गोमंतकाचा दीपस्तंभ

0
7
  • ज. अ. रेडकर

गोवा, दमण व दीव या संघप्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचा आज पन्नासावा स्मृतिदिन. आपल्या राज्यातील प्रत्येक माणूस सुखी व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी अनेकविध योजना आखल्या आणि त्या मार्गी लावल्या. जीवनाचे असे कोणतेच क्षेत्र त्यांनी वंचित ठेवले नाही, ज्याची फळे आज गोमंतकीय चाखत आहेत. अशा या दीपस्तंभास त्यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

कोणत्याही बंदरातील दीपस्तंभ समुद्रातील जहाजांना रात्रीच्या वेळी मार्गदर्शन करीत असतो, अंधारातून वाट दाखवीत असतो. स्व. दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे गोमंतकासाठी दीपस्तंभासारखे आहेत. ‘अज्ञान आणि अविकास’ या दुहेरी अंधःकारातून त्यांनी इथल्या लोकांना दिशा दाखवली, प्रकाशाची वाट दाखवली. आजचा सुजलाम्‌‍ सुफलाम्‌‍ गोमंतक हे स्व. भाऊसाहेबांचे साकार झालेले स्वप्न आहे.

गोवा, दमण व दीव या संघप्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मृत्यूला आज 12 ऑगस्ट रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. स्व. भाऊसाहेबांनी सुमारे दहा वर्षे मुख्यमंत्री म्हणून या प्रदेशाचा राज्यकारभार सांभाळला. 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीज अमलातून मुक्त झालेला हा छोटासा प्रदेश! तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूनी ‘भारत देशाचा चिमुकला संघप्रदेश’ अशी याची प्रथम ओळख करून दिली. हा प्रदेश परकीय सत्तेपासून मुक्त व्हावा यासाठी भाऊसाहेबांनी अनेक स्वातंत्र्यसैनिकांना परोक्ष-अपरोक्ष आर्थिक मदत पोहोचवलेली होती. गोवा, दमण व दीव मुक्त झाला आणि पहिली विधानसभेची निवडणूक 1963 मध्ये झाली. त्यावेळी भाऊसाहेब निवडणुकीत उतरले नव्हते. परंतु त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्रवादी पक्षाला सर्वाधिक 14 जागा मिळाल्या, डॉ. ज्यॅक सिक्वेरा यांच्या युनायटेड गोवन्स पक्षाला 12 जागा मिळाल्या, तर दमण आणि दीव येथील प्रत्येकी एक जागा अपक्ष आणि काँग्रेस पक्षाला मिळाली. 30 जागांच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 16 जागांची गरज होती. दमण आणि दीव येथून निवडून आलेल्या उमेदवारांनी महाराष्ट्रवादी पक्षाला साथ दिली आणि सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

प्रजासमाजवादी पक्षाचे नेते बॅरिस्टर नाथ पै व एस. एम. जोशी यांनी गोवा विमोचनासाठी खूप प्रयत्न केले. विमोचनानंतर गोव्यात त्यांचे नित्य येणे-जाणेही होते. भाऊंबद्दल त्यांना आत्यंतिक प्रेम आणि जिव्हाळा होता. भाऊंचा गरिबांप्रती असलेला जिव्हाळा त्यांनी पाहिला होता. बहुजनांचे हित सांभाळणारा नेता म्हणजे भाऊसाहेब हे त्या दोघांच्या मनात पक्के बिंबले होते. म्हणूनच त्यांनी आग्रह धरला की, गोव्याच्या सरकारचे नेतृत्व भाऊंनी करावे. त्यासाठी मग मगो पक्षातर्फे मडकई मतदारसंघातून निवडून आलेले श्री. वसंत वेलिंगकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या त्या जागेवरून भाऊसाहेब निवडून आले आणि ते या संघप्रदेशाचे 20 डिसेंबर 1963 रोजी पहिले मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाले.

1987 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी दमण व दीव वगळून गोवा या छोट्या प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला आणि विधानसभेसाठी 40 जागा मंजूर केल्या ही अलीकडची घटना! पण तत्पूर्वी 1963 ते 1973 या दशकात स्व. भाऊसाहेबांनी विकासाची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षण, कृषी, उद्योग आणि आरोग्य यासंबंधीच्या योजना त्यांनी प्रामुख्याने हाती घेतल्या. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ गोव्यात त्यावेळी उपलब्ध नव्हते म्हणून त्यांनी शेजारच्या राज्यातील शिकलेल्या लोकांना संधी प्राप्त करून दिली. महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील विशेषतः कोंकण किनारपट्टीतील अनेक सुशिक्षित लोकांना सरकारी नोकऱ्या त्यावेळी इथे मिळाल्या. हे खरे तर भाऊंनी या कोंकणपट्टीतील सुशिक्षित लोकांवर केलेले हे अनंत उपकार आहेत.

