातात धरण्याच्या प्रसंगी होतो, तसा चष्म्याचा होत नाही. पहिला चष्मा (लुकिंग ग्लास) परदेशात बनवला गेला असं म्हणतात. आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. चष्म्याचं आपल्या जीवनातलं स्थान पक्कं आहे. आता तर दूरदर्शन, भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) छोटा पडदा, संगणक किंवा लॅपटॉप यांच्या पडद्यांवर नजर तासन्‌तास खिळून राहिल्याने चष्मा चाळिशीत न येता ऐन विशीपूर्वीच येऊ लागलाय. डोळ्यांचे विकार घराघरांतून बळावताहेत नि त्याबरोबर चष्मेही!
आजोबांचा चष्मा हा तर विनोदाचा विषय होऊन राहिलाय. त्यांच्या चष्म्याचा शोध घरभर आबालवृद्धमंडळी करत असतात. तेवढ्यात छोटी तनू म्हणते, ‘‘आजोबा, तुम्ही वर काय पाहताहात?’’ आजोबांनी ‘‘का गं तनू, असं का म्हणतेस?’’ असं बोलताना सहज हात डोक्यावर नेला तेव्हा चष्मा तिथं होता. हे समजल्यावर सगळं घर खळखळून हसू लागलं. यात आजोबांचा आवाज अर्थातच गडगडाटी होता.

चष्म्याची हीच तर गंमत आहे. अतिशय आवश्यक असलेली ही वस्तू अनेकदा कुठे ठेवली हेच लक्षात येत नाही. काका चष्मा शोधताहेत हे पाहून चाणाक्ष चंदूनं एकच प्रश्‍न विचारला, ‘‘काका, इथं येण्यापूर्वी आपण काय करत होता?’’ या प्रश्‍नाचं उत्तर ‘कधी जेवत होतो तर कधी स्नान करीत होतो’ असं आलं तर चंदू चतुरपणे तडक बाथरूममध्ये किंवा जेवणाच्या टेबलवर शोधून काकांचा चष्मा शोधून आणीत असे. पावलोपावली आवश्यक वाटणारा चष्मा असा कसा विसरला जातो हा एक यक्षप्रश्‍न आहे, नाही का?
अगदी सुरुवातीला चष्मा आकार वाढवून दाखवणारी काच (मॅग्निफाईंग ग्लास) म्हणून उपयोगात येई. नाकावर टेकवून कानांच्या आधारानं राहणारा चष्मा नंतर आला. गमतीनं एकाला विचारलं, ‘‘तुझं नाक कापून टाकलं तर काय होईल?’’ तो म्हणाला, ‘‘मला दिसणार नाही.’’ यावर त्याला विचारलं, ‘‘तू काय नाकानं पाहतोस?’’ त्याचं तत्पर उत्तर आलं, ‘‘नाही. पण मला चष्म्याशिवाय दिसत नाही अन् नाकच नसलं तर चष्मा डोळ्यांसमोर राहणार तरी कसा?’’ उत्तर व्यावहारिकदृष्ट्या योग्यच होतं. असो.

आरंभीला चष्म्याची भिंगं (लेन्सेस) बसवण्यासाठी आवश्यक असणारी फ्रेम ही जनावरांच्या शिंगांपासून बनवत. आता विविध धातू, प्लास्टिक यांचा उपयोग करून अक्षरशः हजारो निरनिराळ्या फ्रेम्स बनवल्या जातात. काही आकाराने अगदी लहान, तर काही गालांना झाकतील एवढ्या मोठ्या (गो गो ग्लासेस). त्यांचे आकार, फॅशन्स नेहमी बदलत असतात. मध्यंतरी चष्मा घातल्यावर व्यक्ती बावळट, उगाचच स्कॉलरसारखी दिसते म्हणून विशेषतः मुली कॉंटॅक्ट लेन्सेस वापरू लागल्या. कपड्यांच्या रंगाला मॅचिंग अशा रंगाची कॉंटॅक्ट लेन्सेस बनू लागली. पण हे सारं बाह्यसौंदर्यासंबंधात ठीक होतं; आंतरिक सौंदर्याचं (इनर ब्युटीचं) काय?
यातून एक महत्त्वाचा विचार वर आला. चष्मा नजर (साइट) सुधारतो. पण नवी दृष्टी देतो तो डोळ्यांचा डॉक्टर वा चष्म्यांचा व्यापारी नव्हे तर तो आहे शिक्षक किंवा गुरू! नजर डॉक्टर सुधारतो पण नजरिया (दृष्टी, व्हिजन) गुरूच बदलतो. दुर्योधन अर्जुनाप्रमाणे कृष्णाला गुरू नि स्वतःला शिष्य मानून शरण गेला असता तर कृष्णानं त्याची दृष्टी, वृत्ती सुधारून त्याची कृती बदलली असती. थोडक्यात, गुरू आपल्या शिष्याच्या मनाचा चष्मा बदलतात. त्याची जीवनदृष्टीच बदलून टाकतात.

भव्य शहरं, इमारती उभारण्यासाठी, स्वप्नं पाहण्यासाठी केवळ डोळ्यांचा चष्मा पुरत नाही तर ‘डोक्याचा (बुद्धीचा) चष्मा’ही बदलावा लागतो. स्वप्नं डोळ्यांनी पाहिली जातात, पण ती सत्यात उतरवण्यासाठी दृष्टी हवी असते. ज्या रंगाचा चश्मा आपण डोळ्यांवर चढवू त्या रंगाची बाहेरची सृष्टी आपल्याला दिसू लागते. म्हणूनच म्हणतात- ‘दृष्टी तथा सृष्टी.’ कावीळ झालेल्यांना सर्वच गोष्टी पिवळ्या दिसू लागतात.

एक मार्मिक प्रसंग आहे. समर्थ रामदास अशोकवनातील सगळी फुलं पांढरी होती असं वर्णन करत होते. एका वृद्ध श्रोत्यानं त्यांना ती फुलं तांबडी असल्याचे सांगितले. तो श्रोता हनुमान होता. दोघांचा वाद श्रीरामासमोर गेल्यावर श्रीराम म्हणाला, ‘‘हनुमान बरोबर आहे; पण रामदास चूक नाहीत!’’ कारण विचारल्यावर श्रीराम म्हणाला, ‘‘सीतेची करुण अवस्था पाहून हनुमंताचे डोळे रागाने लाल झाले म्हणून त्याला सारी फुलं लाल दिसली. प्रत्यक्षात ती फुलं पांढरी होती.’’
चष्म्याची महत्त्वाची मर्यादा म्हणजे तो फक्त बाहेरचं दाखवतो. आत्मदर्शन, आतलं स्वरूपदर्शन करण्यासाठी अंतर्दृष्टीच हवी. तंत्रज्ञानानं कितीही प्रकारचे चष्मे दिले तरी ते शरीराच्या बाहेरचेच असणार. आपली दृष्टी मात्र बुद्धीचाच आविष्कार असते. कधीकधी वाटतं, यंत्रमानवाला (रोबोला) चष्म्याची गरज पडेल का?