खाणी सुरू करण्यास मान्यता देण्याची पंतप्रधानांकडे मागणी

0
147

>> मुख्यमंत्र्यांचे मोदींसह खाणमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र

 

केंद्र सरकारने एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करून राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय खाणमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झालेला असल्याने खनिज व्यवसायाला मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आहे. खनिज आयातीच्या माध्यमातून कर्नाटकातून खनिज घेऊन येणार्‍या  खनिजवाहू ट्रकांबाबत कुणीही गोधळाचे वातावरण निर्माण करून नये, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

शेजारील महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने लॉकडाऊन उठविणे योग्य होणार नाही. राज्यातील लॉकडाऊन कायम ठेवून जास्तीत जास्त व्यवसाय सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

५७ खलाशांना गोव्यात येण्यास मान्यता

विदेशातून मुंबईत आलेल्या मारेला या बोटीवरूल ६० पैकी ५७ खलाशांना डीजी शिपिंग यांनी गोव्यात प्रवेश करण्यासाठी  मान्यता दिली असून ३ जणांना अद्यापपर्यत गोव्यात प्रवेशाची मान्यता प्राप्त झालेली नाही. त्याबाबत निर्णय झाल्यानंतर सर्व खलाशांची मुंबईतून गोव्यात रवानगी होईल. राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याच्या विषयावर सचिव पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. गोव्याबाहेर अडकून पडलेले गोमंतकीय प्रवेशासाठी जिल्हाधिकार्‍याशी थेट संपर्क साधू शकतात, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.