भाऊसाहेबांनी खेड्यापाड्यातील मुले शिकावीत म्हणून वाड्यावाड्यांवर सरकारी मराठी प्राथमिक शाळा सुरू केल्या. प्रत्येक तालुक्यात मराठी माध्यमाचे किमान एक तरी सरकारी हायस्कूल सुरू केले. बहुजनांतील मुले डॉक्टर, इंजिनिअर व्हावीत असा त्यांचा ध्यास होता. यासाठी त्यांनी फर्मागुडी येथे सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले. केंद्र सरकार आणि मेडिकल कौन्सिलकडून गोव्यासारख्या छोट्या प्रदेशाला मेडिकल कॉलेज मंजूर होत नव्हते तर हट्टाला पेटून त्यांनी मेडिकल कॉलेज मिळवले. आज हजारो अभियंते आणि डॉक्टर या कॉलेजमधून शिकून जगाच्या पाठीवर नावलौकिक मिळवत आहेत. भाऊसाहेबांनी दूरदृष्टी ठेवली म्हणूनच बहुजन समाज सुशिक्षित झाला, कर्तृत्ववान झाला. याचे सारे श्रेय अर्थातच भाऊसाहेबांनाच जाते.

भाऊसाहेबांच्या दानशूरतेच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. गरिबांप्रती करुणा त्यांच्या हृदयात ओतप्रोत भरलेली होती. कोणत्याही दीनदुबळ्या माणसासाठी त्यांची ओंजळ नेहमीच पुढे राहिली. जात, धर्म, पंथ, उच्च, नीच असा कोणताच भेदभाव त्यांच्या मनात नसायचा. भाऊंनी केवळ गोव्यातीलच लोकांना किंवा संस्थांना मदत केली नाही तर महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांना त्यांनी देणगी दिल्या आहेत. तिथल्या लोकांनी त्यांच्या नावाने शिक्षणसंस्था उभारल्या आहेत. कित्येक क्रीडापटूंसाठी आर्थिक मदत करून त्यांना नावारूपास आणले आहे. परंतु याची कुठेही वाच्यता त्यांनी कधीच केली नाही. भाऊसाहेबांनी राजकारणापेक्षा समाजकारण अधिक जोपासले. राजकीय विरोधकदेखील त्यांच्या दिलदारपणाचे कौतुक करायचे.

भाऊसाहेब क्रिकेटवेडे होते. कुठल्याही गावात ते सरकारी दौऱ्यावर गेले आणि तिथल्या मैदानावर मुले क्रिकेट खेळताना दिसली की भाऊदेखील त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळायचे. ना मुख्यमंत्रिपदाचा टेंभा ना श्रीमंतीचा गर्व! गोव्यातील मुलांना क्रिकेट क्षेत्रात चमक दखवता यावी यासाठी त्यांनी क्रिकेट क्लब स्थापन केला. संगीत, नाट्य या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कला अकादमी सुरू केली. आपल्या राज्यातील प्रत्येक माणूस सुखी व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. यासाठीच त्यांनी अनेकविध योजना आखल्या आणि त्या मार्गी लावल्या. जीवनाचे असे कोणतेच क्षेत्र त्यांनी वंचित ठेवले नाही की ज्यामुळे गोमंतकीय मागे पडतील. सर्वंकष विकासाचे स्वप्न पाहाणारा महामेरू म्हणजे भाऊसाहेब! दीनदुबळ्यांचा आधार म्हणजे भाऊसाहेब! राज्याच्या विकासाचा दीपस्तंभ म्हणजे भाऊसाहेब! भाऊसाहेब म्हणजे गोव्यासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशाला पहाटेच्या वेळी पडलेले गोड स्वप्न होय! म्हणूनच भाऊसाहेब प्रत्येक गोमंतकीयाच्या हृदयात मानाचे स्थान ठेवून राहिले.

माझ्या पिढीने प्रत्यक्ष भाऊसाहेबांना पाहिले आहे. त्यांचे कार्य अनुभवले आहे. पुढच्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी गोवा सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्या नावाने गोवा विद्यापीठात अध्यासन सुरू करता येईल. तिथल्या ग्रंथालयाला स्व. भाऊसाहेब यांचे नाव देता येईल. गोवा मेडिकल कॉलेजच्या प्रथमदर्शनी भागात भाऊंचा अर्धपुतळा उभारता येईल, तिथल्या प्रयोगशाळेला भाऊंचे नाव देता येईल. भाऊंच्या जीवनावर एखादा लघुपट किंवा बायोपिक निर्माण करता येईल. या आणि अशा अनेक उपक्रमांतून भाऊंच्या कार्याची ओळख नित्य निरंतर नव्या पिढीला करून देता येईल. यासाठी सरकारची इच्छाशक्ती आणि सकारात्मकता आवश्यक आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भाऊसाहेबांची नोंद इतिहासात तर आहेच, पण हा इतिहास जिवंत राहणे आवश्यक आहे; अन्यथा दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर ही एक दंतकथा उरेल.