गरिबांप्रतीच्या कळवळ्यातून साकारले श्रमधाम

0
6

>> सभापती रमेश तवडकर यांनी दिला गरिबांना आधार

आपण राजकारणात असलो तरी समाजाप्रती देणे लागतो या भावनेतून आणि आपल्या मतदारसंघातील गोरगरिबांच्या उत्कर्षाच्या कळकळीतूनच आणि कळवळ्यातूनच आपण ‘श्रमधाम’ सारख्या योजनेला मूर्तरूप देऊ शकलो, असे उद्गार गोवा विधानसभेचे सभापती श्री. रमेश तवडकर यांनी ‘नवप्रभा’ पाशी काढले. नवप्रभा कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी श्री. तवडकर यांनी आपल्या मतदारसंघात राबवलेल्या आपल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

स्वतःचे पक्के घर नसलेल्या गोरगरीब नागरिकांना सामाजिक योगदानातून श्रमदानाद्वारे पक्के घर बांधून देणारी ‘श्रमधाम’ ही योजना श्री. तवडकर यांनी राबवली आहे. या योजनेची कल्पना आपल्याला कशी सुचली हे सांगताना श्री. तवडकर म्हणाले की एक दिवस बड्डे या आपल्या मतदारसंघातील गावी गेलो असता एका गरीब माणसाचे एक मोडकळीस आलेले घर पाहिले. घर कसले, केवळ ताडपत्री लावून नुसता आडोसा तयार करून ते कुटुंब त्यात राहत होते. आपण स्वतः अत्यंत गरिबीतून वर आलेलो असल्याने आपल्या ह्रदयात त्यामुळे कालवाकालव झाली व त्यातून पहिले ‘श्रमधाम’ उभे राहिले. त्यानंतर अशा कित्येक गरजू लोकांना आपण अशा प्रकारे समाजाच्या सहकार्याने घरे बांधून दिली व ‘श्रमधाम’ ला योजनेचे स्वरूप आले असे श्री. तवडकर यांनी सांगितले. घर बांधणे हे आजच्या काळात अत्यंत खर्चिक काम असल्याने हे काम एकट्याने तडीला नेणे शक्य नव्हते. त्यामुळे घर बांधून देण्यासाठी श्रमदान करण्याची तयारी असलेल्या लोकांना आपण एकत्र केले. आपल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन श्रमदानासाठी पुष्कळ लोक पुढे आले, परंतु केवळ श्रमदानाने घरे उभी राहिली नसती. त्यासाठी जमीन, पैसा, साहित्य यांची जरूरी होती. आपण काही भाटकारांना भेटलो. त्यांच्या जागेत पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या कुटुंबांना पक्क्या घरासाठी शंभर मीटर जागा दान करण्याची त्यांना विनंती केली व त्या जमीनदारांनीही स्वेच्छेने ही जागा दान केली. त्यामुळे ही घरे उभी राहू शकली, असे तवडकर यांनी सांगितले. काणकोण हा पर्यटनाभिमुख तालुका असल्याने पर्यटनक्षेत्रातील उद्योजकांनी या योजनेत उत्स्फूर्त सहभाग घेतला व बांधकामासाठी लागणारे चिरे, सिमेंट, वाळू आदी साहित्य आणून दिले. कोणी आर्थिक साह्यही केले. बघता बघता श्रमधाम योजनेला मूर्तरूप आले, असे तवडकर यांनी सांगितले. श्रमदान करण्यासाठी पुढे आलेल्या व या योजनेस पाठबळ देणाऱ्या लोकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. श्रमधाम योजनेतून अनेक घरे साकारली असून त्यातून होणारा आनंद अद्वितीय स्वरूपाचा असल्याचे उद्गार यावेळी सभापती श्री. तवडकर यांनी काढले.

माझ्यासारख्या गरिबीतून वर आलेल्या राजकारण्याला जर गरिबांची व्यथा कळणार नसेल वा गरीबांच्या समस्या कळणार नसतील तर त्या कोणाला कळू शकतील असे उद्गारही तवडकर यांनी यावेळी काढले. या योजनेची माहिती देणारे ‘श्रमधाम ः सामूहिक संवेदनशीलतेचा साक्षात्कार’ हे पुस्तकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. बलराम निवासी शाळा व गावडोंगरी लोकोत्सवानंतर श्री. तवडकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या श्रमधाम योजनेचे सर्वत्र कौतुक होत असून अंत्योदय तत्त्वावरून निरपेक्ष भावनेने केलेले सामाजिक कार्य म्हणून त्याकडे पाहावे लागेल.