‘चवथी’चा मूळ आत्मा हरवतोय

0
19
  • – नारायण महाले

हल्ली गणपतीचा घरातला मुक्काम दीड दिवसांच्याऐवजी अधिक दिवसांचा होऊ लागला आहे; पण चवथीचा मूळ आत्मा कुठंतरी हरवल्यासारखा वाटतो. मजा आणि धमाल नाही पूर्वीसारखी. सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या घरी भजन, आरत्यांना जाणं आणि सगळीजणींनी मिळून फुगड्यांना जाणं फारच दुर्मिळ झालंय. हल्ली त्या फुगड्याही नाहीत आणि भजनं आणि आरत्याही नाहीत.

‘दसरा सण मोठा-नाही आनंदाला तोटा’ अशा शद्बात दसर्‍याचा मोठेपणा घाटमाथ्यावरच्या प्रदेशात सांगितला जातो. आपल्याकडे मात्र ‘चवथ’ सण मोठा-नाही आनंदाला तोटा’ हेच खरे. आपल्याकडे ‘चवथ’ हाच मोठा सण. चवथ केव्हा रे ? असं मुद्दामहून कुणाला विचारावं लागत नाही. श्रावण आला की चवथीची चाहूल लागते. आणि श्रावण सरता-सरता चवथीचे वेध लागतात. गणपतीच्या चित्रशाळांचे पूर्वतयारीचे फलक झळाळू लागतात. गणपतीच्या मूर्ती साच्यातून आकाराला येऊ लागतात. आणि मग आपणही आपल्या मूर्तीकाराकडं ‘वर्सलीचा’ अर्थात वर्षपद्धतीप्रमाणे ‘गणपतीचा पाट’ नेऊन देतो. ‘माझा गणपती गेल्या वर्षीपेक्षा आणि अमक्यातमक्याच्या गणपतींपेक्षा वितभर तरी उंच हवा’ अशी सूचनावजा मागणी करून मूर्तीचे आगाऊ आरक्षण करून मोकळे होतो.

चवथ जवळ येऊ लागली की मग मात्र आपली लगबग वाढते. आपणच वर्षभर ‘आज नको उद्या बघूया’ म्हणून लांबणीवर टाकलेली घराची कामे एकामागून एक अशी झपझप समोर येऊ लागतात. गणपतीच्या खोलीत गेल्या वर्षी ठेवलेला चौरंग तसेच चवथीला बांधलेली माटोळी खाली उतरवून त्यावर वर्षभर साचून राहिलेली धूळ, कोळिष्टके साफ करतो. घराची साफसफाई आणि आणखी काही किरकोळ कामंही पटापट करू लागतो.

चवथ म्हणजे निसर्गाची पूजा. चवथीला निसर्ग आपले पानांफुलांचं देणं देतो. माळरानांवर आणि कुठुं-कुठं मोकळ्या जागते उगवलेली पिवळीधम्मक ‘हरण-फुलं, तर कुठं झाडांवरच्या वेलींना लटकणारी लाल ‘कवनाळं’, हिरव्या-पोपटी कांगल्यांचा घोस, किवनीचे चिवट दोर शोधण्यासाठी राना जावं लागतं. अलीकडं ‘माटोळीचं देणं’ गोळा करण्यासाठी रानोमाळ कुणी भटकत नाहीत. वेळ नाही तेवढासा. आणि पूर्वीसारखी रानमाळही राहिली नाहीत फारशी. त्यासाठी चवथीच्या बाजाराला जावं लागतं. चवथीच्या निमित्तानं शहराच्या तिठ्यावर भरणारा चवथीचा बाजार ही नजरेत भरण्यासारखी विशेष बाब. आपल्याकडच्या ‘पुरुमेंताच्या’ फेस्तासारखं हे औटघटकेचं फेस्त. चार गावची माणसं आपापल्या रानावनांतल्या-परसातल्या राखून ठेवलेले माटोळीचे साहित्य चवथीच्या बाजारात विकायला घेऊन येतात. या बाजारात चवथीसाठी लागणारं सगळं सामान विकत मिळतं. चवथीच्या इतर सामानांबरोबर मोटोळीपुरतं सामान विकत घेतलं की झालं. मुठभर हरण फुलं, एखादंदुसरं कवनाळ ते सुद्धा मिळालं तर…! एखादा कांगल्यांचा घोस, किवनीचे मुठभर दोर, एखादं तवसं, लहानसा दुदी, सुपारीचं पिकलेलं एखादं लहानगं शिंवडं. आणखी काय… काय…!

बाजारातून विकत आणलेल्या माटोळीच्या सामानानं माटोळी सजवण्याची नवी रित, परंपरा आपल्याकडं रूजू लागली आहे. माटोळीसाठी लागणारे आंब्याचे ताळे मात्र बाजारातून विकत आणायची पाळी अजूनपर्यंत तरी आपल्यावर आलेली नाही. असो. पुढं काय होईल ते होवो. सध्या तरी चिंता करायची गरज नाही.

गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार वेळप्रसंगी, स्वत:च्या सोयीनुसार वागणं हा तर आपला गुणधर्मच. कसंही आणि कोणत्याही मार्गानं वाडवडलांनी घालून दिलेल्या परंपरेचं पालन केलं की देव पावला. यावर्षी काही चुकलंमाकलं, तर पुढच्या वर्षी नक्कीच बघता येईल ही आपली मनोवृत्ती. नाहीतरी गणपती पावतोच आपल्याला!

अलीकडं मात्र चवथीचं एकंदरीत मूळचं रूप आणि ‘माहोल’ खूपच बदललाय. गणपती दिवसेंदिवस मोठमोठे होऊ लागले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी वीतभर का होईना पण उंच आणि शेजार्‍यापाजार्‍यांपेक्षा आपलाच गणपती उंच आणि मोठा हवाय अशी सार्वत्रिक भावना होऊ लागली आहे. गणपतीची मूर्ती चिकणी मातीची, शाडूच्या मातीची की प्लॉस्टर ऑफ पॅरिसची याचाही विचार कुणी करत नाही. सार्वजनिक गणपतीपेक्षा आपल्या घरातला गणपती उंच, मोठ्ठा व्हायला लागलाय. पार माटोळीला टेकून माटोळीचाही भार आपल्या डोक्यावर घेऊ लागला आहे.
अलीकडं गणपती घरात आणताना आणि विसर्जनाला नेताना दहाबाराजणांची आणि वाहनांचीही गरज पडू लागली आहे. डोक्यावरून गणपती आणणं आणि विसर्जनाला नेणं ही मूळ गावगिरी संकल्पना काळाच्या ओघात नाहीशी होऊ लागली आहे. हल्ली गणपतीचा घरातला मुक्काम दीड दिवसांच्याऐवजी अधिक दिवसांचा होऊ लागला आहे; पण चवथीचा मूळ आत्मा कुठंतरी हरवल्यासारखा वाटतो. मजा आणि धमाल नाही पूर्वीसारखी. सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या घरी भजन, आरत्यांना जाणं आणि सगळीजणींनी मिळून फुगड्यांना जाणं फारच दुर्मिळ झालंय. हल्ली त्या फुगड्याही नाहीत आणि भजनं आणि आरत्याही नाहीत. आता तर ‘शेजार्‍याला शेजारी पाड आणि दायज्याला दायजी पाड’ अशी समाजव्यवस्था निर्माण होऊ लागली आहे. आपापसातील जुने हेवेदावे, भाऊबंदकीतले तंटे, तेढी चवथीच्या दिवसांत नेमकी एखाद्या रोगाच्या साथीसारखी डोकं वर काढू लागतात.

पूर्वी भजनाला काळ्या किंवा पांढर्‍या वाटाण्यांची खमंग मसालेदार उसळ असायची. आता तशी दणकेबाज रात्र-रात्र जागवून केलेली भजनं-आरत्या नाहीत, म्हणून खमंग, मसालेदार उसळ नाही. कुणा घरी ‘प्रसाद’ म्हणून गणपतीसमोर ‘खडखड्या’ लाडवांचे ताट ठेवले, तर भजन-आरत्यांचे तालसुर खटखटू लागतात. आणि ज्यांच्या घरी वाटाण्यांची खमंग नि मसालेदार उसळ, त्यांच्या घरच्या आरत्या, भजनं टाळमृंदगांनी दुमदुमू लागतात.

गणपतीच्या पूजेतही घाईगडबड, झटपणपणा आणि चटचटीतपणा. गणपतीला फक्त दुरून ‘फुलं’ वाहण्याचा प्रकार घडतो. दुसर्‍या बाजूला चवथीला फटाक्यांचा नुसता धूर निघतोय. त्यातही अंतर्गत चढाओढ. एकानं चार फटाके-ऍटमबॉम्ब लावले, तर दुसरा डझनभर लावतो. तिसरा डझनांच्या वर लावतो. बाकीच्यांचं तर काही विचारूच नका. नुसती वरवरची धम्माल, मज्जा, दिखाऊपणा आणि पैशांचा धूर. चवथ ज्याची-त्याची. गणपतीही ज्याचा-त्याचा. ज्याला हवी, तशी त्यानं साजरी करावी; पण ती प्रदूषणविरहित असावी, असं मनोमन वाटतं. पण लक्षात कोण घेतो?
कुणाचा कुणाला मेळ नाही, तरीही चवथीचा सण येतो आणि गणपतीही घरात येतो. घरातल्यांच्या मर्जीनुसार आणि सोयीनुसार मुक्कामाला राहतो. घरातल्या लहानथोरांकडून, जाणत्यानेणट्यांकडून आपली सेवाचाकरी करून घेतो. आणि उत्तरपूजेनंतर ‘गणपतीबाप्पा मोरया – पुढच्या वर्षी लवकर या’ अशा टाळमृंदगाच्या गजराच्या तालावर आपल्या मुक्कामाला निघून जातो.

  • नारायण महाले