28 C
Panjim
Tuesday, September 22, 2020

घोडचूक

शैक्षणिक माध्यम प्रश्नावरील आपल्या अल्पसंख्यकांभिमुख धोरणामुळे सध्या देशी भाषाप्रेमींच्या रोषाचे लक्ष्य ठरलेल्या भारतीय जनता पक्षाने ‘आक्रमकता हाच सर्वोत्तम बचाव’ या धोरणाने भाभासुमंवर जोरदार प्रतिहल्ले चढवायला सुरूवात केली. मात्र, पक्षाची ही निर्वाणीची रणनीती पुरती अंगलट आलेली दिसते. भाभासुमंचे समन्वयक व गोव्याचे संघचालक सुभाष वेलिंगकर आणि मंचाचे नेते पुंडलिक नाईक या दोघांवर ज्या प्रकारे व्यक्तिगत स्वरूपाचे हल्ले चढवले गेले, त्यातून त्या दोघांच्या नालस्तीपेक्षा पक्षाचीच अधिक हानी झाली आहे. स्वतःचे नाणे खोटे आहे हे स्वतःला ठाऊक असताना उसना आव आणून दिलेले आक्रमक प्रत्युत्तर ही भाजपा नेत्यांनी केलेली धोरणात्मक घोडचूक म्हणावी लागेल. नरेंद्र सावईकरांनी केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे जनतेची सहानुभूती वेलिंगकरांकडे झुकली आहे. कॅसिनोंपासून माध्यमांपर्यंत भाजपा आपल्या ध्येयधोरणांपासून भरकटत चालला आहे अशी जनभावना बनू लागली होतीच. वेलिंगकरांवरील वैयक्तिक हल्ल्यांमुळे ती अधिक ठळक बनली, याचे भान पक्षनेत्यांनी ठेवायला हवे. भाभासुमंच्या बोचर्‍या टीकेकडे आजवर केला तसा कानाडोळा करून केवळ स्वतःच्या तडजोडीच्या धोरणाचे समर्थन करीत राहणे एवढ्यापुरताच भाजपचा प्रतिवाद सीमित राहिला असता, तर कोणत्या राजकीय अपरिहार्यतेपोटी हा तडजोडीचा मध्यममार्ग पत्करावा लागला हे आम जनतेपर्यंत पोहोचवण्याची संधी पक्षाला लाभली असती. परंतु जेव्हा जहरी, जळजळीत शब्दांच्या जोडीने राजकीय पर्यायाची भाषा भाभासुमंने सुरू केली तेव्हा भाजपा नेत्यांचा तोल गेला आणि आक्रमक प्रत्युत्तराची रणनीती आखण्यात आली. मात्र, तिचे उमटलेले पडसाद लक्षात घेता यापुढे या आक्रमकतेला आवर घालणेच पक्षासाठी शहाणपणाचे ठरणार आहेे. प्रत्युत्तरे देत बसण्याऐवजी पुढील महिन्यात घरोघरी माध्यम प्रश्नाचे राजकीय कंगोरे जनतेला समजावून देणे अधिक उपकारक ठरेल. सध्या तापलेल्या वातावरणाचे खापर वर्तमानपत्रांवरही फोडण्यात आले. संघ आणि भाजपाचे संबंध सुरळीत आहेत आणि केवळ वर्तमानपत्रेच दोहोंत मतभेद असल्याच्या वावड्या उडवीत आहेत असा आव नेत्यांनी भले आणला असला, तरी संघाच्या स्थानिक ज्येष्ठ नेत्यांची वक्तव्ये वेगळेच चित्र दर्शवतात. संघ व भाजपातील मतभेद मिटल्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. वेलिंगकर अजूनही तेवढेच आक्रमक आहेत आणि राज्यातील संघाचे संपूर्ण जाळे त्यांच्या पाठीशी उभे आहे असे दिसते आहे. भाजपा नेत्यांनी जरा गोव्याच्या गावोगावी जाऊन संघ स्वयंसेवकांच्या मनात खदखदत असलेल्या तीव्र संतापाचा कानोसा घ्यावा. सत्तेच्या गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांना कार्यकर्ते मानून बसलेल्यांना आजवरच्या निवडणुकांत तळमळीने आणि निरपेक्षपणे वावरत आलेले संघ कार्यकर्ते नकोसे झाले आहेत काय? सध्याच्या संघर्षाला आणखी एका अंतर्गत राजकारणाची किनार दिसते. संघ व भाभासुमंच्या टीकेचा रोख केवळ मनोहर पर्रीकरांवरच आहे. अत्यंत संयमाने वागून आणि राजकीय चतुराई दाखवीत भाभासुमंच्या टीकेचा रोख मुख्यमंत्री असूनही पार्सेकरांनी स्वतःकडे वळू दिलेला नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे. उलट भाभासुमंला व्यक्तिशः त्यांची सहानुभूतीच दिसते व संघालाही ते जवळचे वाटतात. राजकीय अपरिहार्यतेपोटी सरकारला माध्यमप्रश्नी तडजोड करावी लागली हे जनतेने एकवेळ स्वीकारले असते, परंतु एकेकाळी सत्तेवर येण्यासाठी ज्या भाभासुमंची मदत झाली, त्यापासून पूर्ण फारकत घेणे, वर कॉंग्रेसने सुरू केलेले इंग्रजी अनुदान बंद करायला हवे असे आम्ही कधीच म्हटले नव्हते असे सांगणे, अनुदानाला कायदेशीर रूप देण्याचा अतिउत्साह दाखवणे आणि देशी भाषांसाठी घोषित केलेल्या योजनांची कालबद्ध कार्यवाहीच न करणे आणि तरीही ठायी ठायी ‘आम्ही मातृभाषाप्रेमीच आहोत’ असा घोष करणे यातून देशी भाषाप्रेमींच्या मनात आपण फसवलो गेल्याची भावना निर्माण झाली तर त्यांचे चुकले असे कसे म्हणावे? या ठसठसत्या जखमेवर सावईकर आणि तेंडूलकर यांच्या आक्रमक प्रत्युत्तरांनी जणू मीठ चोळले गेले. निदान यापुढील काळात भाजपा नेत्यांनी संयम बाळगला आणि जहाल टीका मुकाट्याने सहन करीत आपल्या शैक्षणिक माध्यम धोरणात काही सुवर्णमध्य काढला तरच या तापलेल्या वातावरणात तरणोपाय राहील. आततायीपणे प्रत्युत्तरे दिल्यास बुडत्याचा पाय अधिकाधिक खोलातच जात राहील.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी….

डॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...

कोरोना विरोधात रसायन द्रव्ये

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...

भाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...

गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३

वैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

ALSO IN THIS SECTION

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

मेहेरबानी का?

गोव्यातील खासगी इस्पितळांवर राज्य सरकार आणि विशेषतः आरोग्य खाते फारच मेहेरबान दिसते. देशातील बहुतेक सर्व राज्यांनी खासगी इस्पितळांतील कोरोना रुग्णांवरील उपचाराचे दर...

असंतोषाचे ‘बादल’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिनीच त्यांच्या मंत्रिमंडळातील विश्‍वासू मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाच्या एकुलत्या एक मंत्री हरसिम्रतकौर बादल यांनी सरकारच्या ‘शेतकरीविरोधी...

चौकशी करा

राज्यातील बांधकाम मजूर घोटाळाप्रकरणी निवृत्तीच्या उंबरठ्यावरून लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी दिलेला निवाडा सरकारची अब्रू वेशीवर टांगणारा आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये बांधकाम...

दिलासा आणि भरवसा

कोरोनाने मानवाची सर्वश्रेष्ठत्वाची अहंता उद्ध्वस्त केली. डोळ्यांना न दिसणारा, संवेदनांना न जाणवणारा एखादा अतिसूक्ष्म विषाणू देखील ह्या अब्जावधी माणसांना एवढे हतबल करू...