गंभीरच्या कसोटी संघाचा कुंबळे कप्तान

0
132

टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने भारताच्या सर्वोत्तम कसोटी संघाची काल रविवारी निवड केली. गंभीरने संघाचे नेतृत्व करण्यासाठी लेगस्पिनर अनिल कुंबळेची निवड करताना त्याच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा केली.

कुंबळेने अधिक काळ टीम इंडियाचे नेतृत्व केले असते तर टीम इंडिया अधिक उंचीवर असती, असे मत त्याने यावेळी व्यक्त केले. लिट्ल मास्टर सुनील गावसकर व वीरेंद्र सेहवाग यांना गंभीरने सलामीवीर म्हणून निवडले आहे. कसोटीत गावसकर यांनी १०,१२२ व वीरूने ८५८६ धावा केल्या आहेत. ‘द वॉल’ राहुल द्रविड व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना तिसरे व चौथे स्थान मिळाले आहे. द्रविडने १६४ कसोटींत ५२.३१च्या सरासरीने १३२८८ तर सचिनने २०० कसोटींत १५९२१ धावा केल्या आहेत. विद्यमान कर्णधार विराट कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान या संघात प्राप्त केले आहे.

१९८३ साली भारताला विश्‍वचषक जिंकून देणारा कर्णधार कपिलदेव निखंज संघातील एकमेव अष्टपैलू आहे. अनिल कुंबळे, हरभजन सिंग, झहीर खान व जवागल श्रीनाथ हे संघातील इतर खेळाडू आहेत. कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात कुंबळेकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. कुंबळेच्या नेतृत्वाखाली भारताने १४ कसोटींत ३ विजय व ५ पराभव अशी कामगिरी केली आहे.