गणेशचतुर्थी ः समज-गैरसमज

0
147
  • चिंतामणी रा. केळकर

वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे कळत नाही. मात्र तिथ्यादी समाप्तीसंदर्भात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘इस्रो’ने मांडलेले गणित ज्या पंचांगात आहे, ते दाते पंचांग गोवा-महाराष्ट्रात वापरले जाते. त्यामुळे त्यानुसार दिलेली मंगळवार दि. 19 रोजीची गणेशचतुर्थी बरोबर आहे.

‘गणेशचतुर्थी सोमवार दि. 18 सप्टेंबर की मंगळवार दि. 19 सप्टेंबर’ हा विषय सोशल मीडियाच्या उद्रेकामुळे पिंगा घालू लागला आहे. वास्तविक असा संभ्रम निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे पंचांग गणितातील वेगवेगळ्या पद्धती. अनेक वर्षांपूर्वी पंडित नेहरू यांनी 22 मार्च 1957 रोजी एक समिती स्थापन केली. त्यावेळी सौरदिनांकाची भारत देशासाठी दिनदर्शिका (कॅलेंडर) तयार करण्यात आली. मात्र याचा प्रचार आणि प्रसार फारसा न झाल्यामुळे ते फक्त आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्या सुस्वागतम्‌‍ वेळी सुरू राहिले आहे. राजपत्रात नमूद असलेली अशी तारीख जर बँकेच्या चेकवरती लिहिली तर ती आज त्यांना समजेल की नाही हा प्रश्नच आहे.

महाराष्ट्रात टिळक पंचांग आणि निरयन वेगळे पंचांग वापरले जात असत. पंचांग हे आकाशाचा आरसा असले पाहिजे. त्याला ‘दृक्‌‍ पंचांग’ अशी संज्ञा टिळकांनी दिली होती. मात्र टिळक पंचांग आणि बाकीच्या पंचांगांमध्ये साधारण तीन अयनांशाचा फरक होता. त्यामुळे अधिक महिन्यांचा फरक तसेच काही ग्रहांच्या राशिप्रवेशाच्या तारखा बदलत असत. मात्र पुढे परत भारत सरकारने नवीन आयोग स्थापन करून चित्रापक्षीय अयनांशप्रमाणे असणारे गणित मान्य केले आणि त्याची राजपत्रात (गॅझेट) नोंद झाली. त्यावेळीसुद्धा सोलापूरचे पंचांगकर्ते दाते हे या कमिटीवर होते.

अयनांश भेद
अयनांश म्हणजे काय याचे विस्तृत विवरण करणे या ठिकाणी शक्य नाही. मात्र गणिताची सुरुवात कुठून करावी, कुठून मानावे हा जो विचार, त्याला ‘अयनांश’ म्हणतात एवढे समजले तरी पुरेसे आहे. टिळक आणि इतरांमध्ये हा फरक साधारण तीन अंश होता.
कालांतराने टिळक पंचांग मागे पडले आणि त्याचा वापरही कमी झाला. अधिक महिना असल्यानंतर टिळक पंचांगाच्या गणिताप्रमाणे त्यांचा गणपती एक महिना अगोदर येतो. त्यानुसार सध्या फक्त औपचारिक म्हणून त्यांच्या पंचांगानुसार एक महिना अगोदर गणपती पुजला जातो आणि नंतर महिनाभर पूजा करून, इतर सार्वजनिक गणेशोत्सवात त्याचा सहभाग होऊन सार्वजनिकरीत्या विसर्जन केले जाते. (यावर्षी टिळक पंचांगानुसार त्यांचे गणपती येऊन बसलेसुद्धा आहेत.)
दाते पंचांगाची विश्वासार्हता
महाराष्ट्र आणि गोवा तसेच गुजरात, कर्नाटक या ठिकाणीही दाते पंचांग किंवा त्यानुसार केलेले जे गणित आहे, तेच मानले जाते. सध्याच्या सरकारी सार्वजनिक सुट्ट्या दिल्या जातात, त्याअगोदर त्या प्रसिद्ध करण्यापूर्वी सोलापूरच्या श्री. दाते यांचे मार्गदर्शन घेतले जाते.

दाते पंचांगाचा शतकमहोत्सवी कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे साजरा झाला त्या ठिकाणी मी उपस्थित होतो. या कार्यक्रमाला ‘इस्रो’ या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रातील श्री. नितीन घाटपांडे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मंगळयानाची प्रतिकृती सोबत आणली होती. ते सौर पॅनलचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या भाषणात त्यांनी दाते पंचांग हे अतिसूक्ष्म असून त्यातील गणित अचूक असल्याचा उल्लेख केला आणि याची प्रचिती ‘इस्रो’ने घेतली आहे असे आवर्जून नमूद केले. ‘इस्रो’सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन केंद्राने दाते पंचांगाची जी प्रशंसा केली, यापेक्षा आणखी कोणते मोठे सर्टिफिकेट असू शकते?
गणेशचतुर्थीचा घोळ
ज्या सौर पंचांगाचा उल्लेख करून सोमवार दि. 18 रोजी गणेशचतुर्थी सांगितली जाते, त्यांच्या गणितानुसार तिथी समाप्तीची वेळच वेगळी आहे. त्यांच्या गणितानुसार तृतीया समाप्ती ही सोमवारी सकाळी 10.53 वाजता असल्यामुळे माध्यन्हव्यापिनी चतुर्थी 18 रोजी येणारच.
वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार, त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे कळत नाही. असो. मात्र तिथ्यादी समाप्तीसंदर्भात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘इस्रो’ने मांडलेले गणित ज्या पंचांगात आहे, ते दाते पंचांग गोवा-महाराष्ट्रात वापरले जाते. त्यामुळे त्यानुसार दिलेली मंगळवार दि. 19 रोजीची गणेशचतुर्थी बरोबर आहे. ही चतुर्थी मध्यान्हव्यापिनी आहे, शिवाय त्या दिवशी अंगारक योग होतो हे आणखी विशेष महत्त्वाचे आहे. यामुळे मंगळवार दि. 19 सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी साजरी करावी.

