ख्यातनाम शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन

0
31

ख्यातनाम शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर (82) यांचे काल निधन झाले. त्या ग्वाल्हेर घराण्यातील शास्त्रीय गायिका होत्या. मालिनी राजूरकर यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
राजस्थानमध्ये बालपण गेलेल्या मालिनी यांचा जन्म 8 जानेवारी 1941 रोजी झाला. अजमेरच्या सावित्री गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेत त्यांनी तिथेच त्यांनी गणित विषयात पदवी घेतली. अजमेर संगीत महाविद्यालयातून गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर वसंतराव राजूरकर यांच्यासोबत मालिनी यांनी विवाह केला.

अनेक महोत्सवात कला सादरीकरण
मालिनी यांनी अनेक संगीत महोत्सवात आपली गायन कला पेश केली आहे. त्यामधील महत्त्वाची म्हणजे गुणीदास संमेलन (मुंबई), तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सवाई गंधर्व महोत्सव (पुणे) या महोत्सवांचा समावेश आहे.

टप्पा, तराण्यावर प्रभुत्व
मालिनी राजूरकर ह्या शास्त्रीय गायिका होत्या. त्यांचे टप्पा आणि तराणा या गानप्रकारांवर विशेष प्रभुत्व होते. त्यांच्या गायकीवर संगीततज्ज्ञ के. जी. गिंडे, जितेंद्र अभिषेकी तसेच कुमार गंधर्व यांचा प्रभाव दिसून येत होता. अमेरिका तसेच इंग्लंडमध्ये संगीत दौरे केले होते.

अनेक पुरस्कार
मालिनी राजूरकर यांना अनेक पुरस्कार लाभले असून 2001 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2008 मध्ये त्यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.