खाण कंपन्यांनी खाणींतील पंप, जलवाहिन्या हटवल्या

0
21

>> खाणींतील पाणी उपशासाठी सरकार आखणार विशेष योजना

डिचोली तालुक्यातील खाणीपाण्याने भरलेल्या असून, पावसाळ्यात भूस्खलन होऊन दुर्घटना घडण्याची भीती काही ठिकाणी व्यक्त केली जात असतानाच आता अनेक खाण कंपन्यांनी खाणींतील पंप, जलवाहिन्या आणि वीजजोडणी देखील काढून टाकली आहे. त्यामुळे पाणी उपसा थांबला आहे. या प्रकाराची कल्पना मुख्यमंत्र्यांना देताच त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली असून, सरकार धोकादायक खाणींतील पाणी बाहेर काढण्यासाठी विशेष योजना आखणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

नव्या आदेशानुसार आता खाण कंपन्यांची मालकी खाणींवर नसून, ६ जूनपर्यंत सर्व यंत्रसामुग्री हटवण्याचे आदेश दिले आहेत. खाण कंपन्यांनी यंत्रसामुग्री हटवतानाच पंप, जलवाहिन्या व वीजजोडणी काढून टाकली आहे.

काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात मुळगाव येथे खाणींतील मातीचा भराव खचून हाहाकार माजला होता. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. विशेष करून लामगाव, शिरगाव, पैरा, मये, कुडणे, साखळी, न्हावेली, सुर्ला, पाळी या ठिकाणच्या खाणींच्या सुरक्षेसाठी उपाय करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी खाण कंपन्यांनी गाशा गुंडाळताना यंत्रसामुग्रीबरोबर पंपिंग स्टेशन काढून टाकले असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच मुळगाव व इतर परिसरात शेती, कुळागरासाठी सोडण्यात येणारे पाणी देखील बंद झाल्याने शेतीलाही फटका बसणार आहे
या प्रकाराची उपजिल्हाधिकारी दीपक वायगंणकर, डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांनीही दखल घेतली आहे.