‘गैर’समज

0
317

 

  • दत्ताराम प्रभू-साळगावकर

शब्द मागे घेता येत नाहीत, ते बाणाप्रमाणे असतात व थेट भिडतात. आवाजाशी असो नाहीतर माणसांशी असो, तुलना ही झालीच झाली. शेवटी त्यानं तिची सर्वांसमक्ष माफी मागितली. वाद संपला पण गैर बोलण्याचं वैर मात्र उरलंच!

 

अगदी रोजच्या रोज कोणाच्या ना कोणाच्या कसल्यातरी गोष्टी आपल्या कानावर पडत असतात. सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला रस असतोच असं नाही. काही गोष्टी आपण ऐकतो आणि सोडून देतो, एका कानाने- दुसर्‍या कानातून अशाप्रकारे; ‘आपल्याला काय त्याचं?’ असं म्हणून. काही लोकांना मात्र प्रत्येक गोष्टीत नको तितका रस असतो; अर्थात हा त्या-त्या लोकांचा स्वभावगुण. ते इतके उतावीळ होतात की चारजणांना केव्हा सांगतो असे त्यांना होते. सांगतात ते सांगतातच पण रसभरीत करून; त्यात सहजपणा कमी व कुत्सितपणा अधिक. असल्या प्रकाराला ‘लावालावी’ म्हणायचं; कारण त्यात बर्‍यापेक्षा वाईट गोष्टीच असतात. असली ‘लावालावी’ चहाडीपेक्षाही पॉवरफुल असते. लावालावी करण्यातच त्याना समाधान लाभतं! ‘मला अगदी बसल्याजागी सर्व गोष्टी आपोआप कळतात’ अशा फुशारक्या ते लोक मारतात. बसल्याजागी दुसर्‍या कोणाच्या गोष्टी व त्याही आपोआप कळू शकतील का? निश्‍चितपणे नाहीच नाही! त्या कोणीतरी सांगाव्या लागतात. अलीकडच्या काळात मोबाईलवरून गोष्टी बसल्याजागी कळतात, नाही असं नाही, पण कोणीतरी त्या अपलोड कराव्या लागतात. बसल्याजागी आपोआप ‘विश्‍वरूपदर्शन’ देणारा जादुई गोलक किंवा लोलक अजूनतरी कोणी शोधून काढलेला नाही!

ज्या गोष्टी आपल्या कानावर येतात त्यातून आपण अर्थ काढतो, एकप्रकारचा ‘समज’ करून घेतो. काही गोष्टी अपुर्‍या ऐकू येतात व त्यातून वेगळा अर्थ निघतो किंवा काढला जातो. अशातून आपला जो समज होतो तो ‘गैरसमज’ असतो. गैरसमजाचे परिणाम भयंकर असतात. गैरसमजानं माणसं, मनं, नाती तुटतात. गैर बौलणं, गैर वागणं, गैर व्यवहार याच पंक्तीतला गैरसमज हा शब्द! गैरसमजातून संशयाचासुद्धा उगम होऊ शकतो; ‘संशय खट झोटींग महा’ असा हा संशय आपल्या मानेवर भुतासारखा बसतो.

काहीवेळा आपल्याला सांगायचं असतं एक व ते आपण सांगून सोडतो; ऐकणारे मात्र त्याचा अर्थ वेगळा लावतात. कदाचित असंही असू शकतं की आपल्या बोलण्याचे दोन अर्थ निघतात, आपला तसा हेतू नसला तरी. फारसा विचार न करता सहजपणे अशा केलेल्या काही शब्दप्रयोगाने अर्थाचा अनर्थ होतो. असे प्रकार घरात, ऑफिसात, समारंभातही घडतात. झालं ते असं…

एका ऑफिसात म्हणे दोन कर्मचार्‍यांमध्ये ‘संवाद’ झाला; एक पुरुष कर्मचारी, एक स्त्री कर्मचारी. संवादानंतर विवाद झाला. गोष्ट तशी मामुलीच, पण संवाद व विवाद मामुली उरला नाही, उणी-दुणी, धुणी-धुलाई इथपर्यंत गेला. रूपांतर वादात झालं. अशावेळी वाद पेटवणारे खूष होतात. तसंच झालं. बोलता बोलता तो कर्मचारी तिला म्हणाला, ‘‘बाजारात ओरडतात तशी काय ओरडतेस?’’

