गणेशोत्सव काळात कोविड एसओपीचे पालन करा

0
20

>> डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांचे पत्रकार परिषदेत आवाहन

>> ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. आगामी गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना महामारी नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्य एपिडोमियोजिस्ट डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी आरोग्य संचालनालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल केले. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य खात्याचे राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर उपस्थित होते.

राज्यात ऑगस्ट महिन्यात कोरोना बाधिताची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दरदिवशी साधारण १०० च्या आसपास बाधित आढळून येत होते. आता, मागील दोन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या आसपास पोहोचली आहे. राज्यातील कोरोना महामारीची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आलेली नाही. नवीन बाधित आढळून येत आहेत. परंतु इस्पितळात दाखल होणार्‍या बाधितांची संख्या कमी आहे. अधूनमधून कोरोना बळींची नोंद होत आहे, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

राज्यात मडगाव, पणजी, म्हापसा, पर्वरी, चिंबल, कासावली आदी भागात जास्त बाधित आढळून येत आहेत. आगामी गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर केला पाहिजे. कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे. राज्यात १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस मोफत दिला जात आहे. तथापि, बूस्टर डोस घेणार्‍या नागरिकांची संख्या कमीच आहे.

बळी पडलेल्यांत ५६ टक्के कोविड लस न घेतलेले
राज्यात आत्तापर्यत ३९५७ कोरोना बळींची नोंद झालेली आहे. त्यातील ५६ टक्के कोरोना बाधितांना कोविड लसीचा डोस घेतलेला नाही, अशी माहिती आरोग्य खात्याचे राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली.

राज्यात कोरोना महामारीची तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत काही सांगू शकत नाही. बाधितांची संख्या अध्याप शून्यावर आलेली नाही. मात्र आता पुन्हा एका नवीन बाधितांची संख्या वाढत चालली आहे. नागरिकांनी लसीकरणावर भर दिला पाहिजे. राज्य सरकारकडून प्राथमिक, सामाजिक आरोग्य केंद्रातून कोविड लस मोफत दिली जात आहे. रविवार, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीसुद्धा लस दिली जात आहे. नागरिकांनी बुस्टर डोस घेणे महत्त्वाचे आहे.

बुस्टर डोसला अल्प प्रतिसाद ः डॉ. बोरकर
राज्यात सरकारकडून बुस्टर डोस मोफत दिला जात आहे. १५ ते १७ वयोगटातील ९४ टक्के मुलांनी लशीचा पहिला डोस आणि ८२ टक्के मुलांनी लशीचा दुसरा डोस घेतला आहे. ६० वर्षांवरील अनेक लाभार्थी नागरिकांनी बुस्टर डोस घेतलेला नाही. १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांकडून बुस्टर डोसला चांगला प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अपप्रचाराला बळी न पडता कोविड लस टोचून घ्यावी, असे आवाहन डॉ. बोरकर यांनी केले.

राज्यात चोवीस तासांत
१८० नवे कोरोना रुग्ण

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. चोवीस तासांत आणखी एका बाधिताचा बळी गेला असून नवीन १८० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, ९ बाधितांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण १४.०९ टक्के एवढे आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ९४१ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३९५७ एवढी आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन १२७७ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. चोवीस तासांत ९ बाधितांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत आणखी ११५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८ टक्के एवढे आहे.