गोवा आत्मा हरवतोय!

0
10
  • शरत्चंद्र देशप्रभू

गोव्यासारख्या चिमुकल्या प्रदेशात कुठलाही प्रकल्प आणताना त्याचा प्रत्यक्ष अन्‌‍ अप्रत्यक्ष तसेच मूलगामी अन्‌‍ दूरगामी परिणामांचा अभ्यास व्हायला हवा होता. सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, नैतिक, राजकीय दृष्टीने प्रकल्पपूर्व सर्वेक्षण अत्यंत जरूरीचे होते. मात्र तसे झाले नाही.

टोक-करंजाळे येथे वास्तव्य झाल्यावर पणजी शहरात आता जाणे-येणे कमीच झालेय. टोक ते पणजी अंतर कमी असूनसुद्धा पणजीचे दर्शन अप्राप्य होत असल्याची प्रचिती येत आहे. वयोमान, वाहतूक कोंडी, प्रदूषण अन्‌‍ अलीकडचे अनिर्बंध रस्ताखोदकाम यांमुळे आवश्यक काम असेल तरच पणजीत फेरफटका.
मागच्याच आठवड्यात पणजीला गेलो असता महानगरपालिकेची जुनी इमारत जमीनदोस्त झालेली दृष्टीस पडली. जागा अद्ययावत पत्र्यांनी आच्छादली होती. तसे पाहिले तर ही मोडकळीस आलेली इमारत म्हणजे नवे नगरपालिकेचे कार्यालय. पूर्वीची नगरपालिका चर्चच्या परिसरात उजव्या बाजूला असलेल्या रिकाम्या चौकात होती. भव्य जुन्या पद्धतीची इमारत अन्‌‍ मनोऱ्यावर तासानुसार ठोके देणारे भव्य घड्याळ. ही इमारत 1952 च्या दरम्यान कोसळली. दुपारच्या भोजनाची वेळ असल्यामुळे इमारतीत तसेच बाहेर पण वर्दळ कमी होती. सुदैवाने मनुष्यहानी झाली नसावी. परंतु या कोसळलेल्या इमारतीच्या मुख्य दरवाजाच्या मुख्य चौकटीमुळे एक कर्मचारी कै. रावबा सरदेसाईचा जीव बचावल्याची चर्चा होती. हे रावबा सरदेसाई म्हणजे अस्सल मत्स्यप्रेमी. मासळीच्या कंठनाळीचा गंध घेऊन ताजेपणा सिद्ध करण्याची सिद्धी या रावबहादुरांना लाभली होती. याचा वापर ते इतरांसाठी पण विनामूल्य करत असत. त्याकाळची ती रीतच होती.

नगरपालिका इमारत कोसळल्यानंतर कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरित झाले. हेच ते नवे ‘काम्र’ याचे छत काँक्रीटचे, त्यामुळे नगरपालिकेने होणारी गरमी टाळण्यासाठी अफलातून योजना आखली होती. कार्यालयीन वेळ दहा ते सायंकाळी साडेपाच अशी होती. ती बदलून नऊ ते दोन अशी केली. कार्यालयीन कर्मचाऱ्यांची दुबार कार्यप्रणालीपासून व तप्त छताच्या काहिलीपासून पण सुटका झाली! या नव्या इमारतीत माझ्या आजोबांनी तसेच वडिलांनी पण काम केले होते.

मुष्टिफंड शाळेतील वर्ग संपल्यावर कधी आम्ही चालत या इमारतीत येऊन वडिलांसमवेत दुपारी घरी परतत असू. येथे पेन्सिलचे टोक धारदार करण्यासाठी टेबलावर स्क्रूने जखडलेले एक छोटे यंत्र होते. पेन्सिलला पोर्तुगीज भाषेत ‘लापिझ’ म्हणत. आम्ही मुले पण हे यंत्र आपल्यापरीने हाताळत असू. त्याकाळच्या कर्मचाऱ्यांची नावे मला अजून आठवतात. कै. नाडकर्णी म्हणजे हिशेबनीस. हे नंतर ‘चीफ अकौंटंट’ या हुद्यावरून निवृत्त झाले. तसेच सापेको आठवतात. आसुसांव ब्रागांझा हे कर्मचारी वर्गात मोडत किंवा ‘मेयर’ होते आता आठवत नाही. अडानी नावाचे एक गोरेपान गुजराथी होते. ते आमच्याशी सलगीने वागत. एकूण नगरपालिकेचा कारभार संथ. नागरिकांची पण वर्दळ कमीच. त्याकाळचे नगरसेवक म्हणजे ‘व्हॉगाल’ नियुक्त किंवा निवडून आलेले असत. निवडणुका पण सांकेतिक. त्याला फक्त लोकशाहीचा मुलामा!

