Home Featured ग्रंथोत्सवाचे फलित

ग्रंथोत्सवाचे फलित

0

नॅशनल बुक ट्रस्ट म्हणजेच राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा भव्य ग्रंथोत्सव नुकताच गोव्यात, पणजीत भरला. पाच दिवसांत हजारो विद्यार्थ्यांनी आणि वाचकांनी त्याचा आनंद लुटला. ह्या महोत्सवाला गोव्यात आणण्याचे श्रेय लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनचे श्री. किरण ठाकुर यांना द्यायला हवे. त्यांनी एनबीटीला गोव्यात येण्याचे निमंत्रण दिले, म्हणूनच केंद्र सरकारच्या शिक्षण खात्याच्या अखत्यारीतील ह्या संस्थेची पावले गोव्याकडे वळली. नाही तर अशा प्रकारचा, एवढ्या भव्य स्वरूपातील ग्रंथोत्सव गोव्यात भरवण्याचा विचारही कोणी केला नसता. ठाकुर यांनी त्यासाठी आपली सर्व यंत्रणा तर कामाला लावलीच, शिवाय पाचही दिवस ते आणि एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे हे स्वतः जातीने सर्व व्यवस्थांवर नजर ठेवून होते. परंतु पहिलेपण असल्याने ह्या ग्रंथोत्सवात त्रुटीही अनेक राहिल्या व त्याबाबत नाराजीचे सुरही उमटत राहिले. ह्या ग्रंथोत्सवात अपेक्षित पुस्तकविक्री होत नसल्याची प्रकाशकांची तक्रार दिसली. त्यात त्यांचीही चूक नव्हती, कारण मुळात ह्या महोत्सवासाठीच्या ग्रंथदालनांचे शुल्क अव्वाच्या सव्वा होते. एवढे शुल्क भरून निघण्यासाठी किती किमान पुस्तकविक्री झाली पाहिजे आणि गोव्यासारख्या ठिकाणी ती होऊ शकेल का ह्याचे गणित एनबीटीतील नोकरशहांनी विचारात घेतले नाही. पुण्यात अलीकडेच झालेल्या एनबीटीच्या ग्रंथोत्सवाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद लाभला होता, परंतु पुण्यातील सांस्कृतिक वातावरण वेगळे आणि गोव्यातील वेगळे. शिवाय पुण्यासारखी वाचनसंस्कृती मुळात गोव्यात रुजलेली नाही. त्यामुळे ह्या दालनांचे शुल्क कमी असणे आवश्यक होते. किमान गोव्यातील छोटे प्रकाशक व ग्रंथविक्रेते यांना सवलत अपेक्षित होती. महोत्सवाची दुसरी सर्वांत महत्त्वाची त्रुटी म्हणजे महोत्सवाच्या आयोजनात आणि कार्यक्रमांत स्थानिकांच्या पुरेशा सहभागाचा अभाव. मुख्य म्हणजे ह्या महोत्सवाच्या आयोजनासाठी एक सर्वसमावेशक आयोजन समिती असणे आवश्यक होते, परंतु तो मोजक्या लोकांच्या हाती ठेवण्याचा प्रारंभी प्रयत्न झाला. नंतर प्रा. भूषण भावे यांच्या प्रयत्नांमुळे गोव्यातील कोकणी, मराठी लेखक, संस्थाप्रमुख, शाळा, महाविद्यालये यांचा प्राध्यापकवर्ग वगैरेंना महोत्सवाशी जोडले गेले, त्यांचा जवळजवळ चारशे व्यक्तींचा समूह बनवला गेला. तरीही, महोत्सवाच्या आयोजनात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेतला गेलाच नाही. गोव्यातील कोकणी – मराठी लेखकांना महोत्सवात प्रत्यक्ष सामावून घेण्याचा प्रयत्नही एनबीटीने अगदी शेवटच्या क्षणी केला व हा सहभागही दुय्यम स्वरूपाचा व विनामानधन होता. मुख्य व्यासपीठांवरील सर्वच्या सर्व पाहुणे राष्ट्रीय स्तरावरचे होते हे ठीकच होते, परंतु त्यांच्या मुलाखती घेण्यास गोव्यात कोणीच लायक नव्हते असे मानणे योग्य नव्हते. एनबीटीचे संचालक स्वतःच मुलाखत घ्यायला बसेपर्यंत गोव्यात अशा संवादकांची कमतरता तर मुळीच नव्हती. तीच गोष्ट मुलांसाठीच्या कार्यक्रमांची. तेथील निवेदकांपासून सर्व उपक्रमांचे संयोजक गोव्याबाहेरचे होते. दुय्यम व्यासपीठावरील स्थानिक साहित्यिकांचे सत्कार सोहळे व कार्यक्रम ह्या त्रुटीवर थोडी फुंकर घालणारे ठरले, परंतु त्यातही अनेक मान्यवर लेखक, कवी बाजूला राहिले. योग्य पूर्वनियोजनाचा अभाव व एनबीटीची स्थानिक परिस्थितीबाबतची अनभिज्ञता हेच ह्यामागील कारण होते. ह्या व अशा अनेक त्रुटी जरी राहिल्या, पहिलीच वेळ असल्याने ह्या त्रुटींकडे सकारात्मकतेनेच पाहिले गेले पाहिजे. हा महोत्सव दरवर्षी गोव्यात झाला पाहिजे आणि पुन्हा हा महोत्सव गोव्यात भरवण्याचा विचार होईल तेव्हा ह्या चुका होणार नाहीत ह्याची खबरदारीही कटाक्षाने घेतली गेली पाहिजे. सर्व त्रुटी असूनही यंदाचा हा ग्रंथोत्सव वाचनप्रेमींचा उत्साह वाढवणारा होता. गोव्यातील शाळांनी आणि महाविद्यालयांनी फार मोठा सहभाग ह्या महोत्सवात घेतला. त्यासाठी शिक्षण खात्याने आणि उच्च शिक्षण विभागाने परिपत्रके काढली. त्यामुळे मुलांची संख्या मोठी होती. नव्या पिढीचा हा सहभाग, त्यांचा उत्साह डोळे दिपवणारा व आनंददायी होता. एक चांगली सुरूवात एनबीटीच्या ह्या राष्ट्रीय ग्रंथमहोत्सवातून यंदा झालेली आहे. हा निव्वळ वाचनोत्सव असल्याने राजकारण्यांची लुडबूड नव्हती. निखळ वाचनप्रेमींची पावले त्यामुळे ह्या महोत्सवाकडे वळत राहिली. शनिवारी व रविवारी तर महोत्सवाला जत्रेचे स्वरूप आले होते. हा महोत्सव गोव्यात दरवर्षी व्हावा अशी अपेक्षा उद्घाटन सत्रात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. परंतु ह्या महोत्सवाच्या निमित्ताने तरी गोव्यामध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याच्या प्रयत्नांचा शुभारंभ व्हावा. त्यासाठी सर्वांना सामावून घेऊन व्यापक प्रयत्न व्हावेत. ते घडू शकले तर ते ह्या महोत्सवाचे खरे फलित ठरेल.