झालं! संवाद संपला. विवाद पण संपला. वादाचं प्रमाण आणखी वाढलं. हा-हा, ही-ही, हू-हू करणार्‍यांचं फावलं! प्रकरण तेवढं पुढं गेलं की त्यानं तिची सर्वांसमक्ष जाहीर माफी मागावी असा ठराव पास झाला. तो म्हणाला, ‘‘तिचा गैरसमज झाला; मी फक्त तिच्या आवाजाची तुलना केली, तिची बाजारातल्या माणसांशी नव्हे. जर तिला वाईट वाटलं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो.’’

तिचं म्हणणं असं की ‘‘गैरसमज झालेला नाही, अगदी स्पष्ट आहे की माझी तुलना त्यानं बाजारातल्या माणसांशीच केली. त्यामुळे सर्वांसमक्ष सपशेल माफीच मागायला हवी.’

जे बोललं गेलं, ते उरलं. शब्द मागे घेता येत नाहीत, ते बाणाप्रमाणे असतात व थेट भिडतात. आवाजाशी असो नाहीतर माणसांशी असो, तुलना ही झालीच झाली. शेवटी त्यानं तिची सर्वांसमक्ष माफी मागितली. वाद संपला पण गैर बोलण्याचं वैर मात्र उरलंच! गैरात तो हरला, ती जिंकली! बोलताना शब्द गैर वापरले की शेवट असाच!

बोलताना काही लोक पटकन काही बोलून जातात व फशी पडतात, तसलाच हा प्रकार. विचारपूर्वक बोलायचं असतं. चेष्टा-मस्करीसुद्धा काहीवेळा अंगाशी येते. शब्द केवळ वारा नसतात, त्यांना अर्थ असतो, तो कानातून मनात शिरतो. शब्द हावभावाप्रमाणे मुके नसतात, बोलके असतात!

 

माझ्या एका मित्रानं त्यानं ऐकलेली एका माणसाची गोष्ट सांगितली. मनुष्य तरुण पण ऐतखाऊ होता. वडिलोपार्जित शेती-बागायतीच्या कमाईवर जगत होता. लग्नाचं वय झालं, स्थळं येऊ लागली, पण मागण्या मोठ्या त्यामुळे जुळेना. झक्क कपडे करून, बुलेट घेऊन तो फिरायचा, लोकांवर छाप पाडण्यासाठी. निव्वळ गैरसमज! कोणीतरी त्याला सल्ला दिला की चार पैसे जोडण्याचा कसलातरी उद्योग-धंदा कर, नपेक्षा ब्रह्मचारीच राहशील! सुरुवातीला त्याला हे पटलं नाही, पण कालांतराने पटलं की काहीतरी करायला हवं! घर रस्त्यालगतच होतं, त्यामुळे धंद्यासाठी जागा शोधायची गरज नव्हती. त्यानं मोठा व आकर्षक असा रंगिबेरंगी साईनबोर्ड करून घेतला. मोठ्या इंग्रजी अक्षरात ‘बीबीसी’ असा. रात्रीच्या वेळी लाईट लावल्यावर अधिकच उठून दिसायचा. कसला व्यवसाय करतो म्हणून लोकांना मात्र कुतूहल. बोर्ड एवढा चांगला तर व्यवसायही तसाच असणार असा सगळ्यांचा समज. ‘बीबीसी’ हे शब्द तर सर्वांच्याच परिचयाचे. एक दिवस गाजावाजा करून उद्घाटन केलं. लोक बघतात तर काय? लहानसं गाडेवजा दुकान बिडा, बिडी, सिगारेटचं! बीबीसी म्हणजे चक्क बिडा, बिडी, सिगारेट! त्याच शब्दांची आध्याक्षरं! लोकांचा जो समज होता तो ‘गैर‘ ठरला!

म्हणूनच शब्दसुद्धा काहीवेळा फसवे असतात व गैरसमज व्हायला कारण ठरतात ते असे!

 

—————–