चंद्रावर सापडले सल्फर : इस्रो

0
11

>> ऑक्सिजनसह ॲल्युमिनियम, कॅल्शियमचेही अस्तित्त्व

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेला मोठे यश मिळाले असून, इस्रोने मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली. विक्रम लँडरमधून वेगळे झाल्यानंतर प्रज्ञान रोव्हरने आपल्या कामास सुरुवात केली आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील मातीचे परीक्षण सुरू केले असून, दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याचा निर्वाळा प्रज्ञान रोव्हरने दिला आहे. एकूण 9 खनिजे आणि ऑक्सिजनचे प्रमाण देखील चंद्रावर आढळले आहे. मानवाला जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असून, त्याचेच अस्तित्व चंद्रावर आढळले आहे. त्यामुळे इस्रोच्या चांद्रमोहिमेला मोठे यश मिळताना दिसत आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने काल सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत याबाबतची माहिती दिली. सर्वात महत्त्वाचे मानवी जीवनासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजनचे प्रमाण चंद्रावर सापडले आहे.
दुसरीकडे, प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रथमच, इन-सीटू मापनांद्वारे, रोव्हरवरील ‘लेझर-इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप’ (एलआयबीएस) या उपकरणाने दक्षिण ध्रुवावर असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर स्पष्टपणे सल्फर शोधला आहे. आता हायड्रोजनचा शोध सुरू आहे, असे ट्विट इस्रोने केले आहे.
याशिवाय ॲल्युमिनियम, कॅल्शियम, फेरस, क्रोमियम, मँगनीज, सिलिकॉन आणि टायटेनियम असल्याचे स्पष्ट झाले आहे.