आमचे धर्माचार्य
सर्वत्र एकवाक्यता येण्याच्या दृष्टीने काही नियम आमच्या धर्मपीठाकडून होणे आवश्यक आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. परंतु त्यादृष्टीने फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
इतर धर्मीयांमध्ये प्रामुख्याने ख्रिश्चन, मुसलमान यांचे धर्मगुरू अशा विषयात हिरिरीने भाग घेतात आणि त्यांचे म्हणणे सर्वजण ऐकतात. शिवाय राजदरबारीसुद्धा त्यांच्या धर्मगुरूंनी दिलेल्या गोष्टींची आवर्जून नोंद होते. आपल्या धर्मपीठालासुद्धा तेवढेच महत्त्व आहे आणि त्यांनी दिलेला निर्णय (रायस) हा राजमान्य होतो. परंतु त्यादृष्टीने त्यांच्याकडून एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने काही ठोस पावले उचलली जात नाहीत. (माफ करा, पण हे दुर्दैवच म्हणावे लागेल!)

उत्तर भारतामध्ये असलेले पौर्णिमांत मासारंभ आणि इकडे असलेले अमावस्यांत मासारंभ- यामध्येसुद्धा एकवाक्यता असली तर फार चांगले होईल. शिवाय शास्त्रशुद्ध पद्धतीने जर एखादा सण असेल तर तो औपचारिक पद्धतीने घरात करण्यास काही हरकत नाही. करावाच. मात्र जर एखादा सण सार्वजनिक स्वरूपाचा असेल आणि त्यावेळी अशा पद्धतीने काही घोळ होत असेल तर मात्र एकवाक्यता येण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
एखादे व्रत, पूजा ही दिलेल्या नक्षत्र तिथीवरच होणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर ती पूजा फलप्रद होत नाही, अशाप्रकारचे वक्तव्य व्हिडिओद्वारे प्रसृत झालेले आहे. गणेशचतुर्थी 18 की 19 तारीखला हा घोळ आहेच; पण मग ज्या टिळक पंचांगाद्वारे एक महिना अगोदर गणपती पुजला, ही गोष्ट पाहता बिनचूक तिथी कोणती घ्यावी?
एका नव्या संकटाचे सावट
हल्लीच साजऱ्या झालेल्या रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा असल्यामुळे अमुक वेळीच, म्हणजे जवळजवळ रात्रीच रक्षाबंधन करावे अशा आशयाचे मेसेज फिरत राहिले आणि त्यामुळे बऱ्याच जणांचे गैरसमज मात्र होऊन गेले.
चालू वर्षीच्या गणेशचतुर्थीलासुद्धा भद्रा या दुपारी 13.44 पर्यंत आहेत. (शुक्ल चतुर्थीचा उत्तरार्ध तसेच पौर्णिमेचा पूर्वार्ध यावेळी दर महिन्यालाच भद्रा असतात.) यावेळेनंतर जर पूजा करायची तर कसे होणार? शिवाय या दिवशी वैधृती हा योग संपूर्ण दिवस असल्यामुळे (तो तर कुयोगच आहे) गणपती पुजायचा की नाही?
भाद्रपद शुक्ल चतुर्थी असली की गणपती पुजायचा, त्या दिवशी गणेशचतुर्थी असते, एवढे आपण निश्चित करून पूजा करावी. माझ्या मते तुमच्या घरी ज्यावेळी पुरोहित येईल त्यावेळी पूजा करून घ्या.

गावामध्ये पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणावर सर्वांच्या घरी पूजा होण्याचे फार मोठे दडपण असते. स्वतःच्या घरची पूजा भल्या पहाटे उठून करतात आणि नंतर ही पुरोहित मंडळी दुसऱ्यांच्या घरच्या पूजा करण्यासाठी रवाना होतात, हे तुम्ही अनुभवले असेलच. तुम्ही मुहूर्ताचे बंधन घातल्यानंतर ठराविक वेळात सर्वांच्याच घरी पुरोहित येणे कसे शक्य होईल? ब्राह्मण दरवाजात पोहोचल्यानंतर गंध उगाळायला जाणारी माणसे मी पाहिलेली आहेत, अनुभवली आहेत.

तुम्ही स्वतःच्या स्वतः जशी शक्य असेल तशी पूजा करणे विशेष चांगले. आज-काल तशा पद्धतीचे व्हिडिओ, पुस्तके सर्वत्र उपलब्ध आहेत. अशावेळी तुम्ही, दिलेल्या मुहूर्तावर पूजा करू शकता.
विनाकारण वाद होतील किंवा कोणावर दडपण येईल अशा पद्धतीचे वक्तव्य आणि वर्तणूक कटाक्षाने टाळा. गणपती हा विघ्नकर्ता नसून विघ्नहर्ता आहे. आम्हा सर्वांना सुबुद्धी देवो, हीच प्रार्थना!