हिंदू फार्मसीच्या मागे असलेल्या ‘डांगी वॉच रिपेअर’चे आता उपहारगृहात रूपांतर झाले. पणजीत त्याकाळी घड्याळे दुरुस्ती करणारी आस्थापने इन मीन तीनच होती. एका जर्मन नागरिकाचे घड्याळ दुरुस्तीचे दुकान सुप्रसिद्ध वागळे कुटुंबीयांच्या कापडदुकानाजवळ होते. आगबोटीने जलसमाधी घेतल्यानंतर जे दोन जर्मन युवक बचावले त्यातलाच हा एक. घड्याळ दुरुस्तीत तरबेज. परंतु संवाद नाही. भाटेबंधू तसेच यांच्या शेजारचे घड्याळ दुरुस्तीचे दुकान म्हणजे पणजीकरांसाठी घड्याळ दुरुस्तीचा दिलासा. कोणतेही प्रशिक्षण नसता या तंत्रज्ञाने घड्याळ दुरुस्तीच्या कार्यात अतुलनीय प्रगती साधली होती. आजच्या हायफाय घड्याळांच्या दुनियेत पण ही आस्थापने आपली ओळख टिकवून आहेत.
श्री. वामन भाटे यांचे ‘वर्षा बुक स्टॉल’ म्हणजे पणजीतील एक सांस्कृतिक केंद्र. वामन भाटे यांच्या कुटुंबाचे अन्‌‍ आमचे तीन पिढ्यांचे संबंध. वामन यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हा धंदा उपजीविकेसाठी पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी स्थापन केला. मुक्तीनंतर तो ऊर्जितावस्थेला आला. परंतु धंदा उभारण्यासाठी काढलेल्या खस्तांचा मनोज्ञ इतिहास उलगडताना वामन कधी भावनावश होत नाहीत. वामन म्हणजे ऊर्जेचा अविरत, निरंतर झरा. गिऱ्हाइकांत गुंतूनही न गुंतलेला कर्मयोगी. वामन यांचा दृष्टिकोन साऱ्या गिऱ्हाइकांशी समान. हजार रुपयांच्या गिऱ्हाइकाला तसेच दहा रुपयांच्या जातिवंत रसिकाला तत्परतेने सेवा देणार. प्रत्येक वाचकाला वाटते की आपल्याला वामन यांच्याकडून विशेष वागणूक मिळते. वामन यांच्या देहबोलीमुळे गिऱ्हाइके या आस्थापनाकडे आकर्षित होतात. वृत्तपत्रे, मासिके घेतल्यावर गिऱ्हाईक रेंगाळणार. गप्पागोष्टीत रंगणार. पाच रुपयांची खरेदी करून अर्धा तास घालवणार. परंतु वामनरावांच्या चेहऱ्यावर नाराजीची छटा उमटणार नाही. आणि हे सारे ओढूनताणून आणलेले नाही… उपजतच वारसाहक्काने आलेले! मला वाटते कोकणीवादी अन्‌‍ मराठीवादी साहित्यिकांत सौहार्दाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यात ‘वर्षा बुकस्टॉल’चे भरीव योगदान आहे. वर्षानुवर्षे वामन असल्या वादाचा साक्षीदार राहिला. विद्वानांशी, सामान्यांशी, तिरसटांशी, अर्धवटांशी वामन यांचा संपर्क येतो; परंतु कुणाची प्रशंसा नाही की निंदा. वामनरावांचा कधी तोल तर ढळत नाहीच, परंतु अवघड प्रसंगात चेहऱ्यावर ताणही जाणवत नाही. संकटच निर्माण होऊ न दिले तर संकटमोचकाला भूमिकाच नसणार.

