>> गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचा दावा; 500 लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज
इस्रायलने गाझातील अल अहली अरबी या रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यामध्ये 500 जण ठार झाल्याचा दावा गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. युद्धाच्या भीतीने हजारो नागरिकांनी ठिकठिकाणी शिबिरांमध्ये आश्रय घेतला असून, या रुग्णालयातही शेकडो नागरिक आसऱ्याला होते; मात्र इस्रायलने मंगळवारी रात्री रुग्णालयावरच हवाई हल्ले केले. त्यात 500 नागरिक ठार झाले असून, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत गेल्या 12 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र डागून या युद्धाला सुरुवात केली. त्यापाठोपाठ इस्रायलनेही गाझा पट्टीवर क्षेपणास्रे डागली. या युद्धात आतापर्यंत पाच हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे.
हमासने युद्ध पुकारल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीतील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर, इस्रायलने गाझा पट्टीतल्या मानवतावादी सुविधा खंडित केल्या आहेत. गाझा पट्टीत, गेल्या काही दिवसांपासून वीज नाही, पाणी नाही. अत्यंत बिकट परिस्थितीमुळे तिथले नागरिक जीव मुठीत धरून मिळेल त्या ठिकाणी स्थायिक होत आहेत.
अनेक रुग्णालयातील औषधसाठा संपत आल्याने रुग्णांचा जीवही धोक्यात आला आहे. अशातच, गाझातील अल अहली अरबी रुग्णालयात भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात जवळपास 500 जणांचा मृत्यू झाला. या स्फोटामुळे रुग्णालय इमातीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णालय परिसरातील मैदानात मृतदेहांचा खच पडला असून, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
इस्रायलकडून इस्पितळावर हल्ला नाही : बायडन
इस्रायल-हमास युद्धाच्या 12व्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्रायलला पोहोचले. युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली. मला स्वतः येथे येऊन दाखवायचे होते की आम्ही इस्रायलसोबत आहोत. हमासने इस्रायलच्या लोकांची निर्घृण हत्या केली आहे. ते इसिसपेक्षाही वाईट आहेत. इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी अमेरिका त्यांना सर्वतोपरी साथ देईल, असे बायडन म्हणाले. तसेच गाझातील इस्पितळावरील हल्ला हा इस्रायलने केलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.