गोवा राज्य सहकार संघाच्या वार्षिक सहकार पुरस्कारांची घोषणा

0
6

>> उदय प्रभू सर्वोत्कृष्ट सहकार कार्यकर्ता; श्याम हरमलकर ठरले सर्वोत्कृष्ट अध्यक्ष

गोवा राज्य सहकार संघाच्या वार्षिक सहकार पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष रामचंद्र नाईक मुळे यांनी संस्थेच्या कार्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल केली. संघाचा सर्वोत्कृष्ट सहकार कार्यकर्ता पुरस्कारासाठी उदय बी. प्रभू (वास्को) यांची निवड करण्यात आली आहे.

सर्वोत्कृष्ट अध्यक्ष म्हणून श्याम हरमलकर (पंचशील अर्बन सोसायटी अस्नोडा), सर्वोत्कृष्ट सचिव म्हणून शंकर बोरकर (श्री गणानाथ सहकारी दुग्ध व्यवसाय संस्था निरंकाल), उत्कृष्ट संस्था पुरस्कारासाठी : विविध कार्यकारी गटात – श्री नवदुर्गा सोसायटी मडकई, दुग्ध सहकारी गटात – श्री नवदुर्गा दूध उत्पादक सहकारी संस्था पाणीवाडा बोरी, ग्राहक सहकारी गटात – गोवा शिपयार्ड कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था वास्को, पगारदार सहकारी गटात – डिचोली वीज कर्मचारी सहकारी क्रेडिट संस्था डिचोली, अर्बन सहकारी पतपुरवठा गटात – सुवर्णलक्ष्मी सहकारी पतपेढी संस्था मडगाव आणि इतर सहकारी संस्था गटात – गोवा कपिला मल्टीपर्पज सहकारी संस्था हरमल पेडणे या संस्थांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती रामचंद्र मुळे यांनी दिली.

राज्य सहकारी संघातर्फे येत्या 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सहकार सप्ताहाचे उद्घाटन दि. 14 रोजी सकाळी 10 वाजता शिरोडा येथे करण्यात येणार आहे. सहकार सप्ताहाचे कार्यक्रम सहकार खाते, नाबार्ड तसेच राष्ट्रीय सहकार संघाच्या सहकार्याने साजरे केले जाणार आहेत. सहकार सप्ताहानिमित्त म्हापसा, डिचोली, पेडणे, केपे, मडगाव येथे कार्यक्रम होणार आहेत. या सप्ताहाचा समारोप कार्यक्रम दि. 20 रोजी संध्याकाळी 3 वाजता शिरोडा येथे होणार आहे. या सप्ताहाच्या कार्यक्रमातून विकसित भारत बनवण्यात सहकारी संस्थांची भूमिका, सहकार क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, कौशल्य विकास, शाश्वत विकास ध्येय अशा विविध गोष्टींवर मार्गदर्शन केले जाणार आहे, असेही मुळे यांनी सांगितले.