मी मजूर निरीक्षक असताना पणजीतील अन्‌‍ परिसरातील आस्थापनांना भेट देणे कायद्यांतर्गत जरूरीचे होते. टोक, करंजाळे, भाटले, मळा इतकेच काय पण कालापूर अन्‌‍ ताळगावमधील छोट्यामोठ्या आस्थापनांची गुमास्ता कायद्याअंतर्गत तपासणी करणे आवश्यक असे. माझा स्वभाव अंतर्मुख असून पण आस्थापनांच्या मालकांशी दृढ संबंध जुळून आले होते. अजून टिकून आहेत. पन्नास वर्षांचा काळ लोटल्यामुळे त्यावेळचे बरेच दुकानमालक काळाच्या पडद्याआड गेले; परंतु नवीन पिढी नव्या हुरूपाने, नव्या साजाने परंपरागत धंदा चालवताना दिसत आहेत. मात्र बऱ्याच आस्थापनांवर आज परप्रांतीयांचा कब्जा दिसून येत आहे. कोळसा व्यापारी खटखटे, विद्युत उपकरण विक्रेते धोंड, आद्य फार्मसीतले गुंतवणूकदार ‘हिंदू फार्मसी’चे वैद्य, ‘फार्मासिय अनंत’चे शंखवाळकर कुटुंबीय, ‘सालसेत फार्मसी’चे कारे समूह आपले अस्तित्व अजून टिकवून आहेत. परंतु बहुतेक जणांनी आपली आस्थापने परप्रांतीयांच्या स्वाधीन केल्याचे जाणवते. याला विविध कारणे असू शकतील. प्रमुख कारण म्हणजे वाढता भ्रष्टाचार. मूळ गोवेकर दुकानमालकांना मालाचा दर्जा सांभाळावा लागतो. गिऱ्हाइकांच्या जोडलेल्या विश्वासाशी प्रतारणा करणे त्यांच्या मनोभूमिकेत बसत नाही. नवीन आलेल्या दुकानदारांना सरकारी यंत्रणा अन्‌‍ गिऱ्हाईक यांना सांभाळण्याचे कसब साधले आहे. धंद्यात नैतिकता गौण ठरते. यामुळे गोवेकर उद्योजक, व्यापारी आपल्याच भूमीतून हद्दपार होताना दिसत आहे. जनमत कौलाने भौगोलिकदृष्ट्या गोव्याचे अस्तित्व राखले; परंतु गेल्या चाळीस वर्षांत आलेल्या अनिर्बंध प्रगतीमुळे गोव्याचा आत्माच हरवल्याचे जाणवते आहे. गोव्यासारख्या चिमुकल्या प्रदेशात कुठलाही प्रकल्प आणताना त्याचा प्रत्यक्ष अन्‌‍ अप्रत्यक्ष तसेच मूलगामी अन्‌‍ दूरगामी परिणामांचा अभ्यास व्हायला हवा. सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, नैतिक, राजकीय दृष्टीने प्रकल्पपूर्व सर्वेक्षण अत्यंत जरूरीचे. गोव्यासारख्या चिमुकल्या प्रदेशाला तर हे आवश्यकच. परंतु हे झाले नाही. यामुळे वाढता भ्रष्टाचार, बेरोजगारी, अनैतिक अन्‌‍ बेकायदेशीर व्यवहार, वाढते प्रदूषण अन्‌‍ वाढती महागाई यांना निमंत्रण मिळाले. मूळ गोवेकरांपेक्षा स्थलांतरितांची जास्त संख्या असलेले गोवा हे देशातले नव्हे तर जगातली एकमेव राज्य असावे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. वाढते मूत्रपिंडाचे आजार अन्‌‍ वाढत्या कॅन्सर रुग्णांची संख्या याचे मूळ प्रदूषित अन्नधान्यात, भाजीपाल्यात किंवा पाण्यात आहेत का याची स्वायत्त यंत्रणेद्वारे शहानिशा व्हायला हवी. वैद्यकीय सुविधांत सुधारणा होत आहेत, परंतु हे रोग न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहेत याबद्दल शंकाच नाही. कल्याणप्रक्रियेची दिशाच स्पष्ट नसल्यामुळे घटनाबाह्य शक्तींना बळ मिळते अन्‌‍ सुसंस्कृत अन्‌‍ कायद्याचा आदर करणाऱ्यांना पण नाईलाजाने अशा शक्तीना शरण जावे लागते.

आज सारेच अस्तित्वाच्या लढाईत संवेदनक्षमता, सामाजिक बांधिलकी हे गुणच हरवून बसले आहेत. गोव्यातील निसर्गाचा ऱ्हास होतो आहे, डोंगर पोखरले जात आहेत, नैसर्गिक झरे लुप्त होत आहेत किंवा बुजवले जात आहेत, मर्यादित जमीन मोठमोठ्या प्रकल्पांना वापरली जात आहे, वृक्षसंहार होत आहे, पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत, विहिरीचे तळ सुकत आहेत… या साऱ्या कोलाहलात ‘हे बंध रेशमा’चे या सुप्रसिद्धी संगीत नाटकात म्हटल्याप्रमाणे- लायक अन्‌‍ सुसंस्कृत लोकांचे जीवन नव्या संदर्भात अर्थहीन झाल्याचे दिसून येत आहे.