गोव्याच्या व्यावसायिकांनी ई-मार्केटप्लेसवर नोंदणी करावी

0
16

>> मुख्यमंत्र्यांचे आवाहन, राष्ट्रीय सहकार सप्ताहाची सांगता

राज्य सरकारकडून कौशल्य विकास आणि डिजिटलायझेश भर दिला जात आहे. गोव्यातील व्यावसायिकांनी सरकारच्या ई मार्केटप्लेस (जीईएम) वर नोंदणी करावी. या नोंदणीमुळे त्यांच्या उत्पादनाला देशभरात मार्केट उपलब्ध होऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात बोलताना येथे काल केले.

राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा या उपक्रमाला सहकार क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते. सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्ते, कर्मचार्‍यांनी नागरिकांना आर्थिक व्यवस्थापन, गुंतवणुकीबाबत योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना सहकार क्षेत्रात राबविल्या जाऊ शकतात. राज्य सरकारकडून कौशल्य विकासाच्या माध्यमातून वर्षभरात दहा ते बारा हजार जणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. गुंतवणूक, कर्जाच्या माध्यमातून होणार्‍या फसवणुकीच्या प्रकाराबाबत जनजागृतीची गरज आहे. नागरिकांकडून कुठल्याही क्षेत्रात गुंतवणूक करण्यापूर्वी आवश्यक चौकशी करण्याची गरज आहे. तथापि, नागरिकांकडून आमिषांना बळी पडून गुंतवणूक केली जाते. अखेर फसवणूक झाल्यानंतर पश्‍चात्ताप केला जातो, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या योजनेतून सहकार क्षेत्रातील संस्थांनी शेतीसाठी २ टक्के व्याजाने कर्ज घेऊन शेतकर्‍यांना ४ टक्के व्याज दरात उपलब्ध करावे, असे आवाहन सहकारमंत्री शिरोडकर यांनी केले. या कार्यक्रमाला गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, सहकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत नाईक व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात सहकार संघाच्या वार्षिक सहकार पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.