Home बातम्या खासगी विधेयकांचा मुद्‌‍दा तापला

खासगी विधेयकांचा मुद्‌‍दा तापला

0

हातात फलक, घोषणाबाजी; विरोधकांनी सभागृहात मांडले ठाण

राज्यातील कृषी जमीन, खाजन शेती, जलसंवर्धन तसेच राज्याशी संबंधित अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर विरोधी आमदारांनी मांडलेल्या 21 खासगी विधेयकांपैकी एकही विधेयक सरकारने चर्चेसाठी सभागृहात न घेतल्याच्या मुद्द्यावरून काल गोवा विधानसभेत जोरदार गोंधळ उडाला. प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी आमदारांनी सभापतींच्या आसनासमोरील हौद्यात धाव घेत घोषणाबाजी केल्याने सकाळच्या सत्रात कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. आमच्या खासगी विधेयकांचे काय झाले, याचे उत्तर सभापती गणेश गांवकर यांनी द्यावे, अशी मागणी करत विरोधी आमदारांनी सभागृहात गदारोळ घातला.

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार वीरेश बोरकर, विजय सरदेसाई, ॲड. कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा, व्हेंझी व्हिएगश आणि क्रूझ सिल्वा यांनी हातात फलक घेत ‘आमची बिले आम्हाला हवीत’ अशा घोषणा दिल्या. सभापतींनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘हुकूमशाही बंद करा’, ‘दादागिरी बंद करा’ अशा घोषणांमुळे सभागृहातील वातावरण अधिकच तापले. काही विरोधी आमदारांनी सभापतींच्या आसनाकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला असता सभागृहातील मार्शल्सनी त्यांना अडवले. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने सभापतींनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. मात्र विरोधी आमदारांनी सभागृहाबाहेर न जाता सभागृहातच जमिनीवर बसणे पसंत केले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न होताच विरोधकांनी पुन्हा गोंधळ घालत ‘आमच्या खासगी विधेयकांचे काय झाले ते सांगा; अन्यथा कामकाज सुरू करू देणार नाही,’ अशी भूमिका घेतली. ‘करो या मरो’ अशा घोषणा देत त्यांनी पुन्हा सभापतींच्या आसनासमोरील हौद्यात धाव घेतली.

यावेळी बोलताना वीरेश बोरकर यांनी ‘गोवा प्रोटेक्शन फॉर ॲग्रीकल्चर बिल’ कामकाजात का घेतले गेले नाही, असा सवाल केला. तसेच भू-रूपांतरणासाठी असलेले ‘39-ए’ रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.
उत्तर देताना सभापती गणेश गावकर यांनी संबंधित खासगी विधेयके संबंधित खात्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान, विजय सरदेसाई यांनी या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. गेल्या चार वर्षांत सरकारने एकही खासगी विधेयक घेतले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
व्हेंझी व्हिएगश यांनीही आमच्या 21 खासगी विधेयकांपैकी एकही विधेयक चर्चेसाठी सभागृहात न घेतल्याचा आरोप केला. गोंधळ सुरूच राहिल्याने सभापतींनी अर्ध्या तासासाठी दुसऱ्यांदा कामकाज तहकूब केले. या वेळी विरोधी आमदारांनी हातातील फलक खाली ठेवून सभागृहातच जमिनीवर बसून आंदोलन केले. अर्ध्या तासानंतरही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. विरोधकांनी पुन्हा एकदा हौद्यात धाव घेत गोंधळ घातल्याने सभापतींनी शेवटी दुपारी 1 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. यावेळी विरोधी आमदारांनी हातात हात गुंफून गोवा वाचवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली.