गिरीतील भीषण अपघातात कारचालकाचा मृत्यू

0
7

म्हापसा-पर्वरी मार्गावर गिरी येथे कारवरील ताबा सुटल्याने काल झालेल्या भीषण अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला. चौपदरी रस्त्याच्या मधोमध असलेल्या माडांपैकी एका माडाला कारची जोरदार धडक बसली. त्यात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 3 वाजता मोईकावाडा-पिळर्ण येथील जुआव पॅट्रिसिओ डिसोझा (78) हे आपल्या कार (क्र. जीए-01-आर-8563) ने पणजीहून म्हापशाकडे जात असताना त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजक तोडून रस्त्याच्या मधोमध असलेल्या एका माडावर आदळली. अपघात एवढा भीषण होता की या अपघातात कारचा चक्काचूर झाला. माडाला जोरदार धडक बसल्याने कारच्या पुढील भाग पूर्णपणे चेपून गेला. तसेच धडकेबरोबर माड देखील कोसळला. या अपघातात चालक जुआव पॅट्रिसिओ डिसोझा यांचा मृत्यू झाला. पर्वरी पोलीस स्थानकाचे हवालदार प्रीतम दाभोळकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.