गोव्यात मोसमी पावसाचे वेळेआधी आगमन

0
16

>> केरळमध्ये २७ मेपर्यंत मान्सून येण्याची शक्यता

>> देशात सरासरीच्या ९९ टक्के पावसाचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन पाच दिवस अगोदरच येत्या २७ मे २०२२ च्या आसपास होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे गोव्यात नैऋत्य मोसमी पावसाचे निर्धारित वेळेच्या अगोदर आगमन होण्याची शक्यता आहे.

नैऋत्य मान्सून १५ मेच्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या भागात पोहोचण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाज केरळमध्ये वेळेपूर्वी मान्सून सुरू होण्याचे आणि उत्तरेकडे सरकण्याचे संकेत देत आहेत, असे हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये साधारणपणे १ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होते. तर, गोव्यात ५ जूनला मान्सूनचे आगमन होते, असे मानले जाते. यावर्षी केरळमध्ये निर्धारित वेळेच्या ४-५ दिवस अगोदर मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून केरळमधील मान्सूनच्या आगमनाच्या तारखेची माहिती जाहीर केली जाते. केरळपासून पुढे सरकणार्‍या मान्सूनच्या वाटचालीच्या तारखेची माहिती जाहीर केली जात नाही.

गेल्या १०-११ वर्षांच्या मान्सूनच्या गोव्यात आगमनाची तारीख तपासली आणि तिची केरळमध्ये सुरुवातीच्या तारखेशी तुलना केली तर दोन्हींमध्ये थेट संबंध दिसून येत नाही. अशी काही वर्षे (२०१७ आणि २०१८) आहेत. जेव्हा मान्सून केरळमध्ये सामान्य तारखेपूर्वी सुरू झाला होता. परंतु गोव्यात सामान्य तारखेपेक्षा २-३ दिवस उशिरा दाखल आला. २०२१ मध्ये मान्सून सामान्य तारखेला आला. तरी केरळमध्ये सामान्य तारखेपेक्षा २ दिवस उशिरा त्याचे आगमन झाले. मागील दहा वर्षांतील मान्सूनच्या वाटचालीचा आढावा घेतल्यास केरळपासून गोव्यात मान्सून दाखल होण्यास १ दिवस ते १२ दिवसांचा कालावधी लागलेला आहे.

केरळमध्ये मान्सून हा साधारणपणे ३१ मे रोजी दाखल होतो. गेल्या वर्षी जूनमध्ये मान्सून दाखल झाला होता. आता या वर्षी आलेल्या चक्रीवादळाचा काही प्रमाणात मान्सूनवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल पाच दिवस आधी मान्सून केरळमध्ये धडकणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले.

तसेच पोषक वातावरण राहिल्यास त्या पुढच्या पाच ते सहा दिवसात मान्सून गोव्यात येऊन धडकणार आहे.
भारतात पाच दिवस मान्सून आधी धडकणार असल्यामुळे त्याचा फायदा हा देशातील शेतकरी तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे.

अंदमानातही मान्सून वेळेआधीच
दरवर्षी अंदमानमध्ये मान्सून २२ मेपर्यंत दाखल होत असतो. यंदा मात्र १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहोचणार असल्याचा अंदाज आहे.

९९ टक्के पाऊस
दरम्यान, यंदा देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होणार असल्यामुळे शेतकर्‍यांसाठी ही एक दिलासा देणारी बातमी आहे.